अखंड येकान्त सेवावा!

14 Jul 2021 20:47:18

ramdas_1  H x W
समर्थवाङ्मयातून प्रकट झालेले आणि स्वामींच्या शिष्यांनी समर्थांचे जे गुणविशेष प्रसंगानुरूप सांगितले, त्यावरून समर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच त्यांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखांतून करीत आहोत.

स्वामींचे सारे जीवन लोकोद्धारासाठी वाहिलेले होते. परकीय संस्कृतीचे आक्रमण रोखून हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे, लोकांना हिंदवी स्वराज्यासाठी आणि रामराज्य पुन्हा जिकडे तिकडे करण्यासाठी अनुकूल करून घेणे, सज्जनांच्या मंडळ्या स्थापन करून त्यांना राम व हनुमानाच्या उपासनेला लावणे, जागोजागी महंतांच्या नेमणुका करून त्याचे नियोजन करणे, आध्यात्मिक केंद्रांचे जाळे हिंदुस्थानभर पसरवणे, अशा अनेक महत्त्वाच्या कामांत स्वामी गर्क असत. तथापि, या व्यापातून वेळ काढून ते लोकांना उपासनेला लावीत. स्वामींना एकांताची आवड आणि आवश्यकता असे. कारण, स्वामींच्या मते एकांतात असताना अनेक विषयांचे चिंतन, त्यांचा अभ्यास करता येतो. लोकोद्धारासाठी विविध योजना तयार करता येतात. त्यामुळे एकांतवासातील वेळ फुकट जातो, असे कोणी मानण्याचे कारण नाही. आपण अभ्यास करावा व लोकांना उपासनेला लावावे, म्हणजे दोघांचाही वेळ सार्थकी लागतो, असे स्वामी म्हणतात.
अखंड येकान्त सेवावा। अभ्यासचि करीत जावा।
काळ सार्थकी करावा। जनासहित॥
 
स्वामींच्या विचारांमुळे व विधायक कामांमुळे लवकरच त्यांची सर्वत्र प्रसिद्धी झाली. कस्तुरीमृगाचा गंध काही लपून राहत नाही. लोक लांबलांबून स्वामींच्या दर्शनाकरिता येऊ लागले. या भेटीत ते स्वामींना त्यांच्या प्रांतातील हकिगती सांगत असत. समर्थ वरवर कडक शिस्तीचे वाटले तरी या सामान्य पीडित जनतेबद्दल त्यांचे अंतःकरण दयार्द्र होते. दर्शनासाठी लांबून आलेल्या या लोकांना स्वामी सहसा भेट नाकारत नसत. स्वामी म्हणत की, “ही कुटुंबवत्सल माणसे दूरच्या प्रांतात असली तरी ती आपली आहेत. ती आणखी कोणाकडे जातील? आपण त्यांना भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यामुळे या कठीण समयी त्यांना आधार वाटेल.” स्वामींना त्यांच्याद्वारा दूरदूरच्या प्रांतातील लोकजीवनाच्या, अत्याचाराच्या अद्ययावत हकिगती समजत होत्या. त्यावर स्वामींचे चिंतन चालू असे. लोकांच्या अस्वस्थ करणार्‍या हकिगती ऐकून स्वामी आपले विचार कसे व्यक्त करीत, हे गिरिधरस्वामी यांनी ‘समर्थप्रताप’ या ग्रंथात सांगितले आहे. दुःखितांच्या व्यथा ऐकून स्वामी काय म्हणत, ते गिरिधरस्वामींनी यथोचित शब्दांत मांडले आहे.
...म्हणती कैसी वाचतील जने।
कैसी ब्राह्मणे राहतील॥
कैसी क्षेम राहेल जगती।
कैसी देवदेवाल्ये तगती॥
कैसी कुटुंबवत्सल जगती।
कोणीकडे जातील हे॥

सामान्य लोकांविषयी स्वामींच्या मनात अनेक काळज्या लागून राहिल्या होत्या. सगळीकडे क्षेमकुशल कसे होईल, याचा स्वामी विचार करीत. आपली देवदेवालये तोडण्याफोडण्याचा म्लेंच्छांनी सपाटा लावला आहे. ती मंदिरे कशी वाचविता येतील? हे कुटुंबवत्सल लोक आपल्या लेकीसुनांना यवनांच्या धाडेपासून कसे वाचवतील? ही माणसे आपल्या बायकामुलांना घेऊन कोणाच्या आश्रयाला जातील? कुठे निवारा शोधतील? त्याचबरोबर ‘कैसी ब्राह्मण्ये राहतील?’ असेही उद्गार स्वामींनी काढले आहेत. सर्वसामान्य वाचकांना हे वाचून वाटेल की, स्वामींना ब्राह्मणांची काळजी सतावत होती की काय? तथापि, येथे ‘ब्राह्मण’ हा शब्द वापरलेला नसून समर्थांनी जाणीवपूर्वक ‘ब्राह्मण्य’ असा शब्दप्रयोग केला आहे. ‘ब्राह्मण्य’ म्हणजे सज्जनांच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांचा समुच्चय. भगवद्गीतेत ‘ब्राह्मण्य’ किंवा ‘ब्रह्मकर्म’ म्हणजे काय ते सांगितले आहे.

