ब्रेकिंग न्यूज : बातमी हरवली आहे!

14 Aug 2021 15:25:31

breaking News_1 &nbs 
 
 
आजचा जमाना हा २४ तास वृत्तवाहिन्यांचा, ‘ब्रेकिंग न्यूज’चा. पण, अलीकडे ‘टीआरपी’च्या शर्यतीत आणि सोशल मीडियाशीही स्पर्धा करण्यासाठी ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली ‘फेकिंग न्यूज’च्या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या केविलवाण्या प्रकारांनी पत्रकारितेची मानही खाली झुकवली. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ‘ब्रेकिंग न्यूज : बातमी हरवली आहे!’
 
 
वृत्तवाहिन्यांवर एखादी ठळक बातमी (ब्रेकिंग न्यूज) दाखविली जाते, तेव्हा कुणीतरी अचानक त्यावर टिप्पणी करून जातो की, ‘काहीही बातम्या दाखवितात आजकाल!’ अर्थात, आम्ही माध्यम समूहात कार्यरत असल्याने पत्रकारांवरची टीका-टिप्पणी तशी नवी नाही. पण, एखादी बातमी ‘ब्रेकिंग’ चालविली जात असताना, अशा प्रकारची टिप्पणी येणे, ही हल्ली एकद सर्वसामान्यपणे दिसणारे चित्र. त्यामुळे ‘इलेक्ट्रॉनिक’, ‘प्रिंट’ असो अथवा ‘डिजिटल’ मीडियात कार्यरत पत्रकारांसाठी तर हा सूचक इशारा नाही ना, असा प्रश्न पडावा. कारण, पत्रकारिता करत असताना ‘टीआरपी’च्या शर्यतीत धावताना खासकरुन इलेक्ट्रॉॅनिक माध्यमे आपली विश्वासार्हता तर गमावून बसले नाही ना, हा खरा प्रश्न आहे.
 
 
 
नव्वदीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनवर बातम्या प्रसारित व्हायच्या, त्यावेळेस निवेदक ‘आजच्या ठळक बातम्या’ या शीर्षकाखाली दिवसभरातील बातम्यांचा आढावा घेत. त्या बातम्या मोजक्या, महत्त्वाच्या आणि सर्वसमावेशक असायच्या. अत्यंत शांतपणे निवेदन, त्यात कुठलाही बटबटीतपणा नाही. तसेच घटनेच्या दोन्ही बाजू सांगितल्या जात. बातमीदारीच्या मूल्यांनुसार बातम्यांचा क्रम आणि विशेष म्हणजे दूरदर्शनच्या बातम्यांपूर्वी वाजविली जाणारी ती धून... आजही तीच धून कशी आपल्या मनात अगदी सुरात वाजू लागते. ऐकूनही प्रसन्नता संचारते. खरंतर ही माध्यमे आजही आहेत. सायंकाळी 7 आणि रात्री 9.30 वाजताच्या बातम्या आजही प्रसारित केल्या जातात. पण, ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि माध्यमांच्या शर्यतीच्या जमान्यात या गोष्टी कालबाह्य झाल्या, असे म्हणता येणार नाही. पण, दुर्लक्षित झाल्या. मराठी बातम्या सांगणार्‍या निवेदकांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांचा आवाज, भाषाशैली, सादरीकरण या सर्व गोष्टी बातम्या पाहताना अंगावर येत नव्हत्या.
 
 
 
काळ बदलत चालला, सुरुवातीला ‘झी’ आणि ‘इंडिया टुडे’ या समूहांनी दूरचित्रवाणी क्षेत्रात क्रांती घडविली. ‘आज तक’ आणि ‘झी न्यूज’ या त्या काळच्या सर्वाधिक आघाडीच्या वृत्तवाहिन्या बनल्या. बातम्या पाहताना जाहिराती पाहण्याची सवय भारतीयांना तेव्हाच झाली. हळूहळू नवे प्रयोग होत गेले. क्रिकेट सोडून ‘लाईव्ह’ बातम्याही पाहता येतात, ही बाब प्रेक्षकांना नव्याने कळू लागली. त्याच काळात ‘ब्रेकिंग न्यूज’ या संकल्पनेची ओळख भारतीय प्रेक्षकांना होऊ लागली होती. कधी ‘मुंबई बॉम्बस्फोट’, कधी ‘कुपनलिकेत पडलेला प्रिन्स’, कधी ‘महापूर’ तर कधी आणखी काही.... हे सर्व विषय ‘ब्रेकिंग’ या भागाखाली येऊ लागले. २४ तास बातम्या पाहता येतात, ही बाब तशी भारतीयांसाठी नवी होती. पण, ती गोष्टही प्रेक्षकांना रुचत होती.
 
