... हम से बढकर कौन?

23 Jul 2021 23:14:39

Stalin_1  H x W
 
 
हिटलरने ६० लाख ज्यू लोक ठार केले. ‘ऑपरेशन बार्बारोझा’मध्ये अडीच कोटी माणसं ठार मारली. हिटलरच्या मते, ज्यू आणि स्लाव्ह वंशीय लोक त्याचे शत्रू होते. त्यांना मारणे हे क्रौर्यच होते. पण, स्टॅलिनच्या क्रौर्याला काय म्हणावं?
 
 
गेल्या आठवड्यातील ‘विश्वसंचार’ स्तंभातील मजकूर वाचून अनेक वाचकांचे दूरध्वनी आले. ‘ऑपरेशन बार्बारोझा’ या दुसर्‍या महायुद्धातील एका मोहिमेत दोन्हीकडचे सैनिक आणि नागरिक मिळून किमान दोन कोटी माणसं ठार झाली, हा आकडा अनेकांना अविश्वसनीय वाटत होता. अनेकांना ही मानवी इतिहासातली सर्वात मोठी कत्तल वाटली.
 
 
 
खरं तर वस्तुस्थिती याहीपेक्षा भयानक आहे. मानवजातीच्या आधुनिक इतिहासातला पहिला ज्ञात कत्तलबाज म्हणजे चंगेझखान. हा मंगोलियात सन ११५८ साली जन्मला आणि सन १२२७ साली वयाच्या ६९व्या वर्षी मेला. म्हणजे त्याला काही मोठा ‘दीर्घायुषी’ म्हणता येणार नाही. पण, त्याने मंगोलियापासून पोलंडपर्यंतचा भाग जिंकला. जगाचा नकाशा पाहा, आज आधुनिक काळातही हा प्रदेश केवढा अफाट आहे, याचा अनुभव नकाशा पाहून तरी घ्या. चंगेझच्या स्वारीची एक ठरावीक पद्धत होती. एखाद्या भूभागावर तो आणि त्याचं सैन्य टोळधाडीप्रमाणे अगदी तुटून पडायचं. कुणाचाच निभाव त्याच्यासमोर लागत नसे. थोड्याच अवधीत शत्रू शरणागतीचं निशाण फडकवीत असे, आता जिंकलेल्या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित करावी; फार तर थोडीफार कत्तल, लुटालूट करावी; आपली दहशत शत्रूच्या नागरिकांमध्ये निर्माण करावी आणि विजयाचे नगारे वाजवीत माघारी यावं वा पुढच्या राज्याकडे जावं, अशी साधारणपणे विजेत्यांची पद्धत असे. पण, चंगेझची पद्धत वेगळीच होती, जिंकलेल्या नगरातील सर्व पुरुष-(यात छोटे मुलगेसुद्धा आले) तो ठार मारून टाकत असे. सर्व स्त्रिया, यात छोट्या मुलींपासून वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्व आल्या. यांना तो आपल्या सैन्यात वाटून टाकत असे आणि त्या नगरातील एकूण एक मोठी इमारत तो उद्ध्वस्त करून टाकत असे. त्याला संपत्ती लुटण्यापेक्षा आणि बायका पळवण्यापेक्षा माणसांना ठार मारण्यात आणि वास्तूंचा विध्वंस करण्यात मनापासून आनंद वाटत असे. वयाच्या १२व्या वर्षी तो पहिली लढाई लढला असं मानलं जातं. तेव्हापासून पुढच्या ५७ वर्षांच्या आयुष्यात त्याने किती माणसं ठार केली असतील? किमान चार ते सहा कोटी माणसं! आणि हा अगदी काटकसरीने काढलेला आकडा आहे, बरं का!
 
 
 
युरोप-अमेरिकेत अनेक संशोधक अनेक प्रकारची संधोधनं करून त्याची शोधपत्रं कुठल्या-कुठल्या विद्धत् परिषदांमध्ये वाचत असतात. किंवा प्रसिद्ध करत असतात. यातली कित्येक कथित संशोधनं कित्येकदा अत्यंत आचरट पातळीची असतात. अलीकडेच काही काळापूर्वी एका संशोधकाने असं संशोधन मांडलं होतं की, ज्याअर्थी चंगेझने मंगोलिया ते पोलंड या विस्तीर्ण भूप्रदेशातले सगळे पुरुष ठार मारले होते आणि सार्‍या स्त्रिया आपल्या सैन्याला बहाल केल्या होत्या, त्याअर्धी त्या भूप्रदेशातले आजचे सगळे नागरिक हे चंगेझचेच वंशज असले पाहिजेत. वा! काय संशोधन! लै भारी!
 
