चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू. मात्र, काही तज्ज्ञांच्या सल्ल्याला बळी पडून भारताचे लक्ष भारत-पाकिस्तान सीमेवरती केंद्रित असायचे. परंतु, आता ते भारत-चीन सीमेकडे वळविण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये भारत-चीन सीमावाद हा संपवण्याचा चीन कुठलाही प्रयत्न करणार नाही. इतकेच नव्हे, तर डेपसांग आणि होट स्प्रिंगमधून चिनी सैन्य परत जायला तयार नाही. त्यामुळे भारताला चीनविरोधात आपला पवित्रा अधिक आक्रमक करावा लागेल.
गेल्या काही महिन्यांत पद्धतशीरपणे भारताने चिनी सीमेवर तैनात असलेल्या दोन लाख सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यातच सीमेवर अजून ५० हजार सैनिक पाठवले आहेत.
भारत-चीन सीमा लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशला लागलेली आहे. या सगळ्या भागातील सीमेवर सैन्य वाढवण्यात येत आहे. यामुळे चीनला घुसखोरी करणे कठीण होईल. याआधी भारत-चीन सीमेवर असलेले सैन्य हे केवळ सीमेची सुरक्षा करण्याकरिता होते. मात्र, चीनच्या आत जाऊन हल्ला करण्याची आपल्याकडे क्षमता नव्हती. आता लढाई झाल्यास चीनवर आक्रमण करण्याकरिता आपल्याकडे आक्रमक सैन्य उपलब्ध असेल. भारत-पाकिस्तान सीमेवरती असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादीविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे.
ईशान्य भारतामध्ये पुष्कळसे सैन्य तेथील बंडखोरी विरुद्ध कार्यरत असते. आता बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पूर्णपणे ‘आसाम रायफल’ला देण्यात आले आहे आणि भारतीय सैन्याला भारत-चीन सीमेवर लढाई करता तयार करण्यात येत आहे. यामुळे कुठलीही कठीण परिस्थिती उद्भवली, मित्रराष्ट्रांची जरी मदत मिळाली नाही, तरीही भारत स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ राहील.
यामुळे चीनलासुद्धा या भागांमध्ये सैन्य तैनात करावे लागत आहे. याआधी सीमेवर तैनात चिनी सेना अतिशय कमी होती. आता चीनने आपला तोफखाना, रणगाडे, रॉकेट ब्रिगेड, हवाईदलही सीमेनजीक तैनात केले आहे. चीनही स्वतःची सुरक्षा मजबूत करत आहे. भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्याचे बंकर पहिलेच अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये बनलेले आहेत. मात्र, चिनी सैन्याने लढण्याकरिता कधीही बंकर बनवले नव्हते. परंतु, आता त्यांना तिथे रक्षात्मक फळी उभारावी लागली आहे. त्यावरुन हे सिद्ध होते की, भारत त्यांच्यावर प्रतिहल्ला करेल, अशी भीती चिनी सैन्याच्या मनात तयार झाली आहे.
चीनला लढण्याचा अनुभव नाही
‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ची लढण्याची क्षमता कधीही सिद्ध झालेली नाही. लढण्याचे दोन पैलू असतात - एक सैनिक आणि दुसरे त्याच्याकडे असलेले शस्त्र. शस्त्रांच्या बाबतीत चीन नक्कीच भारताच्या पुढे आहे. त्यांची शस्त्रे अत्याधुनिक आहेत. परंतु, शस्त्रापेक्षा जास्त महत्त्वाचा पैलू असतो, तो म्हणजे शस्त्र वापरणारे सैनिक आणि त्यांचे नेतृत्व. यामध्ये भारतीय सैन्य चीनच्या फारच पुढे आहे. गलवान लढाईमध्ये चीनने अचानक हल्ला केला. तेव्हाही २० भारतीय सैनिकांच्या बलिदानाचा बदला आपण चीनचे ७० सैनिक मारून घेतला. यामुळे १९७८ नंतर पहिल्यांदा सीमेवर चिनी सैनिकांचे रक्त सांडले. त्यामुळे चिनी सैन्याला एक मोठा धक्का बसला. त्यांना वाटले होते की, हल्ला झाल्यानंतर गलवानमध्ये असलेले भारतीय सैनिक हे पळून जातील. मात्र, भारतीय सैन्याने प्रतिहल्ला करून चीनला धडा शिकवला.
चीनला लढण्याचा अनुभव नाही. चिनी सैन्य नाजूक आहे. याला अनेक कारणे आहेत. ७० टक्के चिनी सैनिक हे सैन्यात जाणे बंधनकारक असल्यामुळे तेथे येतात आणि तीन वर्षांची नोकरी करून लगेच सैन्याच्या बाहेर पडतात. बहुतेक चिनी सैनिक ‘वन चाईल्ड पॉलिसी’ या धोरणाच्या काळात जन्मले आहेत. यामुळे त्यांना आई-वडील, आजी-आजोबांनी खूपच कौतुक करून वाढवलेले आहे. त्यामुळे त्यांची लढाईची क्षमता कमी आहे. सगळे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांची मेहनत करण्याची इच्छा नाही. सैन्यात भरती केलेल्या सैनिकांची शारीरिक क्षमताही कमी असते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग झालेले असतात आणि त्यांची दृष्टीसुद्धा कमजोर असते.
