सर्जनशील ‘गुरू’

21 Jul 2021 23:31:45

Sharad Dharmadhikari_1&nb
 
 
 
 
शिक्षणातील विविध आयाम पादाक्रांत करून अध्यापनाद्वारे ज्ञानदानाचा संकल्प तडीस नेणारे सर्जनशील ‘गुरू’ डॉ. शरद महादेव धर्माधिकारी यांच्याविषयी...
 
 
 
राष्ट्रनिर्माणासाठी शिक्षकांची भूमिका नेहमीच मोलाची ठरली आहे. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञान संक्रमण नसून, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती व विचारशक्ती आदींचा विकास करणे, तसेच त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणे होय. गेली ५० वर्षे नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पणवृत्तीने आणि सर्जनशीलपणे शैक्षणिक क्षेत्रात ठाण्यातील डॉ. शरद धर्माधिकारी कार्यरत आहेत. त्यांचा जन्म दि. १ जून, १९५१ साली झाला. ‘एम.ए’, ‘एम.एड.’, ‘एम.फिल’ आणि ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन बी.एड कॉलेज’ या विषयात ‘पीएचडी’ संपादन केलेल्या डॉ. धर्माधिकारी यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले. मूळगावीच प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नगर व संगमनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
 
 
 
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा, खर्डी विभाग एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये १९७२ ते १९७९ या कालावधीत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर उल्हासनगरच्या ‘सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन’ येथे प्राध्यापकपदी रुजू झाले. येथेच ते ‘एम.एड.’ला प्रथम आले. पुढे २०१३ पर्यंत याच कॉलेजमध्ये ‘एम.एड.’ विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८० साली खर्डी सोडून डोंबिवलीत स्थायिक झाले. डोंबिवलीकर बनल्यानंतर त्यांच्यातील समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कास धरून संघाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष सेवेत झोकून दिले. कालांतराने शिक्षणक्षेत्रातील योगदानामुळे डॉ. धर्माधिकारी यांच्याकडे संघाच्या बौद्धिक प्रमुखपदाची धुरा सोपवण्यात आली. २००५ पर्यंत डोंबिवलीतील वास्तव्यात संघनिष्ठ डॉ. धर्माधिकारी यांनी आपल्या कामाची उत्कृष्ट छाप पाडली. त्यानंतर, २००६ला ते ठाण्याचे रहिवासी झाले. इथेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती शाखेच्या पटावर कार्यरत आहेत. ठाण्यात राहत असले, तरी कसारा, खर्डी, डोंबिवली, उल्हासनगरशी त्यांची नाळ कायमच जुळलेली असल्याचे ते सांगतात.
 
 
 
राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली या संस्थेच्या स्वामी विवेकानंद नावाने दहा प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा, एक नाईट कॉलेज आणि कसारानजीक चिंध्याची वाडी येथे भव्य आश्रमशाळा असा व्याप आहे. या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. पडेल त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याच्या कौशल्यामुळे याच संस्थेच्या ‘रामनगर प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शालेय समिती’च्या अध्यक्षपदी डॉ. धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच संस्थेच्या नाईट कॉलेजच्या ‘कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी’वर आणि आश्रमशाळेच्या शालेय समितीवरदेखील डॉ. धर्माधिकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे चालवल्या जाणार्‍या ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ कोर्सचे संचालकपद भूषवत आहेत.
 
 
 
डॉ. धर्माधिकारी यांच्या आयुष्यात शिक्षणाची व्याख्या अधिक व्यापक बनली. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होईल, असे संस्कारमय शिक्षण देण्याचा ध्यास मनी लागला होता. हे संस्कार प्रदानाचे कार्य ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिर’ या आश्रमशाळेत सुरू केले. या आश्रमशाळेत २५० मुली आणि ४५० मुले असे एकूण ७०० वनवासी विद्यार्थी वास्तव्यास असून तेथेच शिकत आहेत. शाळेला सरकारी अनुदान, सामाजिक साहाय्य मिळत असले, तरी स्वतः डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय पदरमोड करायला मागेपुढे पाहत नाहीत. ते स्वतः, त्यांची पत्नी व मुलगा, एक मुलगी शालेय तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आर्थिक अडी-अडचणीत धावून जातात. मुलगा संस्कृत विषयात पारंगत असल्याने शाळेच्या ‘संस्कृत भारती’ची धुरा त्याच्या खांद्यावर आहे, तर पत्नी सरकारी नोकरीतून निवृत्त झाली असली, तरी त्यांचा वैचारिक पाठिंबा कायम असतो. नुकत्याच त्यांनी एक लाखांच्या घोंगड्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दिल्या. “अशाप्रकारे साठीनंतर काही अंशी आम्ही समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे डॉक्टर सांगतात. मातोश्रीचे देहावसान झाल्यानंतर अंत्यविधी उरकून लगेचच पुन्हा कामावर रुजू झाल्याचे गहिवरून सांगताना, डॉक्टर धर्माधिकारी, “तुझे काम हीच मला खरी श्रद्धांजली!” हा आईचा उपदेश आवर्जून सांगतात. आश्रमशाळेत वर्ग सुरू असताना एका मुलीच्या वडिलांच्या निधनाचा निरोप मिळाला. तेव्हा, वर्ग अर्ध्यावर सोडून डॉक्टर स्वतः एका विद्यार्थ्याला सोबत घेऊन त्या मुलीच्या घरी धावून गेल्याची आठवण त्यांचे सहकारी सांगतात.
 
 
 
शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, तर विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रगतीसाठी ‘क्रीडा भारती’चे प्रशिक्षक नेमले आहेत. दरवर्षी सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येते. आश्रमशाळेत शिवणकाम, बागकाम, शेती प्रशिक्षण दिले जाते. या अनुषंगाने अहमदाबाद येथे राबवण्यात येत असलेला ‘पुनरुत्थान विद्यापीठ’ हा प्रकल्प आश्रमशाळेतही राबवण्याचा मानस ते व्यक्त करतात, तर भविष्यात ‘गुणवत्ता विकास योजना’ राबवण्याविषयीची योजना अंतिम टप्प्यात असल्याचे सांगताना डॉ. धर्माधिकारी यांनी, “विद्यार्थ्यांवर होणार्‍या संस्कारांत शिक्षकाचा वाटा मोठा असतो. यासाठी प्रथमतः शिक्षकांचे प्रबोधन करणार असून नंतर विद्यार्थ्यांचेही प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. या माध्यमातून आजकाल इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल रोखण्यासाठी आणि मराठी माध्यमाकडे पालक व विद्यार्थ्यांचा ओढा कसा वाढेल, यासाठी शाळेत कोणत्या भौतिक सुविधा आणि मानवीय प्रशिक्षण उपलब्ध करणार, यावर भर दिला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना डॉ. धर्माधिकारी सामाजिक भानदेखील जपतात. याच भावनेतून शून्य कचरा प्रकल्प ते घरात राबवण्यासाठी आग्रही आहेत. जेणेकरून घरच्या घरी कचर्‍यापासून खतनिर्मिती करून एकप्रकारे पर्यावरण जतनाची जबाबदारीही पार पाडत आहेत. याशिवाय प्लास्टिकचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी त्यांची सतत जनजागृती सुरू असते. अशा या संघदक्ष सर्जनशील ‘गुरू’ला उर्वरित आरोग्यदायी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
- दीपक शेलार
Powered By Sangraha 9.0