सर्पमित्राची रौप्य महोत्सवी जनजागृती

13 Aug 2021 21:56:22

Pimple_1  H x W
 
गेल्या २५ वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करीत असलेले मनीष जयेंद्र पिंपळे हे सापांविषयी समाजात जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेऊया.
 
 
मनीष यांचा जन्म कांजूरमार्ग येथे झाला. त्यांचे बालपण डोंबिवलीतील आयरे गावात गेले. शालेय शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय दत्तनगर येथे झाले. आयरे गावात मोकळी जागा आणि झाडी सर्वत्र असल्याने त्यांच्या घराजवळून अनेकदा साप जाताना दिसत होते. पावसाळ्यात तर साप मोठ्या प्रमाणात दिसायचे. साप पाहून मनीष यांना खूप भीती वाटायची. पण, त्यांनी कधीही सापाला मारण्याचा प्रयत्न केला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. सचिन जोशी यांच्याशी मनीष यांची भेट झाली. त्यांची फॅक्टरी आणि एक दुकान होते. मनीष सचिन यांच्याकडे काम करीत होते. सचिन जोशी हेदेखील डोंबिवलीतील जुने सर्पमित्र आहेत. सचिन हे ‘रेस्क्यू’ करायला जायचे. मनीष हे सगळे पाहत होते. मनीष त्यांना अनेक बारकावे विचारत असत, त्यामुळे सचिन यांना मनीषला यात विशेष रुची असल्याचे लक्षात आले. सचिन यांनी मनीष यांना याविषयी माहिती दिली अन् तिथूनच मनीष यांची सर्पमित्र म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली.
 
 
 
सर्पमित्र म्हणून काम करताना काही गोष्टी सुरळीत व्हाव्यात यासाठी एक संस्था असणे गरजेचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. मग १८ सर्पप्रेमींनी एकत्रित येत १९९६ मध्ये ‘नेचर सेव्ह सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. १९९६मध्ये सापांवर आधारित पहिले प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन डोंबिवलीतील निमकर कार्यालयात भरविण्यात आले होते. त्यावेळी पर्यावरणमंत्री जगन्नाथ पाटील यांनी हजेरी लावली होती. सर्पमित्र सगळे नोकरी-व्यवसाय करून हे काम करीत होते. त्यामुळे सर्व साप पकडून एका ठिकाणी ठेवून मग त्यांची निसर्गात सुटका केली जात होती. ‘फॉरेस्ट’ विभागाशी बोलून सापांना जीवदान दिले जात होते. दररोजचे काम करून एवढे होत नव्हते. ‘फॉरेस्ट’ विभागाने साप असे एकत्र ठेवू शकत नाही, असे सांगत त्यावर बंदी घातली. मग त्यांनी फायर बिग्रेडची मदत घेण्यास सुरुवात केली. लोक पहिल्यांदा अग्निशमन सेवा विभागाला फोन करीत असत. अग्निशमन विभागाकडून मनीष यांना फोन येत असत. मनीष दोन दिवसांत साप अग्निशमन विभाग आणि ‘फॉरेस्ट’ विभागाशी बोलून त्यांना जंगलात सोडण्याचे काम करीत होते. “मामणोली, उंबर्ली या परिसरात जाऊन साप सोडले जात होते. बिनविषारी सापाची लोकांना माहिती देऊन सोडले जात होते. विषारी सापाला मात्र पाच किलोमीटर लांब सोडावे लागत होते,” असे मनीष सांगतात.
 