ही सगळी कमजोरी सैन्य नेतृत्वाने चिनी सरकारच्या निदर्शनास आणली आहेत. या सैनिकांना मजबूत बनवण्याकरिता, लढवय्ये बनवण्याकरिता आता चिनी सैन्य अनेक कार्यक्रम राबवत आहे. परंतु, त्यांना त्यात फारसे यश मिळालेले नाही.
तुलनेमध्ये भारतीय सैन्याला लढण्याचा प्रचंड अनुभव आहे. भारतीय सैन्य काश्मीर, ईशान्य भारत, भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमीच लढत असते. त्यामुळे अनुभव नसलेल्या चिनी सैनिकांचा ते कधीही पराभव करू शकतात.
त्यातच आता भारताच्या सीमेनजीक नद्यांवर वेगवेगळे पूल बांधण्यात आले आहेत, सीमेवर रस्तेबांधणीचे कामही जोरात सुरु आहे, ज्यामुळे भारतीय सैन्याची हालचाल पटकन होईल. याशिवाय लडाखमध्ये बारामाही रस्ते उघडे ठेवण्याकरिता जोजीला खिंडीच्या खालून बोगदा, हिमाचल प्रदेशच्या बाजूने विविध रस्त्यांचे कार्यक्रम वेगाने सुरू आहेत. लडाखची भारतीय सीमा रस्त्याने फक्त सहा महिने उघडी असायची, ती १२ महिने उघडी राहण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थातच भारतीय सैन्याची लढण्याची क्षमता नक्कीच वाढेल.
भारतीय सैन्याची सर्वात मोठी ताकद आहे, ते त्यांचे अधिकारी किंवा ऑफिसर्स. अधिकार्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत आपल्या सैनिकांचे नेतृत्व सर्वात पुढे राहून करतात. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, आक्रमकता ही अधिकार्यांमुळे येते. याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे. भारतीय सैनिक, अधिकारी यांची देशासाठी हौतात्म्य पत्करणाची ऊर्मी यामध्ये आपण चिनी सैनिकांच्या अनेक पावले पुढे आहोत.
वेगवेगळ्या स्तरावर चीनला आक्रमक पद्धतीने उत्तर
चीनची इच्छा आहे की, आपण सीमाविवाद सध्या बाजूला ठेवावा आणि आर्थिक संबंध मजबूत करावे. भारतीय नेतृत्वाला हे अजिबात मान्य नाही. आपण पद्धतशीरपणे आपल्या अर्थव्यवस्थेला चीनपासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यामध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ हे एक मोठे पाऊल आहे. याशिवाय वेगवेगळ्या स्तरावर आपण चीनला आक्रमक पद्धतीने उत्तरही देत आहोत.
नुकतीच चिनी कम्युनिस्ट पार्टीची १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. मात्र, भारतीय नेतृत्वाने चीनला शुभेच्छा दिल्या नाहीत. उलटे त्यांच्या या सर्वात महत्त्वाच्या दिवसाकडे पूर्णपणे दुर्लक्ष देण्यात आले. मात्र, काही विकले गेलेले राजकीय पक्षांचे नेते आणि इंग्रजी माध्यमांमधील काही वर्तमानपत्रांनी चीनवरती या दिवसाच्या निमित्ताने विशेष पुरवणी काढली.
धोरणात्मक पातळीवर आपण चीनला अनेक आक्रमक कारवाया करून इशारे देत आहोत. उदाहरणार्थ, दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतीय पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या १५ वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले. तो चीनला एक मोठा धक्का होता. चीनला असे वाटते की, पाकिस्तानच्या मदतीने आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड आर्थिक ताकदीमुळे तालिबानच्या मदतीने ते अफगाणिस्तानवर राज्य करू शकतील. परंतु, अफगाणिस्तान ही महाशक्तीची स्मशानभूमी आहे आणि आता चीनच्या संबंधातसुद्धा असेच होण्याची शक्यता आहे. भारत-अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या, ‘सेंट्रल एशियन रिपब्लिक’मधल्या देशांच्या मदतीने नॉर्दन अलायन्स, चीन-पाकिस्तान आणि तालिबानविरुद्ध लढा उभारत आहेत. यामुळे अफगाणिस्तानमध्ये चीन आणि पाकिस्तानला शह देण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल.
अजून काय करावे?
केवळ मानसिक दबाव, प्रपोगंडाचा वापर करून चीन भारताला हरवू शकणार नाही. भारताला हरवायचे असेल तर तुम्हाला भारतीय सैन्याशी लढाई करावीच लागेल आणि ती करण्याची चिनी सैन्याची सध्या क्षमता नाही. मात्र, चीनकडे असलेले लढण्याचे तंत्रज्ञान हे चांगले असल्यामुळे आपल्याला येणार्या दिवसांमध्ये विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण हे वेगाने करायला पाहिजे, तरच चीनने काही आक्रमक कारवाई केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता आपण तयार राहू.