 
 
प्रिन्स खड्ड्यात पडला, ही तर राष्ट्रीय बातमी बनली होती. भविष्यात प्रेक्षकांना लागणार्‍या व्यसनासाठी ही इतकीशी गोष्ट पुरेशी ठरली होती. प्रिन्स खड्ड्यातून बाहेर आला. पण, आपण ‘ब्रेकिंग’च्या खड्ड्यात असे पडलो की, त्यातून बाहेर अजूनही येऊ शकलेलो नाही. सुरुवातीला काही काळ या गोष्टी बर्‍याही वाटल्या. मनोरंजनाचे साधन म्हणून दूरदर्शनवर ‘शक्तिमान’, ‘ज्युनिअर जी’, ‘छायागीत’, शुक्रवार-शनिवार आणि रविवारी रात्री सिनेमा पाहणार्‍या आपल्या सारख्या प्रेक्षकांसाठी या गोष्टी नव्या असल्याने वेळ न दवडता आपण आत्मसात केल्या. नव्वदीच्या दशकात आघाडीच्या खासगी वाहिन्याही सुरू झाल्या.
 
 
यातील मालिकांनी संपूर्ण सिनेसृष्टीच ढवळून निघाली. एकता कपूरच्या मालिकांनी त्याकाळी धमाल उडविली होती. ‘स्टार प्लस’, ‘सोनी टीव्ही’, ‘झी टीव्ही’ अशा चॅनल्सचाही एव्हाना उगम झाला होता. प्रेक्षकही मिळत होता. रंगीत दूरचित्रवाणी संच सर्वसामान्यांच्या अवाक्यात येण्याचा हा काळ होता. आता प्रेक्षक इथेही वळू लागला होता. त्यांना खेचण्यासाठी पुन्हा एकदा आशय हवा, मग ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली दुपारी मालिकांमध्ये काय घडलं, पुढे काय होणार, अभिनेत्यांच्या मुलाखती, असे हलके-फुलके विषयही हाताळले जाऊ लागले होते. मात्र, मालिकांच्या साचेबद्ध पद्धतीत इलेक्ट्रॉनिक मीडियाने तेही ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली सुरू ठेवले.
 
 
आपण लहानपणी ‘लांडगा आला रे’ आला ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल. एक खोडकर मेंढपाळाचा मुलगा गावकर्‍यांना सारखा त्रास देण्यासाठी ‘लांडगा आला रे’ अशी हाक मारून बोलावून घेत असे. मेंढ्या वाचविण्यासाठी गावकरीही हातातली कामे टाकून त्या मुलाच्या मदतीला धावून जात. पण, त्या जागेवर गेल्यावर खोडकर मुलगा खो खो हसत असायचा. हा प्रकार दोन ते तीन वेळा त्याने केला. शेवटी जेव्हा लांडगा खरचं मेंढ्या खाण्यासाठी येतो, तेव्हा त्याला मदत कुणीच करत नाही. हा सर्व प्रकार इलेक़्ट्रॉनिक माध्यमांनी स्वतःच्या बाबतीत करून घेतला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
 
 
 
आजही अशाच काही वृत्तवाहिन्या, त्यातही मराठी वाहिन्या आहेतच, हेही मराठी प्रेक्षकांचेच दुर्दैवच. ‘टीआरपी’, ‘नंबर एक’च्या स्पर्धेत राहण्यासाठी गरज नसलेली बातमीही ‘ब्रेकिंग’ म्हणून तावातावाने प्रेक्षकांवर बिंबवली जाते. बातम्या सांगताना उताविळपणा केला जातो. अर्थात, सर्वच बातम्या याला अपवाद नाहीत. काही माध्यमांनी आपली पत राखून नेमकं प्रेक्षकांना काय हवं, त्यांच्या गरजेनुसार आपल्याला काय विषय देता येतील, याची काळजी आजही घेतलेली दिसते. मात्र, काहींनी कमरेचं सोडून डोक्याला बांधलंय की काय, अशीही टीका बर्‍याचदा होते. कुठली बातमी ‘ब्रेकिंग’ असावी आणि कुठली नाही, याबद्दलचे विशेष असे ठोकताळे अद्याप तरी नाहीत आणि असलेच तरी ते वृत्तवाहिन्यांच्या धोरणांनुसार वेगवेगळे आहेत.
 
