कासच्या पठारावरील वनस्पतींची खडान्खडा माहिती असणारे आणि आपल्या वनसेवेतील 36 वर्षे वनस्पतींची माहिती गोळा करणारे निवृत्त वनकर्मचारी श्रीरंग पांडुरंग शिंदे यांच्याविषयी...
’जंगल ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे’ या बीद्रवाक्यासह वनसेवेतील आपली ३६ वर्षे पूर्ण करणारा हा माणूस. ’युनेस्को’च्या नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कासच्या पुष्प पठारावरचा हा वाटाड्या. मनाला मोहून टाकणार्या कास पठारावरील फुलांची माहिती देणारा. दहावीपर्यंत शिकूनही ३०० हून अधिक वनस्पतींची इंग्रजी शास्त्रीय नावे तोंडपाठ असलेला. वनमजूर म्हणून वन विभागात रूजू झाल्यानंतर स्वस्थ न बसता या माणसाने अट्टाहासाने वनस्पतींची माहिती जाणून घेतली. त्यांची नोंद करुन ती मुखोद्गत केली. कास पठाराच्या भेटीला येणारे पर्यटक, संशोधक आणि अधिकार्यांचा हा शिक्षक. वन विभागाला आपली ३६ वर्षांची सेवा देऊन नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. कासच्या फुलांसारखांचा प्रसन्न असलेला हा माणूस म्हणजे श्रीरंग शिंदे.
शिंदे यांचा जन्म मार्च, १९६३ रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी येथे झाला. गावापासून नऊ-दहा किलोमीटर पायपीट करुन ते महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या शाळेत जायचे. या शाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या आजोबांना वनस्पतींविषयीचे ज्ञान होते. शिवाय त्यांच्या आईलादेखील वनस्पतींची माहिती तोंडपाठ होती. त्यामुळे शिंदे यांनादेखील वनस्पतींमध्ये आकर्षण निर्माण झाले. दहावीच्या शिक्षणानंतर १९८१ साली त्यांना ’भारती विद्यापीठा’मध्ये महाविद्यालयीन शिक्षणाकरिता प्रवेश मिळत होता. मात्र, गाठीशी पैसे नसल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. 1982 साली शिंदे हे वन विभाागामध्ये वनमजूर म्हणून रुजू झाले. सातारा जिल्ह्यातील बामणोली वनपरिक्षेत्रामध्ये त्यांची नियुक्ती झाली. सतत शिकण्याची वृत्ती त्यांना व्यस्त बसू देत नव्हती. म्हणूनच त्यांनी वनस्पतींची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. झाडांची नावे लक्षात ठेवण्यासाठी ते त्यांची पाने गोळा करुन त्यावर झाडाचे नाव लिहून ठेवायचे. शिवाय जुन्याजाणत्या लोकांकडून झाडांची माहिती मिळवून ती वहीमध्ये नोंदवून ठेवत.
१९८५ साली शिंदे यांना पदोन्नती मिळाली आणि ते वनरक्षक झाले. वाई तालुक्यामध्ये ते काम करु लागले. खेडेगावांमध्ये फिरुन लोकांकडून झाडाझुडपांची माहिती गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. १९९७ साली शिदेंची बामणोली मधील डॉ. संजय लिमयेंशी भेट झाली. त्यांनी डॉ.लिमयेंसोबत जंगलामध्ये फिरण्यास सुरुवात केली. शिंदे हे लिमयेंना झाडांची स्थानिक माहिती द्यायचे. त्याबदल्यात लिमये हे शिदेंना त्या झाडाचे इंग्रजी शास्त्रीय नाव शिकवायचे. प्रसंगी ते नाव लक्षात न राहिल्यास त्यांना फटकेही द्यायचे. एकाअर्थी लिमये हे शिंदेंचे गुरुच झाले. २००२ साली शिंदेंनी लिमये यांच्यासोबत १४ दिवसांची कोयना ते महाबळेश्वर पट्ट्यामधील जंगलामध्ये अभ्यास सहल केली. या सहलीमध्ये लिमयेंनी शिंदेंना प्राणी आणि पक्ष्यांचे झाडांबरोबर असलेल्या सहजीवनाचे ज्ञान दिले. या सहलीनंतर खर्या अर्थाने शिंदे यांनी लिमयेंना गुरु म्हणून स्थान दिले. मात्र, २००४ साली लिमये हे इंडोनेशियाच्या दौर्यावर असताना त्याठिकाणी आलेल्या त्सुनामीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिदेंसाठी हा एक धक्का होता. कारण, वनस्पतींची शास्त्रीय अर्थाने ओळख करुन देणारा गुरु त्यांनी गमावला होता.
