संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात लोटून चीन आता नवनवे धोकादायक प्रयोग करत सुटला आहे. कोरोना विषाणूंची उत्पत्ती ज्या वुहानमध्ये झाली, तिथले पुरावे शोधण्यात अमेरिका व्यस्त आहे. त्याच दरम्यान चीन आणखी एक भयानक प्रयोग करण्याच्या मार्गावर आहे.
जगभरातील संशोधन यंत्रणांच्या रडारवर असलेला चीन आता ‘सुपरह्युमन’ प्रकल्पावर काम करत आहे. यासाठी चीनने तब्बल ५२ देशांतून ८० लाख गर्भवती महिलांचा जनुकीय डेटा चोरून अभ्यास सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे जगभरात आई-बाबा होऊ इच्छिणार्यांच्या मुलांच्या ‘डीएनए’चा अभ्यास आता चीन करतोय.चीनच्या कटकारस्थानात चिनी सैन्य कसे मागे राहील, म्हणून सैन्याने चिनी कंपनी ‘बीजीआय’ला ही कामगिरी सुपूर्द केली आहे. ही कंपनी जगभरातील गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व चिकित्सा करते. याअंतर्गत ‘बीजीआय’ समूहाने ज्या ज्या महिलांची माहिती गोळा केली आहे, ती माहिती चीनपर्यंत पोहोचविण्याचे काम ही कंपनी करत आहे. या आकडेवारीला ‘नॉन इन्व्हेसिव्ह फॅटल ट्रीझोमी डेटा’ म्हणून संबोधले जाते. गर्भवतींचे वजन, वय, उंची, जन्मस्थळ आदी माहिती दिली जाते. याच डेटाच्या आधारे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यंत्रणा भविष्यात लोकसंख्येला होणार्या शारीरिक व्याधी आणि बदलांची माहिती पूर्वीच मिळणार आहे.
त्यामुळेच बायडन प्रशासनाने उशिरा का होईना, चीनला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचे कारण अमेरिकेच्या यंत्रणा शोधण्यात व्यस्त आहेत. त्याच दरम्यान, चीनच्या या दुसर्या प्रयोगामुळे डोकेदुखी वाढत चालली आहे. कारण, भविष्यात मानवाला कुठला आजार होणार, हे जर का पूर्वीच समजले, तर जगभरातील फार्मा कंपन्यांना चीनसाठी पायघड्या घालण्याशिवाय पर्याय उरणार नाही. चीन प्रत्येक फार्मा कंपनीवर आपली पकड मजबूत करेल, ही भीती अमेरिकेला सतावते आहे. कोरोना महामारीचा अनुभव पाहता, तशी वेळ येणार नाही, हे जरी सत्य असले तरीही जगाला नव्या विषाणूच्या गर्तेत ढकलून पुन्हा एकदा हाहाकार उडवून देण्याचा हा नवा प्रयत्न तर नाही ना, अशीही शंकेची पाल चुकचुकते. तसेच चीनच्या विस्तारवादाचे मनसुबे पाहता, चीन ‘सुपरह्युमन्स’द्वारे आपले नवे सैन्य उभे करणार नाही कशावरून, हादेखील प्रश्न तज्ज्ञांना आहे.
या मस्तवाल ड्रॅगनला रोखायचे कसे, असा प्रश्न जगाला आहे. जो प्रकार वुहानच्या प्रयोगशाळेत घडला, तसाच प्रकार नव्याने घडेल का, चीन ‘सुपरह्युमन’ प्रकल्पाद्वारे गंभीर प्रकारच्या आजाराचे विषाणू तयार करेल, अशीही भीती अमेरिकेला आहे. आपण दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रकाशित केलेल्या ‘कोरोना विषाणू मानवनिर्मितच?’ या लेखमालेत कोरोना कटकारस्थानाचे तर्कशुद्ध वर्णन पाहिलेच आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार, जगाशी जैविक युद्ध करण्याची चीनची तयारी किती अद्ययावत आहे, याबद्दल वेगळे सांगायला नको.चिनी कंपन्यांना लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, कंपन्यांना ग्राहकांचीही माहिती पुरविणे बंधनकारक असते. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली जगभरातील ग्राहकांचा डेटा कंपन्यांकडून उकळायचा आणि त्याद्वारे स्वतःचे कटकारस्थान शिजवायचे, हे चीनचे जुने खेळ आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये भारताने चिनी अॅप्सवर आणलेली बंदी हा त्याचाच एक भाग होता. अमेरिकेच्या माजी निवृत्त अधिकार्यांनीही याबद्दल दुजोरा दिला आहे.
हा विषय भारतीयांसाठीही तितकाच गंभीर आहे. कारण, चीन नाइलाजाने आपला शेजारी आहेच, शिवाय सीमेवर चीनशी सुरू असलेला तणाव ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. चिनी सैनिकांना सीमेवरील थंडी आणि उष्ण वातावरणात जास्त काळ तग धरून राहता यावे, यासाठीही त्यांच्यात जनुकीय बदल करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. भारतीय सैनिकांमध्ये देशरक्षणासाठी असलेले आत्मबल चिनी सैनिकांमध्ये नाही. ते नांगी टाकतात, माघारी परतात. उंच ठिकाणी ऐकण्याची क्षमता कमी होते, तसेच शरीर साथ देत नाही. यांसारख्या समस्यांवर चिनी सैनिकांना कशी मात करता येईल, यासाठीही प्रयत्न ‘सुपरह्युमन’ प्रकल्पात केले जाणार आहेत. कारण, चीनच्या सीमेवर बहुतांश सैनिक आजारी पडून माघारी परतताना दिसतात. त्यामुळे या प्रयोगात आता चिनी सैन्यालाही पाचारण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाला तर जनुकीय बदल करून सीमेवर लढण्यासाठी चीन सैन्य पाठवणार, हे नक्की...