मुंबईसह राज्यभरात पावसाचे आगमन झालेले असून तो चांगलाच बरसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतून देशभर पसरलेल्या रेनकोट, रेनसूट्स, रेनविअर, वाईन्डचिटर, छत्री निर्मितीच्या उद्योगाचे संचालन करणार्या मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांच्याविषयी आपण जाणून घेऊया.
सृष्टी सृजन स्वरुपात कार्यरत होते, तो ऋतू म्हणजे पावसाळा. त्याच्या याच वैशिष्ट्यामुळे अनेकांना पावसाळा अतिशय आवडतो. पाऊस सुरु झाला की, कित्येकांचे मन आनंदाने नाचू लागते. पण पहिल्या पावसाचा भर ओसरला की, पावसात भिजण्याची इच्छा कुठल्या कुठे लोप पावते. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नोकरदार, रोजंदारीवर काम करणारे कामगार, अशा सर्वांचीच आपल्या कामाच्या वेळांत पावसापासून बचावाची धांदल उडते. पावसात भिजल्याने कित्येकांना सर्दी-पडसे, ताप आणि इतरही अनेक आजारांची सोबत होण्याचा धोका संभवतो. परंतु, अशा रिमझिम पाऊस असो वा मुसळधार पाऊस असो, त्याच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्याचा उपाय म्हणजेच रेनकोट वा रेनसूट्स वा रेनविअर अथवा छत्री.
आता मुंबईसह राज्यभरात पावसाचे आगमन झालेले असून तो चांगलाच बरसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतून देशभर पसरलेल्या रेनकोट, रेनसूट्स, रेनविअर, वाईन्डचिटर, छत्रीनिर्मिती उद्योगाचे संचालन करणार्या मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांच्याविषयी आपण जाणून घेऊया.
मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट मुंबईतील रेनकोट, रेनसूट्स, वाईन्डचिटर, छत्री तयार करणार्या मर्चंट घराण्याचे वारस. त्यांच्या कंपनीचे नाव ‘रिअल रेनविअर प्रायव्हेट लिमिटेड.’ कंपनीची स्थापना मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांचे वडील अब्दुल लतीफ हाजी उमर मर्चंट यांनी १९७६ साली केली, तर घराण्याची तिसरी पिढी म्हणजे सलमान मर्चंट हेदेखील ‘रिअल रेनविअर’ कंपनीच्या व्यवसायात हातभार लावत आहेत. म्हणजे गेली जवळपास 44 वर्षे मर्चंट कुटुंब ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. मात्र, एखादा उद्योग चार दशकांहून अधिक काळ सुरळीत चालतो, त्यामागे संघर्ष, परिश्रम आणि समर्पणाची वृत्तीही असावी लागते. तशी वृत्ती मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांच्या वडिलांमध्ये होती म्हणूनच ते ‘रिअल रेनविअर’चा पाया उभारु शकले. त्या काळात शून्यातून एक नवी सुरुवात करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आर्थिक अडचणीपासून, दळणवळण, कामगारविषयक अशा वेगवेगळ्या अडचणींचा त्यांनी सामना केला. त्यातूनच ‘रिअल रेनविअर’ची उद्योगजगतात आश्वासक वाटचाल सुरु झाली. तसेच कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी केवळ मुंबईचा नाही, तर देशाचा विचार केला व देशभरातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचतील, याची काळजी घेतली. परिणामी, ग्राहकांनीही ‘रिअल रेनविअर’च्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद दिला.
