‘टोकियो ऑलिम्पिक’मधील मिशन महाराष्ट्र : खेळाडूंच्या जिद्दीचा आणि गुणवत्तेचा कस

21 Jul 2021 23:04:03

Olympic_1  H x
 
जपानमधील टोकियो इथे होणार्‍या ‘ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राही सरनौबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे, विष्णू सर्वानन, चिराग शेट्टी आणि उदय माने या सात खेळाडूंसह भारताचे एकूण १२६ खेळाडू सहभागी होत आहेत. ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत पदक जिंकणारे महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे पहिले आणि शेवटचे खेळाडू. १९५२ सालच्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत खाशाबांनी कांस्य पदक जिंकले होते. महाराष्ट्राचा पदकाचा हा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी यंदा चालून आली आहे.
 
 
 
‘एशियाड’ क्रीडास्पर्धेत भारताला ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात सुवर्ण पदक जिंकून देणारी भारताची पहिली नेमबाज, तसेच जागतिक नेमबाजी स्पर्धेतील ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारी पहिली नेमबाज. या व यासारख्या असंख्य पदकांची आणि विक्रमांची मानकरी असणार्‍या खेळाडूला दुखापतीमुळे एकवेळ अशी येते की, ज्या हातानं सुवर्ण पदक जिंकून दिले, त्या हाताला ते पिस्तूल उचलण्याची ताकद राहू नये. हे दुःख थोडं थोडकं म्हणून की काय, त्या खेळाडूला ‘जगज्जेता’ बनविणार्‍या तिच्या कोचचंही आकस्मिक निधन होतं. इतक्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक धक्क्यानंतर एखाद्या खेळाडूच्या करिअरचा शेवट जवळपास ठरलेलाच. पण, हार मानेल तर ती जगज्जेती कसली! फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ती राखेतून पुन्हा उंचच उंच झेप घेते आणि थेट पुन्हा जगज्जेतेपदाला गवसणी घालते. तेसुद्धा ‘जपान ऑलिम्पिक’च्या अवघ्या एक महिनाआधी... एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल, अशा घटना जिच्याबाबतीत घडल्यात आणि विस्मयचकित करणारी यशस्वी झुंज देणारी खेळाडू आहे आपल्या कोल्हापूरची राही सरनौबत. येत्या २३ जुलैपासून जपानच्या टोकियो शहरात ‘ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धेस सुरुवात होत आहे. यात महाराष्ट्राच्या सात ‘ऑलिम्पिक’ खेळाडूंसह भारताचे एकूण १२६ खेळाडू सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या या सात खेळाडूंमध्ये राहीकडून महाराष्ट्राला पदकाची सर्वाधिक अपेक्षा ठेवता येईल. मुख्य ‘ऑलिम्पिक’नंतर होणार्‍या ‘पॅराऑलिम्पिक’ स्पर्धेसाठीही महाराष्ट्राचा नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि जलतरणपटू सुयश जाधव पात्र ठरले आहेत.
 
 
 
आधुनिक ‘ऑलिम्पिक’चा निर्माण करता बॅरेन पिएर दी कुबर्तिन असं म्हणाला होता की, “‘ऑलिम्पिक’मध्ये यश-अपयशापेक्षाही महत्त्व असते ते तुम्ही लढत कशी दिली याला. मुळातच संपूर्ण जगातील स्पर्धक सहभागी होत असलेल्या या ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होणेच हा मोठा बहुमान असतो.” १९५२ सालच्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत खाशाबांनी कांस्य पदक जिंकले होते. ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत पदक जिंकणारे महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव हे पहिले आणि शेवटचे खेळाडू. महाराष्ट्राचा पदकाचा हा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी यंदा चालून आली आहे. ‘जपान ऑलिम्पिक’मध्ये नेमबाजीत राही सरनौबत ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात, तर तेजस्विनी सावंत ‘५० मीटर रायफल’ प्रकारात खेळणार आहे.
 
