शाश्वत विकासाचा ध्यासकर्ता

05 Jul 2021 23:24:51

Nikhil Kulkarn_1 &nb
 
 
 
पसंतीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडत त्यात शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेल्या नाशिक येथील निखील कुलकर्णी यांच्याविषयी....
 
करिअरची दिशा ठरविताना अनेक जण घरातील सदस्य ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या क्षेत्राला पसंती देताना दिसतात किंवा मित्र, मैत्रिणी ज्या दिशेने जातील त्या दिशेने करिअर करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र, पहिल्यापासूनच आपली आवड असणारे क्षेत्र हेच करिअर म्हणून निवडणारे आणि त्यात कार्य करत शाश्वत विकासाचा ध्यास घेणारे निखील कुलकर्णी यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व खचितच दृष्टिपथास पडते.
 
 
 
मूळचे नाशिक येथील असणारे कुलकर्णी हे सध्या पुणे येथे ‘विप्रो’ कंपनीत कार्यरत आहेत. ‘बीई’ (पेट्रोलियम)- ‘एमआयटी’ पुणे येथून, ‘एमबीए’ - ‘आयआयटी’ पवई आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी येथून (संयुक्तरीत्या) असा कुलकर्णी यांचा शैक्षणिक आलेख आहे. ऊर्जा आणि ऊर्जेशी निगडित क्षेत्रात, मुख्यत्वेकरून ‘खनिज तेल आणि नैसर्गिक वायू’ या विषयात २००९ पासून आणि ‘स्टार्टअप’ या विषयात २०१० पासून ते कार्यरत आहेत. ऊर्जा आणि वाहन या विषयांत त्यांना बालपणापासूनच रस होता. त्यांच्या घरातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तरीही कुलकर्णी यांनी आपला विषय निवडून त्यातच कार्य करण्याचे मनस्वी ठरविले होते. त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणी यांचा कल हा ‘कॉम्प्युटर’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स’ वगैरे विषयात अधिक होता. मात्र, कुलकर्णी यांना ऑटोमोबाईल किंवा ऊर्जा या क्षेत्रात अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे होते. मात्र, भारतात ऑटोमोबाईल आणि ऊर्जा हे अभियांत्रिकीचे विषय त्यावेळी दोन्ही उपलब्ध नव्हते. त्यावेळी कुलकर्णी यांनी या दोन्ही विषयांना सांगड असणारा विषय म्हणून पेट्रोलियमची निवड केली.
 
 
 
‘एमआयटी’मध्ये शिक्षण घेताना त्यांना तेथील वातावरण डॉ. कराड, डॉ. क्षीरसागर आदीसारख्या गुरूंचे मिळालेले सान्निध्य हे कुलकर्णी यांच्या जीवनात मोलाची भूमिका बजाविणारे ठरले. ‘विप्रो’मध्ये ‘एनर्जी अ‍ॅण्ड नॅचरल रिसोर्सेस’ या विभागात काम करत असताना जगभरातील विविध एनर्जी कंपन्यांसोबत काम करण्याची संधी कुलकर्णी यांना मिळत आहे. त्यात नवीन ‘डिजिटल टेक्नोलॉजी’ शोधणे, प्रचलित पद्धतींवर प्रयोग करणे आणि अशा ‘टेक्नोलॉजी’चा वापर करून स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी) निर्माण होण्यास मदत करणे, अशा पद्धतीचे काम कुलकर्णी करत आहेत. तसेच ते जगभरातील विविध खनिजतेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रात काम करणार्‍याा कंपन्यांना पर्यावरणाचा र्‍हास न होऊ देता उत्खननासाठी ‘डिजिटल टेक्नोलॉजी’च्या साहाय्याने नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी आणि कार्यरत करण्यासाठीदेखील काम करीत आहेत. ‘एसपीई’च्या संचालक मंडळाच्या तरुण आणि विद्यार्थी यांच्यासाठी असलेल्या ‘यंग मेम्बर्स एंगेजमेंट कमिटी’ या विशेष उच्चस्तरीय समितीचे सदस्यदेखील आहेत, तसेच मुंबई विभागाचे ते संचालक आहेत. या माध्यमातून ते जगभरात ‘एनर्जी ट्रान्सिशन’ आणि ‘युनायटेड नेशन्स’च्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ उद्दिष्टांविषयी जागरूकता येण्यासाठी उपक्रम राबवित आहेत. जगभरातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी होणारे उपक्रम आणि त्याचे नियोजन हेदेखील ‘एसपीई’च्या माध्यमातून करीत आहेत. वैयक्तिकरीत्या विविध क्षेत्रातील ‘स्टार्ट अप्स’ना ‘मेंटॉरिंग’ करीत आहेत आणि विविध विषयांत मार्गदर्शन करीत आहेत.
 
 
 
तेलकिमतीत होणार्‍या चढ-उतारांमुळे अनेकदा या क्षेत्रातील तरुण तसेच अनुभवी व्यक्तींनादेखील संकटांना सामोरे जावे लागते. अशा सर्वांना ‘मेंटॉरिंग’ करणे, तसेच नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि नवीन कार्याकार्यपद्धती शिकून त्या अंगीभूत करणे, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचे कार्य या क्षेत्रातील व्यक्तींसाठी मोफत करीत आहेत. निसर्गाची हानी होऊ न देता पर्यायी ऊर्जास्रोतांवर अनेक ठिकाणी संशोधन होत आहे. वाहनांमधील इंधनाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी खनिजतेल महत्त्वाचे आहे. डांबरनिर्मिती, चश्म्यासाठी लागणारी काच, विविध प्रकारचे प्लास्टिक अशा अनेक ठिकाणी खनिजतेलाचा उपयोग होतो. प्रत्येक गोष्टीसाठी पर्याय आहेत. मात्र, कोणताही पर्याय जागतिक स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्याएवढ्या स्तरावरदेखील पोहोचलेला नाही. आता जगातील सर्वच कंपन्या या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत आणि ऑईल आणि गॅस कंपन्या ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक कंपनीचा प्रयत्न हा पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, असे काम करण्याचाच असल्याचे कुलकर्णी सांगतात.
 
“संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून विद्युत वाहने, कार्बन उत्सर्जन कमी होण्याकामी कायदे, अशी उपाययोजना केली जात आहे. आगामी काळात हे जगात खूप महत्त्वाचे बदल घडवतील,” असे कुलकर्णी सांगतात. विद्यार्थ्यांना आणि युवकांना हे माहीत व्हावे, यासाठी उपक्रम राबविणे, ‘डिजिटल टेक्नोलॉजी’च्या माध्यमातून ‘सस्टेनेबल एनर्जी’चे प्रकल्प राबविणे आदी कार्य कुलकर्णी करत आहेत. त्यांना ‘टीडब्ल्यूए’ आंतरराष्ट्रीय मासिकातर्फे ‘एनर्जी इन्फ्ल्युएन्सर पुरस्कार’, ‘सोसायटी ऑफ पेट्रोलियम इंजिनिअर्स’चा प्रतिष्ठेचा ‘आशिया पॅसिफिक क्षेत्रा’चा ‘विशेष सेवा पुरस्कार’देखील घोषित झाला आहे. सध्या वाढणार्‍या इंधनदरावर पुरवठाप्रणालीत होणारी गळती कमी करणे, गाळ म्हणून राहणार्‍या तेलाचे प्रमाण कमी करणे, पर्यायी इंधनाचा वापर करणे हे उपाय असल्याचे कुलकर्णी आवर्जून नमूद करतात. ‘ऑफबीट करिअर’ निवडून पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी कार्य करणार्‍या कुलकर्णी यांस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0