२००३ साली सातार्याच्या विभाागीय वन अधिकारीपदी आलेले सुनील लिमये यांनी शिंदेंना जंगल भटकंतीसाठी मोकळीक दिली. याकाळात शिंदेंनी सातारा आणि आसपासच्या परिसरात असलेल्या सड्यांवर फिरुन वनस्पतींची माहिती जाणून घेतली. सह्याद्रीसोबतच विदर्भातील जंगलांमध्येही फिरण्याची संधी शिंदेंना मिळाली. तिथल्या देखील वनस्पतींची माहिती त्यांनी आपल्या गाठीशी बांधून घेतली. २००४ साली त्यांची भेट अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्याशी झाली. त्यांच्यासमेवत जंगल भ्रमंतीच्या निमित्ताने वासोट्याच्या जंगलात घालवलेल्या एक रात्रीमध्ये शिंदेंना अनेक गोष्टी समजून घेता आल्या. शिंदेंचे वनस्पतींचे ज्ञान पाहून ’शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वनसेवा दे’ असा सल्ला अरण्यऋषींनी त्यांना दिला. याचदरम्यान डॉ. लिमयेंसोबत शिंदे हे कासच्या पठारावर गेले होते. त्याचवेळी लिमयेंनी तेथील काही वनस्पतींची माहिती शिंदे यांना दिली होती. मात्र, २००५ साली ’फ्लॉवर ऑफ सह्याद्री’ हे पुस्तक हाती लागल्यावर शिंदे कासकडे आकर्षित झाले आणि या पुस्तकातील माहिती वाचून त्यांना कासवर फिरण्यास सुरुवात केली.
२००७ साली अधिकारी एम. के. राव सातार्यामध्ये आल्यावर त्यांनी शिंदे यांचे कौशल्य पाहून प्रोत्साहन दिले. २००७ ते २०१३ या काळात शिंदे यांनी सह्याद्रीमधील जंगलात फिरुन तिथल्या वनकर्मचार्यांसाठी वनस्पतींविषयी मार्गदर्शन दिले. २०१० साली कासला ‘युनेस्को’चा नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी आलेला चमू शिंदे यांचे वनस्पतीसंदर्भातील ज्ञान पाहून अवाक झाला. याचीच परिणती म्हणजे कासवर सापडलेल्या एका गवताच्या नव्या प्रजातीला शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. आज त्यांना ३०० हून अधिक वनस्पतींची शास्त्रीय नावे, स्थानिक नावे आणि त्यांचे उपयोग तोंडपाठ आहेत. कासवरील येणार्या प्रत्येक पाहुण्याचे ते वाटाडे आहेत. या पुष्पपठारावर आढळणार्या १३२ प्रजातींच्या वनस्पतींची माहिती त्यांनी मुखोद्गत आहे. आजवरच्या कामासाठी त्यांना १० पुरस्कार मिळाले आहेत.. २०१५ साली त्यांचे ‘सह्याद्रीचा वसा - कास पुष्पपठार’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. मार्च महिन्यात ते वन विभागामधून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या शिंदे हे ’मी झाड बोलतोय’ या पुस्तकाचे लिखाण करत असून ते प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. आज वन विभागाला शिंदे यांच्यासारख्या निसर्गाशी एकरुप असणार्या कर्मचार्यांची गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!