 
बातमीचा विषय ताजा असेल, केवळ आपल्याच प्रतिनिधीकडे असेल, एखादी मोठी घटना-दुर्घटना असेल, अशा वेळेस या बातम्या ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून सहसा चालविल्या जातात. आपत्ती, अपघात अशा बातम्या आपण पाहतोच. पण, गरज नसताना एखाद्या बातमीला उगीचच ‘ब्रेकिंग’चे लावलेला पाल्हाळ त्रासदायक ठरते. जगात प्रत्येक सेकंदाला काही ना काही घडामोडी घडतच असतात. त्या प्रत्येक बातम्या ‘ब्रेकिंग’ म्हणून चालविल्या जाऊ लागल्या, तर प्रेक्षक टीव्ही पाहणेच सोडून देईल. बातम्यांचा भडिमार हा आपल्याला नवा नाही. इतक्या मिनिटांत इतक्या बातम्या, “आताची सर्वात मोठी घडामोड...” असे म्हणत, निवेदक आपले लक्ष वेधून घेतात. पण, या मायाजालात फसण्यापूर्वी स्वतःलाच एकदा प्रश्न विचारावा, ही बातमी पाहणे मला गरजेचेच आहे का? याचा खरंच माझ्या जीवनाशी काही संबंध आहे का? कारण, बर्‍याचदा अशा गोष्टीत अजेंडाही राबविलेला असल्याचे नाकारता येत नाही.
 
 
 
एखाद्या बड्या कलाकाराचे निधन, लग्न किंवा आणखी काही घटना या घटना आवडीने चघळल्या जातात. ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात. पाकिस्तानसारखे भारतात अजून स्टुडिओमध्ये मारहाणीचे प्रकार झालेले नाहीत. पण, प्रेक्षकांच्या अंगावर धावून येणारा निवेदक, चर्चेत सहभागी झालेल्यांच्या शिवीगाळीचेही प्रकार भारतातही झाले. एका सभ्य, सुसंस्कृत वर्गाने यापासून फारकत घेतली. अशा चर्चांची थट्टा केली जाऊ लागली. परिणामी, ‘ब्रेकिंग’ बातमी आणि मुलाखतींनाही गांभीर्याने घेणे बंद झाले.
 
 
दरम्यानच्या काळात भारतात ‘फोर-जी’ सेवा सुरू झाली. वायफाय आणि ब्रॉडबॅण्डचे युग अवतरले. सोशल मीडियाचा वापर बातम्या आणि ‘ब्रेकिंग न्यूज’साठी होऊ लागला. विशेषतः ट्विटरचा वापर ‘ब्रेकिंग न्यूज’साठी केला गेला. समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी विषयांतील व्यक्तींनी केलेल्या ट्विटच्या आधारे बातम्या होऊ लागल्या. अनेकदा यामुळे बातमीची सत्यता पडताळण्यात त्रुटी होऊ येत (लागल्या). अनेकदा निधनाच्या बातम्या एखाद्या ट्विटद्वारे ब्रेकिंग म्हणून चालविल्या जाऊ लागल्या. एखादा राजकीय, सामाजिक किंवा सिनेसृष्टीतील व्यक्ती जर अतिदक्षता विभागात उपचार घेत असेल, तर त्याच्या निधनापूर्वीच श्रद्धांजलीपर पोस्ट व्हायरल केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर बर्‍याच वेळाने संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांना स्पष्टीकरण दिल्यानंतर वाहिन्यांना माफी मागावी लागली होती. नको तितकी स्पर्धा अनेकदा तोंडघशी पडायला लावते, याचीही उदाहरणे आहेत. सोशल मीडियावर अवलंबून राहण्याची सवय अनेकदा माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. स्वतःच व्हायरल करणार्‍या बातम्यांचे ‘फॅक्ट चेक’ करण्याची वेळ अनेक माध्यमांवर येऊ लागली. अर्थात, ‘फॅक्ट चेक’ करणारे ‘तो मी नव्हेच...’ अशी भूमिका घेतात. विशेष म्हणजे, अशा बातम्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनाशी थेट संबंधही नसतो.
 
 
 
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिया चक्रवर्तीवर या प्रकरणामुळे झालेले आरोप, कंगना राणावत विरुद्ध संजय राऊत, दीपिका पादुकोणची ‘एनसीबी’ चौकशी ही प्रकरणे गेल्या वर्षी ‘ब्रेकिंग’ म्हणून अवास्तव चघळली गेली. मात्र, त्यातून सिद्ध तर अद्याप काहीच झालेले नाही. अनेकदा मूळ प्रश्नांना बगल देऊन गरज नसताना केवळ ‘टीआरपी’च्या नावाखाली ‘ब्रेकिंग’ बातम्या चालविल्या जातात. वरील सर्व प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या घराबाहेर २४ तास असलेला पत्रकारांचा डेरा, तपास यंत्रणांच्या कार्यालयापासून ते घरापर्यंत मागे-मागे धावणारे प्रतिनिधी हे सर्व प्रकारही भारतीय प्रेक्षकांनी पाहिले.
 