दरम्यान, अब्दुल लतीफ हाजी उमर मर्चंट यांच्यानंतर पुढल्या काळात मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांनी ‘रिअल रेनविअर’चा डोलारा सांभाळला आणि वाढवलाही. ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवा कमी किमतीत कशाप्रकारे मिळतील, याची काळजी त्यांनी घेतली. तसेच सलमान मर्चंट हेदेखील या सगळ्या कामात सहभाग घेत असतात. आपल्या कंपनीने सुरुवातीपासूनच देशभरातील सर्वच राज्यांत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे मर्चंट कुटुंब मोठ्या अभिमानाने सांगते. त्यासाठी प्रत्येक राज्यात ‘रिअल रेनविअर’च्या वितरकांचे जाळेही त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर ‘रिअल रेनविअर’ची रेनकोट, रेनसूट्स अशी विविध उत्पादने परदेशातही निर्यात केली जातात. उत्तम दर्जा असल्याने ‘रिअल रेनविअर’च्या उत्पादनांना देशात तर मागणी असतेच, पण परदेशांतूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.
आपल्या उद्योगाच्या यशाचे रहस्य सांगताना मर्चंट म्हणतात की, “आम्ही प्रत्येक ग्राहकाचा वैयक्तिकरीत्या विचार करतो. ग्राहकांना काय आवडेल आणि आपण ते कसे पुरवू, याची काळजी आम्ही घेतो. तसेच आमची उत्पादने सर्वसामान्य व्यक्तीपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण खरेदी करु शकेल, अशीच असतात. उच्च गुणवत्ता, किफायतशीर किमतीमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यातूनच उद्योग वाढत आहे.”
दरम्यान, ‘रिअल रेनविअर’बद्दल सलमान मर्चंट सांगतात की, “आपल्या आजोबांना उद्योग सुरु करताना जो संघर्ष करावा लागला, तो आपल्याला फारसा करावा लागला नाही.” तथापि, हा झाला सामान्य काळातील प्रकार, पण आताच्या कोरोना प्रादुर्भावाने इतर अनेक उद्योगांप्रमाणे ‘रिअल रेनविअर’लाही फटका बसला. कोरोनामुळे उद्योगात बर्यापैकी शैथिल्य आले. उत्पादनांच्या विक्रीवर मर्यादा आल्या. सोबतच कच्च्या मालाच्या किमती मात्र वाढत होत्या. कामगारांचीही मोठ्या प्रमाणावर अनुपलब्धता होती, तसेच आहे त्या कामगारांची रोजंदारी मात्र वाढलेली होती. त्यानेही उद्योगावर विपरित परिणाम झाला. पण, परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य असल्याने मर्चंट कुटुंबाने त्यातूनही मार्ग काढला. उल्लेखनीय म्हणजे, कोरोनाच्या काळात त्यांच्या ‘रिअल रेनविअर’ कंपनीने ‘पीपीई किट’ तयार करण्याचेही काम सुरु केले. त्यात त्यांना यशही मिळाले व ‘पीपीई किट’चे उत्पादन, विक्री मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी केली.
दरम्यान, आपला व्यवसाय बारमाही नसून हंगामी किंवा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चालणारा असल्याचे मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट सांगतात. पावसाळ्यात त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांना चांगली मागणी असते. बाजारपेठांतील दुकानांपासून बदलत्या काळानुसार ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळावरही त्यांनी आपली उत्पादने उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्या हव्या असलेल्या उत्पादनांची अगदी घरबसल्या ‘ऑनलाईन’ खरेदीही करू शकतात. पण, हंगामी व्यवसाय असल्याने त्यांच्याकडील कामगारदेखील हंगामीच असतात. तरीही त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या कुटुंबाचा गाडा हाकला जातो, हे निश्चित. पावसाळी कपड्यांच्या उत्पादन क्षेत्रात आपला निराळा ठसा उमटवणार्या ‘रिअल रेनविअर’ कंपनीला ‘इंडिया ५०००’ कडून ‘बेस्ट एमएसएमई अवॉर्ड २०२०’ प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचे श्रेय मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट आपल्या ग्राहक आणि व्यवसाय भागीदारांना देतात. यावरुन आगामी काळातही मोहम्मद फिरोज अब्दुल लतीफ मर्चंट यांची कंपनी आणखीही चांगली प्रगती करेल, अशी खात्री वाटते.