 
 
दुसरा प्रसिद्ध (!) कत्तलबाज म्हणजे तैमूर. तुमच्या-आमच्या लाडक्या करीना कपूरने आपल्या मुलाला ज्याचं नाव ठेवलंय, तोच तो किमान एक कोटी ७० लाख लोकांना ठार मारणारा उझबेक-तुर्क योद्धा. एका युद्धात त्याच्या पायावर तलवारीचा घाव बसून तो लंगडा झाला म्हणून त्याला म्हणतात ‘तैमूर लंग.’ त्याचा काळ आहे सन १३३६ ते १४०५. आज आधुनिक काळात आपण ज्याला ‘उझबेकिस्तान’ म्हणतो, तो तैमूरचा मूळ देश. त्याने चारी दिशांना लढाया करून मनसोक्त माणसं मारली. सन १३९८ मध्ये तो दिल्लीवर कोसळला. दिल्लीवर त्यावेळी मुहम्मद तुघलख उर्फ वेडा मुहम्मद याच्या घराण्यातला सुलतान नासीरुद्दिन मुहम्मदशाह तुघलख हा राज्य करीत होता. वाटेत आडच्या येणार्‍या राजपूत, जाट आणि मुसलमान सगळ्यांचीच कत्तल उडवीत तैमूर दिल्लीवर आला आणि नासीरुद्दिनचा पराभव करून त्याने किमान एक लाख माणसं एकट्या दिल्ली शहरातच ठार केली. माणसं मारणं आणि त्यांची मुंडकी छाटून त्यांचे मनोरे रचणं, हा त्याचा छंद होता. या अगोदर इराणवरील मोहिमेत त्याने इस्पहान या शहरात अशीच दोन लाख माणसं ठार करून त्यांच्या मुंडक्यांचे मनोरे रचले होते. आता तुम्ही म्हणाल, तैमूरने राजपूत आणि जाटांना ठार करणं समजू शकतं. पण, इराणी लोक आणि तुघलखचे लोक हे तर मुसलमानच होते. मग त्याने त्यांचीही का कत्तल केली? कारण, अगदी साधं आहे. तैमूरच्या मते तो स्वत: आणि त्याचा वंश हे अस्सल मुसलमान होते. बाकी सगळे कमअस्सल होते. अशा या तैमूरचा नातू उलुघ बेग आणि उलुघ बेगचा खापर पणतू म्हणजे आपल्याकडच्या निधर्मी लोकांचा लाडका बाबर.
 
 
असो. आपल्या ‘विचारवंत’ लोकांच्या मते या सगळ्या १२व्या नि १४व्या शतकातल्या गोष्टी झाल्या. तो मध्ययुगीन, मागासलेला कालखंड होता. तेव्हा आधुनिक विचार, विज्ञान, तंत्रज्ञान, मानवतावादी सामाजिक मूल्ये, शोषणविरहित, कल्याणकारी राज्यव्यवस्था अशा कोणत्याच गोष्टींचा मागमूसही नव्हता. तेव्हा आधुनिक काळाबद्दल बोला.
 
 
 
ठीक आहे. आपण आधुनिक काळाकडे बघू. सन १७७५ साली ब्रिटनच्या अमेरिकन वसाहतींनी ब्रिटनविरुद्धच बंड पुकारलं. ते यशस्वी होऊन १७८३ साली अमेरिका हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र निर्माण झालं. हे आधुनिक जगातलं पहिलं खरंखुरं लोकशाही राष्ट्र. तिथे राजे, राण्या, सरदार, ड्यूक, काउंट वगैरे पोकळ खानदानी मंडळी औषधालासुद्धा नव्हती. पुढे १७८९ साली फ्रान्समध्येही राज्यक्रांती होऊन लोकशाही आणण्याचा प्रयत्न झाला. तो फसला. पण, हळूहळू सर्वच युरोपीय देशांमध्ये राजे-राण्यांची सत्ता कमी होत ती लोकप्रतिनिधींकडे जाऊ लागली. त्याच काळात ‘औद्योगिक क्रांती’ होऊन युरोपात आणि अमेरिकेत आर्थिक सत्ता ही भांडवलदार म्हणजे व्यापारी वर्गाच्या हाती गेली. आतापर्यंत राजे-राण्या, सरदार-जमीनदार हा वर्ग सामान्य जनतेवर हुकूमत गाजवत होता. आता भांडवलदार तर अधिकच निर्घृणपणे सामान्य लोकांचं शोषण करू लागले. यावर उपाय म्हणून कार्ल मार्क्स या जर्मन-ज्यू विचारवंताने सन १८४८ साली ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हे पत्रक आणि सन १८६७ ते १८८३ या काळात ‘दास कपिताल’ हा तीन खंडातला ग्रंथ यांद्वारे ‘साम्यवाद’ हे एक नवेच तत्त्वज्ञान मांडले. साम्यवादी व्यवस्थेत कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही, कुणी शोषक नाही, कुणी शोषित नाही. सर्व संपत्ती, उद्योग, शेती सार्वजनिक सामुदायिक मालकीची. सगळेच मालक, सगळेच नोकर.
 
