नोकरी सोडून उद्योग करणारे ययाती विंचुरकर

15 Jul 2021 21:25:45

arth udyog 1_1  
 
एका बहुराष्ट्रीय कंपनीमधील अधिकारी पदाची नोकरी सोडली आणि व्यवसायाकडे वळला. पुढे काय होईल माहीत नव्हतं. मात्र, त्याने उडी घेतली. आज एक विपणन सल्लागार म्हणून ते नावारुपास आले आहेत. ययाती विंचुरकर हे त्यांचं नाव.


‘नोकरदार समाज’ हीच मराठी समाजाची आतापर्यंतची ओळख. उद्योग-व्यवसाय करणारे अगदीच अत्यल्प. त्यात नोकरी सोडून व्यवसाय करणारे म्हणजे दुर्मीळच म्हणावे लागतील. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललं आणि मराठी उद्योगविश्वासाठी एक आश्वासक चित्र निर्माण झालं. याच चित्रामधील ‘तो’ एक. एका बहुराष्ट्रीय कंपनीमधील अधिकारी पदाची नोकरी सोडली आणि व्यवसायाकडे वळला. पुढे काय होईल माहीत नव्हतं. मात्र, त्याने उडी घेतली. आज एक विपणन सल्लागार म्हणून ते नावारुपास आले आहेत. ययाती विंचुरकर हे त्यांचं नाव.

रामकृष्ण आणि सुशिला या विंचुरकर दाम्पत्याच्या पोटी ययाती यांचा जन्म झाला. ययाती हे पौराणिक काळातील राजाचं नाव. हे छोटासे ययाती नावाप्रमाणेच दिसायले राजबिंडे. ययातींचे वडील रामकृष्ण विंचुरकर हे ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ होते, तर आई सुशिला गृहिणी. ययाती यांचे शालेय शिक्षण टागोर नगरच्या विद्यामंदिर हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी ‘फीटर’ म्हणून दोन वर्षे ‘इंटप्रेंटिन्सशिप’ केली. दादरच्या एका संस्थेतून दोन वर्षांचा ‘मेकॅनिकल ड्राफ्ट्समन’चा डिप्लोमा केला. त्यानंतर विविध १० ते १२ कंपन्यांमध्ये तब्बल २७ वर्षे नोकरी केली. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ अर्थात ’एल अ‍ॅण्ड टी’ सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ म्हणून नोकरी केली.

नोकरी करत असतानाच संध्याकाळी ६ नंतर विंचुरकर ‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ करत. सहा वर्षे ते काम त्यांनी केलं. या दरम्यान विविध प्रशिक्षण मिळत होतं. या प्रशिक्षणातून विंचुरकरांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय होता ‘एल अ‍ॅण्ड टी’ सारख्या कंपनीचा राजीनामा देऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा. २०१४ मध्ये त्यांनी हा निर्णय अंमलात आणला.

‘डीएमआयटी’ या बौद्धिक मापन चाचणीचे काम सुरू केले. ‘सुपर किड्झ ब्रेनटेक’ या संस्थेमार्फत ते लहान मुलांची बुद्धी, मन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे काम करतात. ‘मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन एनहान्सेस’ नावाने ते लहान मुलांसाठी काही अभ्यासक्रम राबवितात. ५ ते १५ वयोगटातल्या मुलांसाठी स्मृतिबळ, एकाग्रता, स्व-अभिमान आणि आत्मविश्वास, विचारक्षमता, भावनिक स्थितप्रज्ञता, ध्येय निश्चितता या जीवनावश्यक गुणांचे धडे दिले जातात. यासाठी विपश्यना, योग, संगीतोपचार आदी शास्त्रांचा आधार घेतला जातो. त्याचप्रमाणे मुलांच्या बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि धाडसी बुद्ध्यांकाकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. आतापर्यंत त्यांनी दीड हजारांहून अधिक मुलांना प्रशिक्षित केलेले आहे, तर दोन हजारांपेक्षा जास्त ‘डीएमआयटी’ चाचण्या आणि पालकत्वाचे प्रशिक्षण दिले आहे.

एकदा १२ वर्षाच्या आपल्या गतिमंद मुलासह त्याची आई विंचुरकरांकडे आली. आपल्या मुलाच्या उपचारासाठी तिने अनेक वैद्यकीय उपचार केले, पण काहीच गुण आला नाही. तिला एका मोठ्या राजकीय नेत्याने ‘मिडब्रेन’चा पत्ता दिला. ती माऊली विंचुरकरांकडे आली. त्यांनी त्या मुलावर संगीतोपचार पद्धत अवलंबिली. काही दिवसांतच त्याच्यामध्ये झालेले बदल विस्मयचकीत करणारे होते. तो आपल्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता, असे विंचुरकर प्रांजळपणे नमूद करतात.

‘मिडब्रेन’च्या कार्यपद्धतीविषयी कुणीतरी चुकीची अफवा पसरवली होती की, यांची पद्धत अंधश्रद्धा पसरवणारी आहे. हे पडताळून पाहण्यासाठी एका संस्थेचा कार्यकर्ता त्यांच्याकडे आला. विंचुरकरांनी त्यास प्रशिक्षण शिबिरास बसण्याची विनंती केली. शास्त्रोक्त पद्धतीने होणारे प्रशिक्षण पाहून त्या कार्यकर्त्याची खात्री पटली की, हे मुलांना घडवितात. त्यांच्यात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवतात. याचा परिणाम असा झाला की, त्या संस्थेच्या कार्यकर्त्याने आपल्या ओळखीच्या मुलांना प्रशिक्षणासाठी विंचुरकरांकडे पाठविले. हा एकप्रकारे त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीचा विजय होता.
 
कोरोना काळात पारंपरिक शिक्षणाला खीळ बसली. शिक्षणपद्धतसुद्धा ‘ऑनलाईन’ झाली. विंचुरकरांनीसुद्धा ‘ऑनलाईन’ पद्धतीच्या प्रशिक्षणास सुरुवात केली. कोरोनाचा अवघ्या शैक्षणिक व्यवस्थेला फटका बसला. विंचुरकरही याला अपवाद ठरले नाही. मात्र, परिस्थितीला शरण न जाता ते लढत आहेत. नवी पिढी घडवत आहेत.शैक्षणिक क्षेत्रासोबत ते सामाजिक क्षेत्रातसुद्धा हिरीरीने सहभागी होतात. काही उद्योजकीय संस्थांसोबत उद्योजक घडविण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी आहेत.

विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या राखी या सुविद्य तरुणीसोबत ययाती विंचुरकरांचा १९९६ साली विवाह झाला. एका आंतरराष्ट्रीय औषधी कंपनीत अधिकारी पदावर त्या कार्यरत आहेत. या दाम्पत्यास रितिका नावाची कन्या असून ‘इव्हेंट्स आणि पब्लिक रिलेशन्स’ विषयात ती पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास करुन भारताची पुढची पिढी सक्षम करण्याचं ययाती विंचुरकरांचं ध्येय आहे. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी शुभेच्छा.







 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0