 
 
सर्पमित्र म्हणून काम करताना त्यांचा शिक्षण मंडळाशी संपर्क आला. शाळांमध्ये जाऊन जनजागृती करण्याची मनीष यांची इच्छा होती. पण, कुणी त्यांना दाद देत नव्हते. याचदरम्यान त्यांची शिक्षणमंडळातील आर. के. मुकणे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मनीष यांना मदत केली. त्यांच्यामुळे मनीष यांना शाळाशाळांमध्ये जाऊन सापांविषयी जनजागृती करता आली. मुकणे यांच्या माध्यमातून त्यांचा मार्ग सुकर झाला. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये जाऊन त्यांना सापांविषयी माहिती देता आली. त्यात ते आपल्या आजूबाजूला आढळून येणार्‍या १२ बिनविषारी साप आणि पाच विषारी सापांची माहिती देत होते. सापांविषयीची जनजागृती वाढावी यासाठी शाळांमध्ये ते बॅनरही देत होते. आठ वर्षांपूर्वी काही मंडळांनी मनीष यांना प्रदर्शन लावण्यासाठी मदत केली. त्यामध्ये बालभवनची जागा प्रदर्शनासाठी मिळवून दिली. फोटोग्राफर राजन जोशी यांनी सभागृहासाठी मदत केली. संजय लोकरे यांनी फोटो मिळवून द्यायला मदत केली. या प्रदर्शनाला आमदार रवींद्र चव्हाण आले होते. त्यामुळे मनीष यांना प्रोत्साहन मिळत गेले. मनीष यांना अनेकांनी मदत केली. आता त्या सर्व मित्रांनी स्वत:च्या ‘एनजीओ’ स्थापन केल्या आहेत. सचिन जोशी, बाबाजी पेडकर, दत्ता बोंबे, वैभव कुलकर्णी, योगेश कांबळे यांची तसेच सेवा ट्र्स्ट, ‘निसर्ग विनायन संस्था’, ‘वॉर फाऊंडेशन’ यांची त्यांना मदत झाली.
 
 
 
मनीष यांनी केवळ सापांविषयी जनजागृती करणे आणि त्यांना जीवदान देणे एवढेच काम केले नाही, तर त्यांनी त्यांचा डेटाही ठेवला आहे. कोणत्या ठिकाणी त्यांनी साप पकडला. किती वाजता पकडला, कोणत्या जातीचा साप आहे, तो कुठे सोडला, जिथे पकडला त्यांची माहिती देणार्‍या व्यक्तीचा मोबाईल नंबर ही सगळी माहिती मनीष यांच्याकडे आहे. 2001पासून हा डेटा मनीष यांच्याकडे आहे. ‘फॉरेस्ट’ विभागाकडून आयकार्डसाठी परीक्षा झाला होती. त्यात त्यांना काय काम करता, हे द्यायचे होते. त्यावेळी या डाटाचा फायदा मनीष यांना झाला. या परीक्षा मनीष पास झाले आहेत. त्यांच्याकडे डाटा असल्याने ते सापांविषयी जनजागृती करीत आहेत, हे सिद्ध झाले.
 
 
 
‘लॉकडाऊन’च्या काळात लोक घरात बसून असायचे. सोसायटीबाहेर कुठेतरी झाडांवर साप दिसला तरी लोक फोन करायचे. तो साप झाडांवर आहे. त्याचे तिथे वास्तव्य आहे. त्यामुळे साप झाडांवर असणारच आहे. लोक त्याचा फोटो पाठवत असत. मग मनीष त्यांना हा बिनविषारी आहे. झाडांवर बाहेर आहे तो निघून जाईल, असे ते नागरिकांना सांगत असत. काही लोक गंमत म्हणून फोन करायचे. सर्पमित्रही जीव धोक्यात घालून येत होते. पण, तो बिनविषारी आहे आणि झाडावर आहे, तो काही करणार नाही. पण, लोकांना वाटायचे की, सर्पमित्र येत नाही, असा समाजात गैरसमज पसरतो. पण, तसे नसते. ज्या ठिकाणी विषारी साप दिसायचे, तिथे सर्पमित्र जात होते. ‘लॉकडाऊन’ काळात त्यांना इमर्जन्सी आपत्कालीन कार्ड दिले होते, असे मनीष सांगतात. मनीष यांना सध्या कावळा, बगळा यांच्यासाठी ‘रेस्क्यू सेंटर’ तयार करायचे आहे. पिंडासाठी लोकांना कावळ्याची आठवण होते. पण, एखादा कावळा जखमी असेल तर कुणी त्याकडे पाहत नाही, ही गोष्ट मनीष यांना न पटणारी आहे. मनीष यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0