 
 
‘ब्रेकिंग न्यूज’ची सर्वसामान्य व्याख्या म्हणायची झाली, तर महत्त्वाची बातमी, ठळक बातमी असे म्हटले जाते. पण, माध्यम समूहांमध्ये अशा बातम्या तयार करण्याचा प्रघातच पडला. वेगळ्या टीमद्वारे ‘व्हॉईस ओव्हर’, व्हिडिओ फुटेज देऊन ‘ब्रेकिंग’ बातम्या दिल्या जातात. हा ‘ब्रेकिंग’ बातम्यांचा भडिमार प्रेक्षकांनाही आता नकोसा झाला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेकिंग’चा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. सुजाण वाचक आणि प्रेक्षकांना ही बाब समजून येत असते. त्यामुळे एखाद्या वृत्तसमूहाबद्दल मत तयार होण्याचीही भीती असते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनंतर मराठी माध्यमेही अशा गोष्टींकडे झुकलेली दिसू लागली आहेत. पाकिस्तानातील उपासमार, बेरोजगारी, तिथल्या समस्यांबद्दल चॅनल्स पॅकेज तयार करतात. त्यातही मराठी माध्यमे आघाडीवर आहेत. कुठल्या तरी सातासमुद्रापार देशातील घटना ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली ‘विशेष वार्तांकन’ म्हणून दिल्या जातात. प्रेक्षकांना त्यात व्यस्त ठेवून मूळ मुद्द्यांपासून भरकटवले जाते.
 
 
 
आता महाराष्ट्रातील उदाहरणच घ्या. कोरोनाच्या डेटाबद्दलचे वार्तांकन, ‘लॉकडाऊन’ समस्यांवर भर देण्याऐवजी, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या त्यानंतर रिया चक्रवर्तीची चौकशी, अर्णव गोस्वामी अटक, कंगना राणावतची वक्तव्ये यांसारख्या गोष्टी माध्यमांनी अगदी चवीने चघळल्या. ‘ऑक्सिजन’ प्लांटची गरज, लसीकरणाची व्यवस्था उभारणी, कोरोना रुग्णवाढ, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार, कोरोना अहवालातील फेरफार, रुग्णालयांतील गैरव्यवहार, अशा प्रकरणांबद्दल कुणीही जास्त वेळ देण्यासाठी तयार नव्हते. परिणामी, हाहाकार माजला, देशात इतर कुठल्याही राज्यांपेक्षा सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले. ‘ऑक्सिजन’अभावी रुग्णांचे मृत्यू झाले. उदाहरण घ्यायचे झाले तर आपणा सर्वांना नाशिकची ‘ऑक्सिजन’गळती दुर्घटना आठवत असेल. भांडुप ‘कोविड सेंटर’ आग आठवत असेल, विरार रुग्णालयातील आगीचे तांडवही अद्याप कोणी विसरु शकलेले नाही. मूळ जनतेचे प्रश्न सोडून जर ‘पेज-थ्री’ पत्रकारितेला पुढे आणून ‘टीआरपी’ची स्पर्धा होणार असेल, तर अशा गोष्टींवर वचक कोण ठेवणार, हाच प्रश्न राहतो. महाराष्ट्रात लोकल प्रवासापासून सर्वसामान्यांना वंचित ठेवले, त्याबद्दल कुठल्याही माध्यमांनी विशेष वार्तांकन चालविले नाही किंवा त्याबद्दल भूमिका मांडली नाही. इतर राज्यांतील लोकलसेवा सुरू झाली असताना, मुंबई महानगरातील लोकल प्रवाशांना वंचित ठेवले जाते. सामान्य व्यक्तींना बसप्रवासही परवडणारा नाही, बसमध्ये होणार्‍या कोंडीतून कोरोना होत नाही का, हे प्रश्न ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली ‘मनोरंजन’ करणार्‍या वृत्तवाहिन्यांनी का विचारला नाही? दरडी कोसळणे, महापूर, इमारती कोसळून मृत्यू झाल्यावर त्याचे २४ तास वार्तांकन करणार्‍या माध्यमांनी अग्निसुरक्षा, बेकायदा बांधकामे, पर्यावरणातील बदल, अतिवृष्टीबाधितांना, पूरग्रस्तांना मिळणार्‍या मदतीचा कुणी पाठपुरावा केला का, हे सामान्यांचे विषय ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये कधी येणार? हा खरा प्रश्न आहे.



 
 
 
 
Powered By Sangraha 9.0