जगातून लुप्तप्राय होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या प्रजाती या लुप्त होण्याच्या किती जवळ आहेत, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. त्यासाठी ’इंटरनॅशनल युनियन फॉर दि कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ने (आययुसीएन) ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ हे नवीन मानक प्रसिद्ध केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाची ’आययुसीएन’ ही संस्था नैसर्गिक प्रजातींची अद्ययावत परिस्थितीची माहिती प्रसिद्ध करते.
त्यासाठी एक लाल यादी तयार करण्यात आली असून या यादीमध्ये प्रजातींच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अद्ययावत परिस्थितीनुसार त्यांचे वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण होते. यामध्ये चिंताग्रस्त संकटग्रस्त, अतिसंकटग्रस्त, विलुप्त अशी वेगवेगळी मानके आहेत. या मानकांमध्ये आता ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ या मानकाचा समावेश करण्यात आला आहे. हे मानक एखादी प्रजाती लुप्त होण्याच्या किती जवळ आहे, याचे तपशील त्या प्रजातीच्या संवर्धनाच्या अनुषंगाने उपलब्ध करून देणार आहे. १७१ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या २०० हून अधिक शास्त्रज्ञांनी ही नवीन उपाययोजना तयार करण्यासाठी दहा वर्षे खर्च केली आहेत. यासंबंधीचे १८१ प्रजातींचे पहिले मूल्यमापन ’जर्नल कॉन्झर्वेशन बायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहे.
यामध्ये मॉरिशसमध्ये आढळणारे गुलाबी कबुतर, राखाडी लांडगा आणि पूर्व आशियातील आढळणार्या ‘कॅडेलिया ओबोवाटा’ या कांदळवन प्रजातीचा समावेश आहे. प्रजातींच्या लोकसंख्येचा आकार, आजचे वितरण, मागील संवर्धनाच्या प्रयत्नांचे यश आणि योग्य अधिवास क्षेत्र यांचे विश्लेषण करून ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ हे नवीन मानक पृथ्वीवरुन नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या दहा लाख प्रजातींपैकी काही प्रजातींच्या पुनर्प्राप्तीचा मार्ग आखण्यासाठी संशोधकांच्या उपयोगात येईल. हे मानक विकसित करताना, शास्त्रज्ञांनी केवळ संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी प्रजातींच्या स्थितीचे विश्लेषण केलेले नाही. त्याखेरीच ज्या प्रजाती तुलनेत कमी संकटग्रस्त आहेत. मात्र, त्यांचे मूळ अधिवास संकटात सापडलेल्या आहेत. अशा प्रजातींनाही ग्राह्य धरण्यात आले आहे. उदा. ‘आययुसीएन’च्या लाल यादीमध्ये राखाडी लांडगा हा कमी संकटग्रस्त आहे. मात्र, मूळ अधिवासामध्ये त्यांची लोकसंख्या ही पुनर्प्राप्तीच्या आशेवर आहे.
नवे मानक काय सांगते?
’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ मूल्यांकनाच्या पहिल्या अहवालामध्ये गुलाबी कबुतराचा समावेश करण्यात आला आहे. हे कबूतर केवळ मॉरिशसमध्ये आढळते. १९९० च्या सुमारास या पक्ष्यांची नैसर्गिक अधिवासामधील संख्या केवळ दहा राहिली होती. लाकूडतोड, आक्रमक प्रजातींमधील वाढ आणि हवामान बदलाच्या संकटामुळे ही प्रजात ‘आययुसीएन’च्या लाल यादीत विलुप्त म्हणून सूचीबद्ध करण्यात आली. मात्र, ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ मूल्यांकन दर्शविते की, या प्रजातीच्या संवर्धनाला कामाला यश मिळाले आहे. मॉरिशस बेटाच्या दक्षिणेकडे आता काही १०० प्रौढ पक्षी आढळले आहेत. परंतु, त्यांचे भवितव्य संरक्षणावर अवलंबून आहे. गुलाबी कबुतरांना होणारे धोके व्यवस्थापित करणे आवश्यक असल्याची चेतावणीही या मूल्यांकनामध्ये देण्यात आली आहे. १९९६ पासून, सुमात्रन गेंड्याला ‘आययुसीएन’च्या लाल यादीमध्ये गंभीर अतिसंकटग्रस्त म्हणून म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे.
या प्रजातीच्या संवर्धनासाछी आखण्यात आलेले प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’चे मूल्यांकन मात्र या गेड्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नाला नवीन आशा दाखवत आहे. या मूल्यांकनानुसार प्रजनन तंत्रज्ञानातील प्रगती आणि देखरेखमध्ये सुधारणा केल्यास या प्रजातीच्या संख्येला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होऊ शकते. ज्या भागात या गेंड्यांसाठी अनुकूल अधिवास आहे. मात्र, बर्याच काळापासून या ठिकाणी त्यांचा अधिवास नाही. तशा परिसरांमध्ये या गेंड्यांचे स्थानांतरण करता येऊ शकते.
ऑस्ट्रेलियातील ‘बुरोइंग बेट्टोंगा’ या उंदाराच्या प्रजातीचे ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’ मूल्यांकनही वेगळी माहिती समोर आणते. १९५० साली उंदराची ही प्रजात केवळ चार बेटांवर शिल्लक राहिली होती. आक्रमक प्रजातींच्या वाढीमुळे ही प्रजात जवळपास गायब झाली होती. ‘आययुसीएन’च्या लाल यादीमध्ये तिचे वर्गीकरण चिंताग्रस्त म्हणून करण्यात आले होते. मात्र, ’ग्रीन स्टेट्स ऑफ स्पिसीज’च्या मूल्यांकनानुसार या प्रजातीची पुनर्प्राप्ती ही आक्रमक प्रजातींच्या निर्मूलनावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. भारतातील माळढोक, एकशिंगी गेंडा, तणमोर आणि काही प्रदेशनिष्ठ वनस्पतींबाबतही असे मूल्यांकन होणे आवश्यक आहे.