भारतीय स्वातंत्र्यलढा : एक सिंहावलोकन

14 Aug 2021 23:11:41

india_1  H x W:
 
 
वसाहतवादी गुलामगिरीच्या शृंखलांमधून मिळालेल्या मुक्तीचा अमृत महोत्सवी सोहळा आज भारतात सर्वत्र साजरा केला जात आहे. सोहळ्याच्या या मालिकेदरम्यान स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचे मूल्यमापन होईलच, पण त्याचबरोबर हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी देशाने चारशेहून अधिक वर्षे केलेल्या प्रदीर्घ संघर्षाच्या आणि स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या देशभक्तांचे पुण्यस्मरण करणेदेखील साहजिक आहे.
‘स्वधर्म’, ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेशी’ ही त्रिसूत्री भारतीय स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय आंदोलनाची प्रेरणा होती. एका अर्थाने, हा ‘स्व’त्त्वभाव जपण्याचा संघर्ष होता. या भावनेने संपूर्ण देश भारावलेला होता. संत महंतांच्या सहवासातून लाभणारे आध्यात्मिक चैतन्य हा या आंदोलनाचा जीवनप्रवाह होता. युगानुयुगांपासून भारताच्या ठायी असलेल्या या तेजस्वी ‘स्व’त्त्वभावातून उभ्या राहिलेल्या प्रखर संघर्षाचा विदेशी शक्तींना पदोपदी सामना करावा लागला. याच विदेशी शक्तींनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक व्यवस्थेची वाताहत घडविली, ग्रामीण भारताची स्वावलंबी व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली. विदेशी शक्तींच्या या व्यापक आक्रमणाचा भारताने एकमुखाने प्रतिकार केला.
 
 
 
युरोपीय शक्तींच्या विरोधातील भारताचा हा संघर्ष म्हणजे इतिहासातील एक अनोखे उदाहरण आहे. एका बाजूला विदेशी आक्रमण परतवून लावण्यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू असतानाच, दुसरीकडे समाजातील विकृती दूर करून सामाजिक पुनर्रचना घडवत शक्तिशाली समाजनिर्मितीचे कार्य अविरतपणे सुरू होते. देशातील संस्थांनांचे राजे महाराजे आपल्या शक्तिनिशी इंग्रजांशी लढा देत होतेच, पण इंग्रजांच्या भारतीय जीवनमूल्यांवरील आक्रमणाच्या विरोधात ठिकठिकाणी जनसमूहातून संघर्षाचे हुंकार उमटत होते. भारतीय जीवनमूल्यांचे रक्षण करण्याच्या ईर्ष्येने प्रेरित झालेल्या जनतेचा लढा चिरडण्यासाठी इंग्रजांनी क्रूर नरसंहार केले. परंतु, संघर्षाची धग शमली नाही. इंग्रजांच्या जुलमी कारवायांना भारतीय जनतेने तोंड दिले. १८५७चे देशव्यापी स्वातंत्र्ययुद्ध हा त्या धगधगत्या राष्ट्रभावनेचा उत्फुल्ल हुंकार होता. लाखो देशभक्तांनी या स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली.
 
 
 
भारतीय शिक्षणव्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काशी हिंदू विश्वविद्यालय, शांती निकेतन, गुजरात विद्यापीठ, एमटीडी हिंदू कॉलेज तिरुनवेल्ली, ,कर्वे शिक्षणसंस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी तसेच गुरुकुल कांगडी आदी अनेक संस्थांनी दंड थोपटले आणि विद्यार्थी व युवकांमध्ये देशभक्तीची ज्वाला उफाळू लागली. प्रफुल्लचंद्र राय आणि जगदीशचंद्र बोस यांसारख्या वैज्ञानिकांनी आपली सारी प्रतिभा भारताच्या उत्कर्षासाठी मातृभूमीच्या चरणी समर्पित केली, तर दादासाहेब फाळके, नंदलाल बोस, अवनीन्द्रनाथ ठाकूर यांसारखे कलावंत आणि माखनलाल चतुर्वेदींसह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचा वसा घेतला. महर्षि दयानंद, स्वामी विवेकानंद, महर्षि अरविंद यांसारख्या अनेक विभूतींची आध्यात्मिक प्रेरणा या सर्वांच्या संघर्षासाठी पथदर्शी ठरली होती.
 
 
 
बंगालमध्ये राजनारायण बोस हिंदू मेळावे भरवत होते. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांचे सार्वजनिक आयोजन करून भारताच्या सांस्कृतिक मूल्यांच्या जाणिवा जागृत करत होते, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांनी रचनात्मक कामातून महिला शिक्षण आणि उपेक्षित समाजास सशक्तपणे परिवर्तित करणार्‍या मोहिमा हाती घेतल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघटित समाजनिर्मिती आणि सामाजिक समतेची मशाल हाती घेऊन समाजाला नवी दिशा देण्यासाठी कार्यरत झाले होते.
 
 
 
महात्मा गांधींचा प्रभाव नाही, असे एकही क्षेत्र भारतीय समाजजीवनात नव्हते. श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाल, मादाम कामा यांसारखे नेते विदेशातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धार प्रखर करण्याकरिता झटत होते. लंडनचे ‘इंडिया हाऊस’ हे तर स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थानच बनले होते. क्रांतिवीर सावरकर यांनी लिहिलेला १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ही तर त्या काळातील स्वातंत्र्ययोद्ध्यांची गीता होती. क्रांतिकारक भगतसिंह यांनी त्याचे प्रकाशन करून शेकडो प्रतींचे सर्वत्र वितरण केले होते.
 
