उत्तर प्रदेशात विरोधक आपली ताकद आधीच गमावून बसले आहेत. त्यातून ते अद्याप सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या बाजूनेच उत्तर प्रदेशातील जनता पुन्हा उभी राहील, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्या राज्यात भाजपच्या जवळपासही कोणी दिसत नाही!
उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुशासनावर तेथील जनतेचा विश्वास असल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. त्या राज्यात जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुतांश जागा भाजप आणि भाजपच्या समर्थनावर उभ्या असलेल्या उमेदवारांना मिळाल्या आहेत. मध्यंतरी, उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्वबदल होणार, अशी चर्चा माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. पण, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जे ताजे यश मिळाले, ते पाहता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, असे म्हणता येईल. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश पाहता, योगी आदित्यनाथ आणि भाजपची राज्यावर पकड कायम असल्याचे दिसून येत आहे.
योगी आदित्यनाथ सरकारकडून राज्यातील गुंडांचा बंदोबस्त करण्याचे जे काम केले जात आहे, त्यामुळेही तेथील जनता खूश आहे. तसेच योगी आदित्यनाथ सरकारकडून विविध विकासकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शैक्षणिक क्षेत्रासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. आता राज्याचा आरोग्य विभाग अधिक सुदृढ करण्याच्या हेतूने येत्या ९ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या वर्षअखेरपर्यंत आणखी चार वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत होणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली.
उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय असायला हवे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाटते. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या या राज्यामध्ये २०१७पर्यंत अवघी १२ वैद्यकीय महाविद्यालये होती. पण, योगी आदित्यनाथ सरकारच्या कारकिर्दीत ही संख्या आतापर्यंत ४८वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार ज्या गतीने काम करीत आहे, त्याची कल्पना या वैद्यकीय महाविद्यालयांच्या उदाहरणांवरून यावी.
उत्तर प्रदेशातील गुंडगिरीस पायबंद घालण्यासाठी, आधीच्या सरकारच्या काळातील ‘जंगलराज’ नेस्तनाबूत करण्यासाठी योगी सरकारने केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे आता तेथील ‘जंगलराज’ संपुष्टात आले आहे. “तुम्ही गुन्हा केला तर त्याबद्दल तुम्हास जबर शासन केले जाईल,” असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी गुंडगिरी करणार्यांना मार्च २०१७ मध्येच दिला होता. प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी ते दाखवून दिले. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचा योगी सरकारने कसा बंदोबस्त केला, त्याची कल्पना पुढील आकडेवारीवरून येईल. मार्च २०१७ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत १०३ गुन्हेगारांची हत्या करण्यात आली, तर या घटनांमध्ये १,८५९ गुंड जखमी झाले. या दोन वर्षांच्या कालावधीत १७ हजार ७४५ गुन्हेगार एक तर शरण आले किंवा त्यांचा जामीन रद्द करण्यात आल्याने त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली.
योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लीम धर्मगुरूंकडून जे धर्मांतराचे ‘रॅकेट’ चालविले जात होते, त्याचा अलीकडेच पर्दाफाश केला. उत्तर प्रदेशात सहा ठिकाणी कारवाई करून आदित्यनाथ सरकारने धर्मांतराच्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढली. मोहम्मद उमर गौतम, त्याचा मित्र मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि त्यांच्या टोळीतील अन्य सदस्यांनी, पैशांचे आमिष दाखवून अनेकांचे धर्मांतर केल्याचे लक्षात आले. अंमलबजावणी संचालनालयाच्या हातीही या धर्मांतर प्रकरणाशी संबंधित अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हाती लागली आहेत. मात्र, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने मोहम्मद उमर गौतम निरपराध असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी याने मोहम्मद उमर गौतम निरपराध असल्याचे आणि त्यास खोटेनाटे आरोप करून धर्मांतर प्रकरणात गोवले असल्याचे म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने जी अनेक विकासकामे हाती घेतली आहेत, त्यामुळे त्या सरकारची लोकप्रियता वाढत आहे. तसेच उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ बनविण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्या प्रयत्नांचेही स्वागत होत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. भाजपचे विरोधक अजून आपल्या मागील निवडणुकीतील पराभवाचा ताळेबंद मांडण्यामधून बाहेर पडलेले नाहीत! त्या सर्व पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशामध्ये योगी सरकारची वेगाने घोडदौड सुरू आहे. राज्यातील जनतेचे या सरकारला भक्कम समर्थन असल्याचे विविध घटनांवरून दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात विरोधक आपली ताकद आधीच गमावून बसले आहेत. त्यातून ते अद्याप सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या बाजूनेच उत्तर प्रदेशातील जनता पुन्हा उभी राहील, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्या राज्यात भाजपच्या जवळपासही कोणी दिसत नाही!
‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित तरुणांचा केरळच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न
‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित असलेले दहशतवादाचा पुरस्कार करणारे तरुण केरळ विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ पाहत असल्याचे वृत्त आहे. त्या विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत असे 1,042 अर्ज आले असल्याची माहिती आहे. या अर्जातील बहुतांश अर्ज हे सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान या देशांमधून आले आहेत. सध्या परदेशात दडून बसलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याने ‘हिजरा थिअरी’चा पाठपुरावा केला होता. त्याच्या या सिद्धान्तानुसार, त्याने मुस्लिमांनी मोठ्या संख्येने केरळमध्ये स्थानांतर करावे, असे आवाहन केले होते. त्या राज्यात मुस्लीम मोठ्या संख्येने वाढले की, तेथील लोकसंख्येचे प्रमाण बदलून जाईल, असे त्यामागील गणित आहे. केरळमध्ये आधीच जहाल मुस्लीम संघटनांनी आपले हातपाय पसरले आहेत. त्यांच्याकडून तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर ‘इसिस’ संघटनेच्या सदस्यांनी केरळ विद्यापीठात प्रवेश घेण्यात यश मिळविले तर केरळमध्ये दहशतवादी कारवाया वाढण्यास मदत होणार हे सांगायला नकोच! या सर्व प्रकारचा कडक तपास करून दहशतवाद्यांचा हा जो डाव आहे तो सरकारने उधळून टाकायलाच हवा!