 
तिरंदाजीत प्रवीण जाधव ‘रिकर्व्ह’ प्रकारात एकेरी, सांघिक आणि मिश्र अशा तीन लढतींसाठी पात्र ठरला आहे. ‘अ‍ॅथलेटिक्स’मध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे ‘स्टीपलचेस’साठी पात्र ठरला आहे. ‘नौकानयन’मध्ये विष्णू सर्वानन, ‘बॅडमिंटन’मध्ये चिराग शेट्टी, आणि ‘गोल्फ’मध्ये उदय माने असे महाराष्ट्राचे सात शिलेदार लढाईसाठी सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये जपानमधील टोकियो इथे होणारे हे ‘ऑलिम्पिक’ एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले. या गेल्या एक वर्षात एकंदरच मानवी अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आणि आता २०२१ मध्ये जपानमध्ये नियोजित ‘ऑलिम्पिक’ २३ जुलैपासून सुरू होत आहे. ‘ऑलिम्पिक’ आयोजकांसहित यात सहभागी खेळाडू, क्रीडा संघटक आणि प्रेक्षकांवरही कोरोना प्रतिबंधासाठी अनेक कठोर बंधने लादण्यात आली आहेत. पण, आपल्या दुर्दैम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सार्‍यांनीच यावर मात केलीय. या पार्श्वभूमीवर ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये सहभागी महाराष्ट्राच्या खेळाडूंची बलस्थाने जाणून घेऊया.
 
 
सनसनाटी विजय नोंदविण्याची आणि मोक्याच्या क्षणी डोक्यावर बर्फ घेऊन खेळण्याची हातोटी हे राही सरनौबतचे बलस्थान आहे. २०१० साली वयाच्या १९व्या वर्षी तिनं ‘राष्ट्रकूल’ स्पर्धेत भारताला ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात सुवर्ण पदक जिंकून दिलं आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीनं ती ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात लंडन ‘ऑलिम्पिक’ला पात्र ठरली. या ‘ऑलिम्पिक’ क्रीडा प्रकारात पात्र ठरणारी ती त्यावेळी भारताची पहिली खेळाडू ठरली होती. मात्र, ‘लंडन ऑलिम्पिक’मध्ये ती फारशी प्रभाव पाडू शकली नसली, तरी त्यानंतर २०१३ मध्ये राहीनं ‘२५ मीटर पिस्तूल’ प्रकारात ‘जगज्जेते’पद पटकावून, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान पटकावला. एकामागोमाग एक यशाचे टप्पे सर करत असतनाच राहीला दुखापतीनं गाठलं. पाठ, खांदा आणि मनगटाच्या दुखापतीनं दगा दिला. २०१५ ते २०१६ मध्ये तर हातानं पिस्तूल उचलतानाही राहीला असंख्य यातना व्हायच्या. या दुखापतींना सामोरे जात असतानाच तिचे रशियन प्रशिक्षक अ‍ॅन्थोनी पिड्ड्यूब्नी यांचे निधन झाले. शारीरिक दुखापतींचा सामना करत असलेल्या राहीसाठी हा आघात मोठा होता. पण, राही यातून सावरली. अटीतटीच्या क्षणी अचूक नेम साधण्यात तरबेज असलेली राही २०१८ साली ‘२५ मीटर पिस्तूल’मध्ये ‘एशियाड’ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. दुखापतीमुळे तिला २०१६च्या ‘ब्राझिल ऑलिम्पिक’ला मुकावे लागले होते. अ‍ॅन्थोनी यांच्या निधनानंतर राहीनं आपली कोच म्हणून जर्मनीच्या मुंखबायरची निवड केली. विशेष म्हणजे, ही मुंखबायर २०१२च्या ‘लंडन ऑलिम्पिक’मध्ये राहीची प्रतिस्पर्धी होती. मुंखबायरकडे सहा ‘ऑलिम्पिक’चा अनुभव आहे, शिवाय दोन ‘ऑलिम्पिक’ कांस्य पदकही तिनं जिंकली आहेत. मुंखबायरने सर्वात आधी राहीच्या तंदुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावून तिला जिंकण्यासाठी प्रेरित केले. परिणामी, क्रोएशियात एक महिन्यापूर्वी झालेल्या ‘वर्ल्डकप’ स्पर्धेत राहीनं पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवले.
 
 
 
महाराष्ट्राची दुसरी नेमबाज तेजस्विनी सावंत ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये ‘५० मीटर रायफल’ प्रकारात सहभागी होते आहे. महाराष्ट्राच्या पथकातील ही सगळ्यात वरिष्ठ खेळाडू. वयाच्या चाळीशीतही तेजस्विनीनं खेळातील आपली हुकूमत कायम राखलीय. नेमबाजीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविलेल्या माजी ‘जगज्जेत्या’ तेजस्विनीला ‘ऑलिम्पिक’ पदक खुणावतंय. शिवाय प्रदीर्घ अनुभव ही तिची जमेची बाजू आहे.
 
