अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास शिंगावरच घेतले जाईल, असा संदेश नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना आपल्या एका साध्याशा कृतीतून दिला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी चीनचे प्रमुख विरोधक आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांसह आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, विश्लेषकांत मोदींच्या शुभसंदेशाचीच चर्चा सुरू होती.
चीनने आक्रस्ताळेपणा केल्यास आमच्याकडे ‘तिबेट कार्ड’ आहे, असेच भारताने यातून सूचित केल्याचेही अनेक जागतिक घडामोडींसंदर्भातील तज्ज्ञांनी म्हटले. अर्थात, त्यात काही चुकीचे म्हणता येत नाही. कारण नुकताच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचा शतक महोत्सव तियानमेन चौकात साजरा करण्यात आला. शतक महोत्सवादरम्यान चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी उपस्थितांसह जनतेच्या मनात राष्ट्रवादाची लाट निर्माण करण्यासाठी, कोणत्याही देशाने आमच्यावर प्रभाव टाकण्याचा वा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठेचून काढू, अशी धमकीच दिली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलाई लामांना दिलेल्या शुभेच्छा महत्त्वाच्या ठरतात.
नरेंद्र मोदींनी दलाई लामांच्या ८६ व्या जन्मदिनी दूरध्वनीवरून संवाद साधत मंगलकामना व्यक्त केली. तथापि, मोदींच्या शुभेच्छा केवळ दलाई लामांपुरत्याच होत्या, असा मर्यादित अर्थ घेता येत नाही. तर संपूर्ण तिबेटसाठीही त्यातून एक संदेश दिला गेला. नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून दलाई लामांना शुभेच्छा दिल्याच; पण ट्विटरवरही जाहीरपणे, “मी आताच दलाई लामांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्या ८६ व्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही त्यांच्या दीर्घ आणि सुखी जीवनाची कामना करतो,” असे म्हटले. मोदींनी शुभसंदेश दिल्यानंतर केंद्र सरकारमधील तमाम मंत्र्यांनीदेखील तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना शुभेच्छा देणे सुरू केले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, हरदीपसिंह पुरी यांचा समावेश आहेच. पण, सर्वात महत्त्वाचा संदेश परराष्ट्र सचिव हर्ष श्रुंगला आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे प्रमुख अतुल केशप यांचा म्हटला पाहिजे. दोन्ही अधिकारी परदेशात भारताचा ध्वज फडकावतात आणि त्यांनी दलाई लामांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देणे भारत आणि तिबेटच नव्हे, तर संपूर्ण जगात केंद्रस्थानी राहणार, हे नक्की!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या एकाच डावाने चिनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना धाराशायी केले आहे. अर्थात, त्यासाठी चीन आपल्या ‘ग्लोबल टाईम्स’ या मुखपत्राचा आधार घेतो आणि त्यातूनच तडफड व्यक्त करत असतो. आताही असेच झाले आणि ‘ग्लोबल टाईम्स’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी लेख प्रकाशित केला. लेखाचे शीर्षक, Birthday greetings to Dalai Lama a futile attempt to show attitude to China म्हणजे ‘दलाई लामांना जन्मदिनाच्या शुभेच्छा, चीनला हीन ठरवण्याचा आणखी एक निरर्थक प्रयत्न‘ असे होते. त्यात लिहिले की, या उपायाने काहीही साध्य होणार नाही, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताने आधीच चीनसमोर गुडघे टेकले आहेत. ही चाल त्यांचे विचार दर्शवते. ‘ग्लोबल टाईम्स’ने आपल्या या लेखातून प्रामुख्याने भारताविषयीचा जळफळाट जाहीर केला आहे. ‘ग्लोबल टाईम्स’च्या शब्दांमागे शी जिनपिंग यांच्याच भावना असतात, यात कसलीही शंका नाही. त्याच लेखातून व्यक्त झाल्या. मात्र, मुत्सद्देगिरीच्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका दूरध्वनीने चिनी कम्युनिस्ट पक्षाला बॅकफूटवर आणल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी गलवान खोर्यात भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता व यात चीनचे किती सैनिक मारले गेले, त्याचा खरा आकडा चीनने अजूनही सांगितलेला नाही. त्यानंतरच भारताने आपल्या निर्णयांनी चीनला आर्थिक आणि राजकीय नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न केले. पण, हा हल्ला चीनकडून केल्या जाणार्या बेकायदेशीर विस्ताराच्याही वरचढ होता. कारण चीन तिबेटला आपला भाग मानतो आणि पुढच्या दलाई लामांची नियुक्ती स्वतःच करू इच्छितो, जेणेकरून तिबेटवर त्याची मगरमिठी आणखी घट्ट होईल. तथापि, दलाई लामा आणि जगभरातील तिबेटी लोकांच्या मते, पुढच्या दलाई लामांची निवड करण्याचा अधिकार चीनकडे नव्हे, तर तिबेटींकडेच आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छा रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मोदी तिबेटच्या राजकारणात रस घेत असल्याचे मानले जात असून भारत आणि चीनच्या इतिहासातील हे सर्वाधिक धाडसी आणि प्रशंसनीय पाऊल असेल.