जुन्याचे सोने करणारा 'रसिक’

28 Jul 2021 21:41:58

Rasik Thakkar_1 &nbs
 
 
 
भंगारासारख्या व्यवसायातून 'करिअर’ घडवत सामाजिक कार्यातही अग्रेसर असणारे रसिक ठक्कर यांच्याविषयी... 
 
 
ठक्कर कुटुंब मूळ गुजरातचे असले, तरी रसिक यांचा जन्म ठाण्यातील. १९५२ साली जन्मलेल्या रसिक हरिदास ठक्कर यांचे बालपण जुन्या ठाण्याच्या मध्यवर्ती भागात ऐषोरामात गेले. शेठ त्रिभुवनदास जमनादास अर्थात टी. जे. हायस्कूल या गुजराती माध्यमाच्या शाळेत जेमतेम ‘एसएससी’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. तरीही गुजरातीसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी ते अस्खलितपणे बोलतात. ‘एसएससी’नंतर वयाच्या १७व्या वर्षीच वडिलांनी सुरु केलेल्या भंगार विक्रीच्या व्यवसायात रसिक रमले. गेली ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी या व्यवसायात स्व:ताची ओळख निर्माण करत व्यवसायातली रसिकता जपली. त्याचबरोबर समाजभानही जपले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाणी, सरकारी कार्यालये, सरकारी बंगले तसेच विविध मान्यवरांच्या घरातील जुनेपुराणे सामानसुमान तसेच डॉक्टर, वकील आर्किटेक्ट आदींच्या घरातील सामानासाठी रसिकभाई यांनाच आवर्जून बोलावले जाते. रसिकभाईच्या गोदामातील फोन खणखणला की, लागलीच रसिकभाई यांचा माणूस स्वतः संबंधितांच्या घरी जाऊन सामान गोळा करून आणतो. या भंगाराच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचा मोठा डोलारा ठाण्यात मध्यवर्ती ठिकाणी उभा केला असून आज त्यांच्याकडे ६० ते ७० भाडोत्री आहेत. ठाणे बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात दोन ते अडीच एकर जागेत रसिकभाई यांचे भंगार सामानाचे साम्राज्य उभे असून यात अनेक दुर्मीळ वस्तू दडलेल्या आहेत.
 
 
 
पोलिसांकडील वस्तूंचा साठा खरेदी करण्यासाठी रितसर निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करतात. यात नक्षीदार प्राचीन तलवारी, भाले, खंजिर, जुने घंगाळ, पितळ-तांब्याच्या धातूंची भांडी अवजड समई, सांबरांची शिंगे आदी शस्त्रांस्त्रांसह अनेक दुर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. घरची गर्भश्रीमंती असतानाही रसिक ठक्कर आजही दुचाकीवरून फिरतात. गेली ५० वर्षे त्यांचे आणि दुचाकीचे सूर जुळलेले आहेत. वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या रसिकभाई यांना सध्या प्रकृती साथ देत नसल्याने सध्या दुचाकीऐवजी रिक्षाच्या साहाय्याने घरून ये-जा करून आपल्या भंगार दुनियेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
 
 
 
बडेबडे सरकारी अधिकारी, आयुक्त आणि लोकप्रतिनिधीमध्ये अनेकजण रसिकभाई यांचा मित्रपरिवार विखुरलेला आहे. बड्या अधिकार्‍यांच्या बदलीनंतर त्यांच्या घरातील सामानसुमानासाठी रसिकभाईंनाच संपर्क साधला जातो. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे धनी असतानाही दिवंगत वडिलांचा भंगाराचा व्यवसाय आजघडीला नेटाने पुढे नेणारे रसिक ठक्कर यांची समाजाशी जुळलेली नाळ अबाधित आहे. भंगारातून सोने निर्माण करणार्‍या या अवलियाकडील अनेक दुर्मीळ वस्तूंमुळे ठाणे-मुंबईसह अनेक ठिकाणची व्यापारी आस्थापने, हॉटेल, दिवाणखाने सजले आहेत. याचे मोल म्हणाल, तर अनमोल! परंतु, रसिकभाई या वस्तूंचे कधीच मोल करीत बसत नाहीत. समोरील व्यक्ती त्यांच्या पसंतीस उतरली की, ते आपल्या भंगाराच्या दुनियेतील सर्वस्व त्याला देऊ करतात. गोदामात गोळा होणार्‍या भंगारातील दुर्मीळ वस्तू, संगणकीय स्पेअर पार्ट, प्लास्टिक, रद्दीपेपर्स व नियतकालिकांचा दुर्मीळ संग्रह आहे. या भंगाराचे विलगीकरण करून वेगवेगळ्या ठिकाणी लॉरी भरून संबधित व्यापारीच घेऊन जात असल्याचे रसिकभाई सांगतात.
 
