मृदा परीक्षणसारख्या वेळखाऊ प्रक्रियेला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज-सोपे करणार्या नाशिक येथील पुष्कर काळे यांच्या कार्याविषयी...
कृषिपिकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मृदा. मृदेचा नेमका पोत बळीराजाला समजावा, यासाठी नाशिक येथील पुष्कर विजय काळे या तरुणाने साकारलेले तंत्रज्ञान नक्कीच साहाय्यभूत ठरेल असेच आहे.
‘यांत्रिकी अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंट’पर्यंत काळे यांचे शिक्षण झाले. काळे हे आपल्या ‘इंटेलिजन्स टेक्सोल प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून ‘इमर्जिंग टेक्नोलॉजी’मध्ये कार्यरत आहेत. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘मशीन लर्निंग’, ‘कॉम्पुटर व्हिजन’, ‘डेटा अॅनालिटिक्स’, ‘इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि ‘रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन’ आदी तंत्रज्ञान वापरून कृषी आणि उत्पादन क्षेत्रात नवीन उत्पादने आणि सेवा देण्याचे कार्य ते करतात.
त्यांनी नुकतेच एक उपकरण विकसित केले असून, त्याद्वारे शेतीतील मातीचे परीक्षण सुलभ होत आहे. हे भारतातील एकमेव उपकरण आहे की, ज्याद्वारे मातीचे परीक्षण अवघ्या दहा सेकंदात होते. तसेच तपासणी अहवाल मोबाईलवर अवघ्या दहा सेकंदात मिळतो. बॅटरीवर चालणारे हे उपकरण वापरायला अगदी सोपे असून, कुठेही सहज घेऊन जाता येते. त्यामुळे सध्याची क्लिष्ट असणारी माती परीक्षण प्रक्रिया सोपी होत आहे. या उपकरणांच्या माध्यमातून आठ घटकांची माहिती मिळते. यामध्ये अजून घटक मिळण्याचे कामदेखील सुरू आहे. तसेच तपासणी अहवालासोबतच काळे हे शेतकर्यांचे समुपदेशनही करतात.
सध्याच्या माती परीक्षणाच्या प्रक्रियेला लागणार्या कालावधीमुळे बरेचसे शेतकरी माती परीक्षण करतच नाहीत. त्यामुळे त्यांना जमिनीच्या कसाची शास्त्रीय माहीत नसते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. परंतु, अति जास्त खतांमुळे जमीन नापीक होत जाते आणि जमिनीचा कसही कमी होत जातो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे येणारे पीक हे कसदार नसते आणि एकूणच उत्पादन कमी होत जाते. नुकत्याच येऊ घातलेल्या कोरोनाच्या महामारीत संचारबंदी असताना मातीच्या परीक्षणाबाबत अनेक समस्या येत होत्या. अशा वेळी बळीराजासाठी हे उपकरण अत्यंत फायद्याचे ठरले.
भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढणेही गरजेचे आहे. उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर होतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. हे सगळे टाळता येण्यासाठी मातीचे परीक्षण नियमित होणे आवश्यक आहे आणि काळे यांनी निर्माण केलेल्या उपकरणाच्या माध्यमातून हे सगळे अगदी सहज शक्य होते.
बदलते पर्यावरणीय संदर्भ लक्षात घेता, आपल्याला बर्याच गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत काळे व्यक्त करतात. शेतीसाठी केवळ माती परीक्षणच महत्त्वाचे नसून शेतीला दिले जाणारे पाणी, हवामान, पिकांचे पोषणद्रव्य यांचादेखील अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी काळे व त्यांची कंपनी अजून काही उत्पादनांवर काम करत आहे.
सध्या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने पावले पडत आहेत. त्यामध्ये बरेचसे उद्योग क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुधारणा करून घेत आहेत. या सर्वात कृषी क्षेत्र का मागे राहावे, या विचारांतून काळे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळीराजाला मदत करण्याचेच धोरण काळे व त्यांच्या कंपनीने अंगीकारले आहे. मागील दोन वर्षांचा विचार करता आणि कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता, जितक्या गोष्टी तंत्रज्ञान समृद्ध करता येतील, तितके उत्तम असल्याचे काळे सांगतात.
कोरोनामुळे खूप नुकसान झालेलेच आहे. पण, संधीही तेवढ्याच उपलब्ध झाल्या आहेत. तसेच लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे. बरेच लोक आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन कृषी आणि ‘मॅन्युफॅक्चरिंग’मध्ये नवीन आधुनिक प्रॉडक्ट्स विकसित करण्याचे कार्य काळे करत आहेत.
उद्योजक जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्याचा उद्योगदेखील सक्षम होत असतो. उद्योजकाने उद्योगवाढीसाठी कोणत्याही एका उद्योगावर अवलंबून न राहता, सर्वच क्षेत्राचा विचार करावा. उद्योगांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा जिथे शक्य असेल तिथे एकत्र येऊन काम करणे अधिक आवश्यक असल्याचे काळे आवर्जून नमूद करतात.
“कुठल्याही संकल्पनेपेक्षा ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तुमची संकल्पना इतरांना सांगा आणि त्यांचे त्याबद्दलचे मत, विचार जाणून घ्या. शक्यता आहे की, तुम्हाला त्यामधून अजून नवीन काहीतरी मिळेल,” असा संदेश ते नवउद्योजकांना देतात.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न होत आहेतच. मात्र, कृषी क्षेत्रालाच केंद्रस्थानी ठेवून बळीराजा हा केंद्रबिंदू ठेवून काळे यांचे कार्य सुरू आहे. कोरोनासारख्या परिस्थितीमधून नवे काही शिकत पुढे जाण्याचा काळे यांनी चंग बांधला आहे.
निर्णायक भूमिका, उत्साह, कर्मचारीवर्गाप्रति असणारा स्नेहभाव, ज्ञान वृद्धिंगत करण्याची असणारी आस, यामुळेच काळे यांचे कार्य आजमितीस अनेकांना मदतगार सिद्ध होत आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!