 
 
तिरंदाजीत प्रवीण जाधवकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले आहे. सातार्‍यातील फलटण तालुक्यातील सरडे गावाचा हा मुलगा आज तिरंदाजीतील भारताचा आशास्थान ठरला आहे. प्रवीणचे आई-वडील मोलमजुरी करणारे. पण, या गरिबीवर मात करून प्रवीण जपानपर्यंत पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रवीणच्या या संघर्षाचा आवर्जून उल्लेख केला आहे. २०१९ सालच्या जागतिक तिरंदाजीत स्पर्धेत सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या भारतीय चमूमध्ये प्रवीणचा सहभाग होता. तरुण दीप राय आणि अंतनू दास यांच्यासोबत प्रवीणनंही मजल मारली. याच कामिगिरीमुळे ‘जपान ऑलिम्पिक’साठी ते पात्र ठरले आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर भारतीय चमू जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. प्रवीण एकेरी आणि मिश्र प्रकारातही सहभागी होईल. पण, त्याला पदकाची सर्वाधिक संधी ही पुरुष सांघिक प्रकारात असेल. धावपटू ललिता बाबरनंतर ‘ऑलिम्पिक’साठी पात्र ठरलेला प्रवीण हा महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू आहे.
 
 
 
‘अ‍ॅथलेटिक्स’मध्ये बीडच्या अविनाश साबळेने यंदा तीन हजार मीटर ‘स्टीपलचेस’मध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. २०१९च्या ‘एशियायी अ‍ॅथलेटिक्स’ स्पर्धेत अविनाशने रौप्य पदकाची कमाई करत ‘जपान ऑलिम्पिक’ला प्रवेश मिळवला आहे. भारताच्या पी. टी. उषाचं ‘ऑलिम्पिक’ पदक सेकंदाच्या काही शतांश फरकानं हुकलं होतं. अविनाशनं यंदा आठ मिनिटं आणि २०.२१ सेकंदाची वेळ नोंदवलीय. २०१६च्या ब्राझिल ‘ऑलिम्पिक’मध्ये केनियाच्या कॉसेस्लस किप्रुतोनं आठ मिनिटं ३.२८ सेंकदाची वेळ नोंदवत नव्या ‘ऑलिम्पिक’ विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलं होतं.
 
 
 
‘नौकानयन’ या क्रीडा प्रकारात विष्णू सर्वानन या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा आहेत. गेली दोन वर्षे तो माल्टा देशात ‘ऑलिम्पिक’चा जोरदार सराव करत होता. ‘मुसांग नौकानयन’ स्पर्धेतील यशाच्या जोरावर त्यानं ‘ऑलिम्पिक’मधील प्रवेश नक्की केला आहे. त्याचे वडील सेनादलातील निवृत्त अधिकारी आर. सर्वानन हेही ‘नौकानयन’मधील नावाजलेले खेळाडू आहेत. त्यांच्याकडूनच विष्णूने या खेळाचे धडे गिरवलेत.
 
 
 
‘बॅडमिंटन दुहेरी’मध्ये महाराष्ट्राचा चिराग शेट्टी आंध्र प्रदेशच्या सात्विक साईराजसोबत खेळणार आहे. २०१८च्या ‘राष्ट्रकूल’ क्रीडा स्पर्धेत या दुकलीनं रौप्य पदक पटकावलं होतं. २०१८ सालच्या विविध ‘वर्ल्ड टूर बॅडमिंटन’ स्पर्धेत पुरुष दुहेरीत या जोडीने दोन जेतेपद, तर दोन वेळा उपविजेतपद पटकावून आपला दबदबा निर्माण केलाय. या द्वयीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
 
 
 
महाराष्ट्राचा ‘गोल्फर’ उदयन मानेला शेवटच्या क्षणी ‘ऑलिम्पिक’ प्रवेश मिळाला आहे. माने भारतीय गोल्फ क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. अर्जेंटिनाचा खेळाडू एमिलियानो याने कोरोनामुळे यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मधून माघार घेतल्यामुळे शेवटच्या क्षणी मानेची वर्णी लागली आहे. २०१४ साली जपानमध्ये झालेल्या ‘आयसेनहॉवर गोल्फ’ स्पर्धेत मानेनं १३व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. एकूणच आगामी ‘टोकियो ऑलिम्पिक’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या जिद्दीचा आणि गुणवत्तेचा कस लागणार असला, तरी त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता ते पदक विजेते ठरून आपल्या सर्वांच्या अपेक्षा सार्थ ठरवतील.
 
(लेखक क्रीडा पत्रकार आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0