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेय च।
ज्ञान विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्॥

‘ब्राह्मण्य’ म्हणजे गीतेत प्रतिपादन केलेले हे गुण. या गुणांपैकी ‘शम’ शब्द मनाचा निग्रह दाखवतो. ‘दम’ शब्दाने इंद्रियांचा निग्रह सांगितला आहे. ‘तप’ हा सर्वांना आवश्यक असा गुण आहे. ‘शौचं’ म्हणजे अंतर्बाह्य शुचिर्भूतता, त्याच्या जोडीला ‘क्षमा’ आणि ‘मनाचा सरळपणा’ हेही गुण आवश्यक. त्याचप्रमाणे ‘ज्ञान’, ‘विज्ञान’ आणि ‘आस्तिक्य बुद्धी’ या गुणांचे अस्तित्व तेथे स्वभावतः असेल तर ते ‘ब्रह्मकर्म’ किंवा ‘ब्राह्मण्य’ होय. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, ‘ब्राह्मण्य’ हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. ते टिकले तर आपली संस्कृती टिकेल. या विचारांनी स्वामींना ‘कैसी ब्राह्मणे राहतील’ ही चिंता सतावत होती.तत्कालीन विशेषता उत्तर हिंदुस्थानातील दुष्ट दुर्जनांच्या राजकीय कारवायांमुळे लोकांच्या जीवनाची वाताहात झाली होती. अशावेळी ‘ब्राह्मण्य’ कसे टिकवता येईल, ही चिंता स्वामींना स्वाभाविकपणे होती. लोकांबरोबर संस्कृतीही वाचविली पाहिजे, असे स्वामींचे मत होते.स्वामींना एकान्त अतिशय प्रिय होता. एकांतकाळात शांतपणे आपल्या योजना आखता येतात, नवनवीन विचार सुचतात, विचारांचे आकलन होते, असे स्वामींचे मत होते. स्वामी म्हणतात,
‘जयास येकान्त मानला। अवघ्या आधी कळे त्याला॥’

स्वामींचे दासबोधातील विचार हे ‘आधी केले, मग सांगितले’ या प्रकारातले आहेत. त्यामुळे त्या विचारातून स्वामींनी त्याचा अगोदर अनुभव घेतला असला पाहिजे, हे उघड आहे. स्वानुभवी विचार हे समर्थांचे आत्मकथन मानायला हरकत नाही.आपले १२ वर्षांचे तीर्थाटन संपवून स्वामी जेव्हा प्रथम कृष्णाखोर्‍यात नियोजित कार्यासाठी आले, तेव्हा ते डोंगराळ भागातील दर्‍यांखोर्‍यांतून हिंडत असत. कामापुरते ते गावाता येत. चाफळ खोर्‍यातील भक्तांना दीक्षा देऊन त्यांनी ‘ब्राह्मण मंडळ्या’ वाढवायला सुरुवात केली होती. ते फारसे कुणाशी बोलत नसत. थोडे बोलून लोकांना ज्ञानाची व भजनाची चटक लावून स्वामी तेथून निघून जात. नंतर लोक त्यांना शोधू लागले तरी स्वामी कोणालाही सापडत नसत. स्वामी अमुक एका घळीत मुक्कामाला जातील, असे निश्चितपणे कोणालाही सांगता येत नसे. स्वामींनी लोकांना भजन करायला लावले तरी आपण स्वतः भजनाच्या ठिकाणी स्वामी चुकूनही जात नसत.

भजनाबरोबर स्वामींनी लोकांना रामाची व हनुमानाची उपासना करायला सांगितले. या उपासनांबरोबर स्वामी ज्ञानोपासकही होते. स्वामींच्या ठिकाणी विद्येची अभिरुची आणि ज्ञानलालसा होती. स्वामींनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. दासबोधात १२ गीता, वेद, उपनिषदे यांचा उल्लेख आहे. ते सर्व त्यांनी वाचले होते. स्वामी आंबेजोगाईला गेले असता तेथे त्यांनी मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ वाचला होता. ‘एकनाथी भागवत’, ‘ज्ञानेश्वरी’ हे ग्रंथही त्यांनी वाचले होते. समर्थकाळात त्यांच्या शिष्यांनी स्वहस्ते लिहिलेली ‘एकनाथी भागवता’ची प्रत धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात पाहायला मिळते. ती प्रत श्री. देव यांना चाफळ खोर्‍यातील मठातून मिळाली आहे. प्रत्येक मठात सद्ग्रंथांच्या प्रती, मठातील ग्रंथसंग्रहालयात असाव्यात, असा दंडक समर्थांनी सर्व मठात लावून दिलेला होता. सर्व शिष्यांनी ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे’ असे समर्थांचे सांगणे असे. सर्व मठांतून अनेक चांगल्या ग्रंथांच्या प्रती उतरवून घेण्याचे काम चाललेले असे. स्वामींच्या ठिकाणी असामान्य अशी ग्रंथप्रिती होती, हे यावरून सिद्ध होते. एकान्तामध्ये सर्व ग्रंथ सूक्ष्मपणे अभ्यासाने असे समर्थ सांगतात.

अखंड येकान्त सेवावा। ग्रंथमात्र धांडोळावा।
प्रचित येईल तो घ्यावा। अर्थ मनीं॥

रामदासी मठांतून ग्रंथसंग्रह करून ज्ञानोपासना कशी चालत असे, हे पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
- सुरेश जाखडी













 
Powered By Sangraha 9.0