ध्यास समाजसंध्येचा!

11 Aug 2021 23:11:23

Sandhya Samant_1 &nb
 
 
 
माणुसकीच्या धर्मातून समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील सर्वव्यापी प्रतिभेच्या संध्या सामंत-सावंत यांच्याविषयी...
 
 
आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका बडवत न बसता केवळ नि:स्पृह वृत्तीने दुसर्‍यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यासाठी सेवा बजावणारी ‘माणसं’ आजकाल विरळच! तसं पाहता अनेक जण सामाजिक कार्यात उतरतात ते प्रतिष्ठा, मानमरातब किंवा राजकारणासारख्या तत्सम लोभापायी भरीस पडून किंवा चमकोगिरीसाठी. मात्र, आयुष्यात कशाचीही तदात नसताना केवळ माणुसकीचा धर्म जपून समाजसेवेचा ध्यास घेत तेवढ्याच तळमळीने काम करणे वेगळे. अशी माणसं क्वचितच आढळतील आपल्या आजूबाजूला. त्यातल्याच एक संध्या सामंत-सावंत, ज्यांना ‘संध्याताई’ म्हणूनदेखील ओळखलं जातं. लहान मुलांची प्रचंड आवड असल्याने चिमुकल्यांच्याही त्या लाडक्या. ठाण्यातील अनेक गरीब वस्तीवर, वनवासी पाड्यावर किंवा ठामपाच्या काही शाळांत जाऊन विचारलं, तर सगळेच आवर्जून नाव घेतात संध्याताईचं.
 
 
 
नुसतं शिक्षण, समाजकारण नव्हे, तर त्यांना इतर अनेक गोष्टींची आवड आहे आणि कुशलता आहे. त्यांना निसर्गाची आवड आहे, म्हणूनच शेतीकामात त्या स्वतः उतरून काम करतात. त्यासोबतच चित्रकला, हस्तकलेमध्येही त्या पारंगत आहेत. त्यांच्या घरातील भिंतीवरील चित्रांमधून त्यांचे कर्तृत्व उजळून निघते. कॅनव्हासपासून ते मातीची भांडी, स्टोन आर्ट पासून ते २० फुटी दगडालादेखील त्यांनी बोलके बनवले आहे. टाकाऊतून टिकाऊ असो की, प्लास्टिकच्या बाटल्या, सर्व गोष्टींचा पुनर्वापर करण्याचा त्यांना छंदच जडला आहे. शाळेतील मुलांना त्या स्वतः अशा कलाकुसरीच्या गोष्टी आवर्जून शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टेरेस गार्डन’ ही संकल्पना मुलांनी राबवून ठाण्याच्या वृक्षवल्ली प्रदर्शनात मांडले होते. तेव्हा तत्कालीन महापौरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या सर्वातून त्या वेळ काढतात ते ब्लॉगिंग किंवा लिखाणासाठी. समाजप्रबोधन तसेच ग्रामीण संस्कृतीपर त्यांचे लेख अनेक प्रचलित मासिके आणि वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असतात. एका शैक्षणिक मासिकाच्या त्या उपसंपादिकादेखील आहेत. तसेच त्यांना गाण्याचीही आवड आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीत असणं म्हणजे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वच.
 
 
ठाण्यातील नौपाड्यातील सरस्वती सेकंडरी शाळेतून शिक्षण घेऊन पुढे कॉमर्समध्ये उच्च पदवी मिळवली. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात गलेलठ्ठ पगारावर रुजू झाल्या होत्या. मात्र, समाजसेवेचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. ‘लॉकडाऊन’मध्येही वेळ न घालवता समाजकार्य करतानाच त्यांनी अनेक कोर्सेस केले. अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीचा मानसशास्त्राचा कोर्स असू द्या की, पर्यावरणातील अनेक छोटे-मोठे कोर्सेस. ते सगळे करून पुन्हा ‘सीसीई’ फिनलंडमध्ये शिक्षण विषयावर आपला शोधनिबंध सादर करून प्रकाशित केला.
 
 
 
लहान मुलांची आवड असल्याने नोकरी आणि संसार सांभाळत असतानाच गरीब वस्तीतील मुलांना वाढदिवस साजरे करणे, खेळ, वह्या-पुस्तकेवाटप करणे, अशा गोष्टीत आधीपासूनच संध्या यांना विशेष रस. समाजात वावरताना आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून एखाद्याला नुसतीच मदत करण्यापेक्षा त्याच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे, हे जाणवल्यावर २०१२ मध्ये त्यांनी कॉर्पोरेट जगतातील प्रतिष्ठित नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर मुलांना आणि महिलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याकडे प्रवास सुरू केला. संध्या यांच्या सामाजिक कार्याची अनेक उदाहरणे आहेत.
 
 
 
सिग्नलवरील भीक मागणार्‍या मुलांना शिकवण्यापासून ते आश्रमशाळेतील वनवासी मुलींसाठी मदतकार्य करून संध्या यांनी अनेक संस्थांसोबत कामे केली. त्यानंतर ‘मातृसेवा’ नावाची संस्था स्थापन करून महिला, मुलं आणि पर्यावरण यामध्ये अनेक प्रयोगशील उपक्रम राबवले. समाजसेवेचा हा रतीब आजही त्यांच्याकडून सुरूच असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
 
 
 
गेल्या तीन वर्षांत त्यांनी 300हून अधिक मुलांना शिक्षणप्रवाहात आणले. ठाण्यातील २५ वनवासी महिलांना निरक्षरतेकडून साक्षरतेकडे नेले. ठाणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना बोलक्या भिंतीचे स्वरूप दिले, वाचनालय, प्रयोगशाळा अशा सोई-सुविधा पुरवल्या. अनेक शाळांमधून त्यांनी पर्यावरणपूरक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘वृक्षबंधन’ उपक्रम गेली चार वर्षे त्यांची ‘मातृसेवा फाऊंडेशन’ संस्था सातत्याने राबवित आहे. तसेच वृक्षारोपण, बी संकलन, कचर्‍याची विल्हेवाट, पाल्यापाचोळ्यातून खत बनवणे, भाजीपाला लावणे, टेरेस गार्डन, फुलपाखरू उद्यान, असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. ‘निसर्ग शिक्षण’ या विषयावर त्यांनी लिहिलेला शोधनिबंध प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
 
 
या कामाबरोबरच पनवेल येथील वनवासी पाड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय ते शौचालय उपलब्ध करून देणे, प्लास्टिकचा वापर टाळून गाव स्वच्छ ठेवणे, लहान मुलांना वाचनालय, अशा अनेक सोयी करून दिल्या. ठाण्यातील कोकणी पाडा वनवासी मुलांच्या बालवाडीतील मुलांना गणवेश पुरवले. पाचवड पाडा येथे पपईची बाग, तुर्फा पाडा येथे वस्तीशाळा असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. ‘लॉकडाऊन’मध्ये ‘ऑनलाईन’ कार्यशाळा, समुपदेशन तसेच धान्यवाटप करून कोरोनाकाळातही त्यांनी समाजसेवेचे कर्तव्य बजावल्याचे त्या सांगतात.
 
 
आजच्या जगात शिक्षणाबरोबर कौशल्य खूप जरुरी आहे. पण, त्याहीपेक्षा अधिक माणुसकीचे धडे देण्याची जास्त गरज आहे. मानवता हाच आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवला तर जगणे सोयीस्कर होईल, असे मानणार्‍या संध्या यांना भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
 
 
 
Powered By Sangraha 9.0