 
 
देशभरातील चारशेहूनही अधिक संघटनांचे क्रांतिकारक भूमिगत राहून प्राणांची पर्वा न करता भारतमातेच्या मुक्तिलढ्यात उतरले होते. बंगालमध्ये ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेच्या कामात सक्रिय असलेले डॉ. हेडगेवार हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून काँग्रेसमध्ये सामील झाले व मध्य भारताचे सचिव म्हणून निवडून गेले. १९२० मध्ये नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजन समितीच्या उपमुख्यपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. याच अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत व्हावा, यासाठी त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह जोरदार प्रयत्न केले. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांची त्यास तयारी नव्हती. अखेर पुढे आठ वर्षांनंतर तो ठराव लाहोरमध्ये संमत होऊ शकला.
 
 
 
दुसर्‍या महायुद्धादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले. एवढेच नव्हे, तर ईशान्य भारतातील काही भाग स्वतंत्र करण्यातही आझाद हिंद सेनेस यश प्राप्त झाले होते. लाल किल्ल्यात आझाद हिंद सेनेच्या अधिकार्‍यांवर चाललेल्या खटल्यांमुळे संपूर्ण देशात संताप खदखदत होता. त्याबरोबरच, ब्रिटिश अधिकार्‍यांविरोधातील असंतोषास नौदलात तोंड फुटले, बंड उफाळले आणि भारतातून काढता पाय घेणे ब्रिटिशांना भाग पडले.
 
 
 
स्वातंत्र्याचा सूर्य तर उगवला, पण फाळणीच्या ग्रहणाने त्यास ग्रासले होते. अशा अवघड परिस्थितीतही पुढे वाटचाल करण्याची उमेद मात्र कायम होती. आपल्या राष्ट्रीय आकांक्षांच्या पूर्ततेचा ध्यास शेकडो वर्षे उराशी बाळगून त्यासाठी घाम आणि रक्त सांडणार्‍या प्रत्येक भारतीयास याचे श्रेय द्यावे लागेल.
 
 
 
‘केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी भारतास जागृत राहावे लागणार आहे,’ असे महर्षि अरविंद यांनी म्हटले होते. भारताच्या स्वातंत्र्याने जगातील अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना प्रेरणा दिली आणि महर्षि अरविंदांची ही घोषणा वास्तवात साकारली. वसाहतवादाच्या बेडीत अडकलेले एकामागून एक देश स्वतंत्र होत गेले आणि ब्रिटनच्या साम्राज्यावरील कधीही न मावणारा सूर्य कायमचा अस्तंगत झाला.
 
 
 
पोर्तुगाल, डच, फ्रेंच आणि सर्वात शेवटी ब्रिटिश भारतात आले. सर्वांनीच व्यापाराबरोबरच भारताची संस्कृती नष्ट करून भेदभाव पसरविण्याचे अथक प्रयत्न केले. मात्र, वास्को-द-गामा या युरोपीय प्रवाशाने १४९८ मध्ये ज्या दिवशी भारताच्या भूमीवर पहिले पाऊल टाकले, त्याच दिवशी वसाहतवादाविरुद्धच्या संघर्षाची पहिली ठिणगी भारतात पडली होती. त्रावणकोरच्या महाराजा मार्तंड वर्माकडून पराभूत होऊन डचांना भारत सोडावा लागला. पोर्तुगीजांना गोव्यापलीकडे हातपाय पसरणे शक्य झाले नाही. वर्चस्वाच्या या संघर्षात अखेरीस ब्रिटिश मात्र यशस्वी झाले आणि भारताच्या निम्म्याहून अधिक भागावर त्यांनी कुटील राजनीतीच्या बळावर कब्जा मिळविला. उर्वरित भारतात संस्थानिकांसोबत इंग्रजांनी तह केल्यामुळे संस्थाने कायम राहिली. स्वातंत्र्यानंतर या समूहांचा समावेश होऊन भारतीय लोकशाही राष्ट्राचा उदय झाला.
 
 
 
आज भारत हे जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी नेतृत्व केले, भारताची सांस्कृतिक मूल्ये जतन करण्यासाठी संघर्ष केला, त्यांनीच स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याचे कर्तव्यही पार पाडले. त्यामुळेच भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या प्रतीमध्ये, रामराज्याची संकल्पना, व्यास, बुद्ध आणि महावीर यांच्यासारख्या भारतीयत्वाची प्रतीके ठरलेल्या महामानवांची चित्रे समाविष्ट करून भारताचा सांस्कृतिक प्रवाह अखंड ठेवण्याची व्यवस्था केली गेली.
 
 
 
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या देशभक्तांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे. कारण, त्यांच्यामुळेच आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक समुदायामध्ये आपले उचित स्थापन प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अनेक अनामिक योद्धे, विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या अनेक घटना, ठिकाणे, संस्थांनी स्वातंत्र्यलढ्यास दिशा दिली व त्यांची प्रेरणा हीच स्वातंत्र्यलढ्याचा मैलाचा दगड ठरली. अशा महानुभावांचे स्मरण करणे, त्यांच्या कार्याचे मूल्यांकन करणे आणि पुनरावलोकन करून देशाच्या मुख्य प्रवाहास त्यांचा परिचय करून देणे गरजेचे आहे. कारण, आज सहजपणे आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे पिढ्यान्पिढ्यांचे बलिदान, संघर्ष आणि तपश्चर्या आहे, राष्ट्रोदयासाठी शतकानुशतके गाळलेल्या घामाची, अश्रूंची आणि शोणिताची गाथा आहे, याची जाणीव भावी पिढ्यांच्या मनात जागी राहिली पाहिजे.
 
 
- दत्तात्रेय होसबळे
 
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आहेत.)
 
(अनुवाद : दिनेश गुणे)
Powered By Sangraha 9.0