 
 
व्लादिमीर इलिच उल्यानोव्ह उर्फ व्लादिमीर लेनिन नावाच्या बुद्धिमान माणसाने या तत्त्वज्ञानाचा कसून अभ्यास केला. त्याच्याही पेक्षा जास्त अभ्यास त्याचा सहकारी लिआँ ट्रॉटस्की याने केला आणि मग या लोकांनी आपला मायदेश जो रशिया, तिथे असलेली झार सम्राटांची राजेशाही उलथून टाकून, राज्यक्रांती घडवून साम्यवादी राज्यव्यवस्था आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले. १९१७ साली त्यांना त्यात यश मिळालं. क्रांती करताना साम्यवाद्यांनी असंख्य विरोधकांना सरळ ठार मारलं. त्यांची संख्या किमान ५० हजार असावी. १९२० पासून साम्यवादी सरकारची तुलनेने स्थिर अशी राजवट सुरू झाली. लगेच त्यांनी कारखाने, उद्योगधंदे, शेती यांचं राष्ट्रीयीकरण केलं. कालपर्यंत जे शेत माझ्या मालकीचं होतं, त्यात उद्या सरकारने सामुदायिक शेतीच्या नावाखाली आणखी दहा लोक मालक म्हणून आणून उभे केले, तर कोण सहन करेल? त्यामुळे रशियात सर्वत्र साम्यवादी सरकार, जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सत्तेवर आलं होतं, त्याच्याविरुद्ध सर्वसामान्य लोकांनीच बंड पुकारलं. शोषित-वंचितांचे कैवारी असणार्‍या साम्यवाद्यांनी बेधडक गोळ्या झाडल्या आणि आपलेच देशबांधव असलेल्या शोषित, वंचित, शेतकरी, कामकरी यांच्या कत्तली केल्या. रॉबर्ट काँक्वेस्ट या विद्वान अभ्यासकाच्या मते, १९१७ ते १९२४ या लेनिनच्या राजवटीत किमान पाच लाख लोक ठार झाले. १९२४ साली लेनिन स्वत:च मेला.
 
 
 
१९२४ साली जोसेफ जुगाश्विली उर्फ स्टॅलिन याने सत्ता हातात घेतली. १९२४ ते १९३७ या काळात स्टॅलिनने आपला अंमल रेटून बसवण्यासाठी किती माणसं ठार मारली, याचा नेमका अंदाज आजही आलेला नाही. पण, १९३७ साली त्याने खुद्द साम्यवादी सरकार मधल्या, पक्षामधल्या अनेक सहकार्‍यांना, उच्चपदस्थांना ठार मारलं. ११ जून, १९३७ या दिवसापासून रशियन सैन्यात शुद्धीकरण मोहीम सुरू झाली. तीन मार्शल्स, आठ जनरल्स, १३ आर्मी कमांडर्स, ५७ कोअर कमांडर्स आणि ११० डिव्हिजन कमांडर्स यांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या. प्रथम दर्जाच्या लष्करी अधिकार्‍यांची जर ही अवस्था, तर दुय्यम, तिय्यम अधिकारी आणि सामान्य सैनिक किती मारले गेले असतील, याची गणतीच नाही.
 
 
 
त्यामुळेच २२ जून, १९४१ या दिवशी हिटलरने रशियाविरुद्ध जेव्हा ‘ऑपरेशन बार्बारोझा’ सुरू केलं, तेव्हा प्रतिकार करायला रशियापाशी अनुभवी, कुशल सेनापतीच शिल्लक नव्हते. त्यामुळे पहिल्या धडाक्यातच जर्मनीने रशियाची तीन हजार विमानं आणि १,२०० रणगाडे नष्ट करून दीड लाख सैनिक कैदी बनवले.
 
 
 
पुढे जुलै १९४५ मध्ये जर्मनीच्या जिंकलेल्या प्रदेशात पॉट्सडॅम या शहरात ब्रिटन, अमेरिका, रशियात या विजेत्या राष्ट्रांची बैठक भरली. तेव्हा अनौपचारिक गप्पा मारताना स्टॅलिनने अगदी अभिमानाने चर्चिलला सांगितलं की, “आत्तापर्यंत मी किमान एक कोटी माणसं, साम्यवादी राज्यव्यवस्थेला विरोध करताना म्हणून ठार केली.”
 
 
हिटलरने ६० लाख ज्यू लोक ठार केले. ‘ऑपरेशन बार्बारोझा’मध्ये अडीच कोटी माणसं ठार मारली. हिटलरच्या मते, ज्यू आणि स्लाव्ह वंशीय लोक त्याचे शत्रू होते. त्यांना मारणे हे क्रौर्यच होते. पण, स्टॅलिनच्या क्रौर्याला काय म्हणावं? १९२४ ते १९४५ पर्यंत त्याने मारलेली एक कोटी माणसं हे त्याचे देशबांधवच होते, शत्रू नव्हते आणि पुढे नऊ वर्षं म्हणजे १९५३ पर्यंत, स्वतः मरेपर्यंत त्याने आणखी किती माणसं मारली? अजून तरी माहीत नाही. पण, हे सगळं आधुनिक, पुढारलेल्या वगैरे २०व्या शतकात घडलं बरं का!
 
 
 
Powered By Sangraha 9.0