मानापमान, सत्तेसाठी वरचढ, स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पक्षाची सुरू असलेली चढाओढ ही राज्याच्या राजकारणात कलह निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानावर मनसोक्त टीका केली. पवारांमुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत आहेत, असे म्हटले आणि पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगलं. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनात उडालेल्या या आगीचा भडका आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचला आहे.
सुरुवातीला खासदारांना शिवसेनेने उत्तर दिले. राष्ट्रवादी पवारांमुळे नव्हे तर आम्ही भाजपशी युती तोडल्याने तुम्ही सत्तेत आहात, असे ठणकावून सांगितले. या वाक्यातच आपण महायुतीशी आणि राज्यातील मतदारांशी दगाफटका केल्याची कबुलीच शिवसेनेने दिली. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही कोल्हेंचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांची पाटलांनी पार औकातच काढली. इतकेच नव्हे तर कोल्हा शिवसेनेच्या वाघांमधून तयार झाला आणि आता मोठा झाल्यावर त्याच पक्षावर टीका करतो, असा जाब त्यांनी विचारला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहे. मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे. समज आहे. यांच्यासारखा नटसम्राटासारखा नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
खासदार कोल्हेंना एवढे बोल लावून पाटील थांबतोच ते आता राजू वाघमारेंनीही म्हटलं की काँग्रेसमुळेच दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करुन दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात. तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी” असं ट्वीट डॉ. राजू वाघमारे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर पुढे २५ वर्ष चालणार, असा घोष खासदार संजय राऊत करतात. महाविकास आघाडीचे शिल्पकार ज्यांना म्हटले जाते ते पवार यांनीही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटून कौतूक केले आहे. पण जेव्हा त्यांचे खासदार अशाप्रकारे शिवसेनेला थेट भिडतात त्यात काँग्रेसही उतरते तेव्हा राज्याच्या कामकाजातील समन्वय काय, लॉकडाऊन, कोरोना आकडेवारीबद्दल तुमचं म्हणणं काय, बुडालेल्या रोजगारांबद्दल कोल्हे, पाटील, पवार आणि राऊत कधी बोलणार.
ज्या केंद्राकडे सातत्याने बोटं दाखवली जातात, त्यांच्या आणि राज्याच्या तुलना न केलेलीच बरी. भाजपशासित असलेल्या बहुतांश राज्यातील कोरोना आकडेवारी दोन अंकांवर येऊन पोहोचली आहे. तिथे कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. मात्र, महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांची परिस्थिती अद्याप बिकट मानली जात आहे. लसीकरणाबद्दलही हीच स्थिती कायम आहे. मुंबईतील लोकल सेवा बंद करून जनतेला वेठीस धरले जात आहे, त्याबद्दल एकही शब्द उच्चारायला राज्यातील एकही मंत्री धजावत नाही. नोकरी धंद्यासाठी खासगी वाहने किंवा बसमध्ये गुदमरून प्रवास करावा लागतोय याबद्दलची वेदना कुणालाही दिसत नाही. स्वप्नील लोणकरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही पण राज्यातील मंत्री महत्वाचे नेते दिलीप कुमार गेल्यानंतर त्यांच्या घरी सांत्वनासाठी रांगा लावतात. याउलट विदारक चित्र म्हणजे स्वप्नीलच्या वडिलांना मदत देण्यासाठी मुंबईत बोलावून घेण्याचे फर्मान बेस्ट सीएम सोडतात.
एका रात्रीत पडलेल्या पावसाने मुंबईची उडवलेली दाणादाण, घेतलेले २५ बळी, रुग्णालयांतील ऑक्सिजनचा तुटवडा आगीच्या घटना यांपासून आपण कधी धडा घेणार हा प्रश्न विचारत असताना दिवसरात्र केंद्र आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यात जात असलेला वेळ पाहून महाराष्ट्राला 'व्हीजन' नसलेले सत्ताधारी लाभलेत की काय, असाही प्रश्न उभा राहतो. नेतृत्वच जर कुशल नसेल तर कारभार कसा चालणार याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्यातील ही सर्व परिस्थिती आहे. सत्ता पाच वर्षांसाठी राहील पण नेत्यांचा मस्तवालपणा जनता पुढील शंभर वर्षे लक्षात ठेवणार आहे. आंधळं दळतंयं अन् कुत्रं पीठ खातंयं ही अवस्था सरकार हाकण्याच्या पद्धतीमुळे कायम राहणार आहे.