 
 
ठाणे शहरात लाखांच्या घरात भंगारवाले आहेत. मात्र, ग्राहकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण केले ते म्हणजे रसिकभाई यांनीच. त्यांच्या भंगारवजा गोदामात अनेक मान्यवरांनी पायधूळ झाडली असून अनेकांनी आपापल्या घरातील दिवाणखाने याच भंगारातील दुर्मीळ वस्तूंनी सजवल्याचे रसिकभाई आवर्जून सांगतात. उत्तम पद्धतीने व्यवसाय सांभाळत लोहाणा समाजाच्या माध्यमातून सामाजिक कामात स्वतःला झोकून देणार्‍या रसिकभाईंनी अनेक बेरोजगार युवकांना हाताला काम मिळवून दिले आहे. आयुष्यात सुखी-समाधानी असलेल्या रसिकभाईंचा एकुलता एक मुलगा मेहुल ठक्कर मात्र या भंगाराच्या विश्वापासून अलिप्त आहे. परदेशवारी करून परतलेला मेहुल चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचे रसिकभाई सांगतात.
 
 
 
कोरोना महामारीच्या संकटांना भिडताना रसिकभाई तसूभरही मागे हटले नाहीत. कोणतेही राजकीय अथवा लोकप्रतिनिधी दर्जाचे पद नसताना एक माणूस म्हणून किंबहुना समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेने त्यांनी अनेकाना सहकार्य केले आहे. एखादी अडचण किंवा मदतीसाठी फोन आला की, क्षणाचाही विलंब न करता, दिवस आहे की रात्र हे न पाहता तळमळीने मदतीसाठी धावून जाण्याचा शिरस्ता आजही कायम असल्याचे त्यांचे अनेक हितचिंतक सांगतात. काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातल्या सराफीपेढेत झालेल्या चोरीच्या प्रकरणात चोरांना पकडण्यासाठी रसिक यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्तांनी रसिक यांचा सत्कारदेखील केला होता. ठाणे, मुंबईतच नाही, तर त्यांनी हिंदू धर्मरक्षणाची जबाबदारी समजून अनेक मंदिरे व संस्थांना अर्थरूपी अथवा वस्तुरूपी मदतीचा हात देण्याचे सत्कर्म अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या भंगाराच्या डेपोत भेट देणार्‍या प्रत्येकाचे समाधान होईल, याकडे ते कटाक्षाने लक्ष देतात. कोणताही व्यवसाय श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. तुम्ही निवडलेल्या व्यवसायात प्रामाणिक कष्टाने स्वत:ची ओळख निर्माण करू शकलात की व्यवसायाचीही दर्जा वाढतो. भंगार व्यवसायातून सोन निर्माण करणारे रसिक यांच्या दातृत्वाला सलाम करायला हवा. व्यवसायांबरोबरीने सामाजिक कार्यात सचोटीने अग्रेसर राहत देऊन खूश व्हायचे खाऊन खूश व्हायचे नाही, हा मंत्र ते जपतात. वयाची सत्तरी गाठलेले रसिक आजही कार्यरत आहेत, हे विशेष. त्यांच्या भविष्यातील आरोग्यदायी कारकिर्दीला दै. 'मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...!
 
 
 
Powered By Sangraha 9.0