अंगभूत कलागुणांनी नित्य नवा ‘कलास्पर्श’ साकारणारे ठाण्यातील ख्यातनाम चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्याविषयी...
कोणतीच कला कधी निवृत्ती घेत नाही. त्यामुळे कला ही निरंतर असते. माणसाला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर कला सदाकुल बनवते. ठाण्यातील सदाशिव कुलकर्णी या वयाची साठी उलटलेल्या अवलियाचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. नोकरीतून निवृत्ती पत्करली असली, तरी त्यांच्यातला चित्रकार स्वस्थ बसत नाही. चित्रातून ते व्यक्त होतात... विविध स्पर्धेत उत्साहाने सहभागी होत आयुष्याची संध्याकाळ चित्रमय जगतात.
दि. १२ ऑगस्ट, १९५७ साली जन्मलेले सदाशिव कुलकर्णी मूळचे सांगलीचे. सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते घडले. १९७३ रोजी ‘एसएससी’ झाल्यानंतर शिक्षण आणि नोकरीच्या शोधात मुंबापुरीत आले. घरची परिस्थिती बिकट असल्याने मिळेल ते काम, पडेल ती जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी घरोघरी दुधाची लाईनदेखील टाकली. यामुळे दूधवाला जसा ग्राहकाला थोडे दूध ‘लिटिल मोअर’ टाकून खूश करतो, तेच तंत्र सदाशिव कुलकर्णी यांनी उर्वरित जीवनातही वापरल्याने संपूर्ण आयुष्यात भरपूर ‘मच मोअर’ मिळाल्याचे सांगतात. मुंबईत ‘जे.जे.’मध्ये चित्रकलेचे उच्चशिक्षण घेतल्यानंतर ‘व्हीजेटीआय’मध्ये ‘टेक्स्टाईल डिझायनिंग’ करून सुरतला नोकरी स्वीकारली. दोन-तीन वर्षे नोकरीत मन रमवून ते ठाण्यात आले आणि शिक्षकी पेशा स्वीकारत, त्यांनी एका शाळेत शिक्षक म्हणून ३३ वर्षे नोकरी केली.
आता ते ठाणेकर जरी असले, तरी जन्माच्या मातीशी नाळ घट्ट जोडल्याने गावाकडच्या आठवणीत कुलकर्णी सर रमतात. “सर्व चित्रकारांना येतात, तसे अनुभव थोड्या-फार फरकाने मलाही आले. सांगलीमध्ये असताना गाडीच्या नंबर प्लेटपासून घरोघरी पाटावर विठोबा, लक्ष्मीची चित्रे काढून देण्यापर्यंत अनेक कामे केली,” असे ते सांगतात. मुंबईत आल्यानंतरही त्यांचा प्रवास अजिबात सुलभ नव्हता. मुंबईत आल्यानंतर सिनेमा ‘स्लाईड्स पब्लिसिटी’ची कामे, इंटेरिअरची कामं करत हटके विषय असलेले ‘कलास्पर्श’ नावाचं एक द्वैमासिक त्यांनी सुरु केले. याच द्वैमासिकाचा अडीच बाय चार इंचाचा आकाराने सर्वात छोटा दिवाळी अंकही कुलकर्णी सरांनी काढला. सोबत कुंचल्याचे आविष्कार सुरूच होते. ‘वारली पेंटिंग’च्या विविध कलाकुसरीही त्यांनी साकारल्या.
ठाण्याचे रहिवासी बनलेल्या प्रख्यात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्यावर खूप अभ्यास करून त्यांचे एक अप्रतिम मेमोरियल कुलकर्णी यांनीच साकारले असून ते सहयोग मंदिरसमोरील उद्यानात विराजमान आहे. याशिवाय जनसेवक रामभाऊ म्हाळगी यांची प्रतिकृती व सहार एअरपोर्टवरील ‘तेजरथ’ नावाचं २३ बाय १७ फुटांचं एक उठावदार चित्र ही सदाशिवरावांचीच कमाल आहे. हे करत असतानाच ५३ पुस्तकांची निर्मिती करून काही पुस्तकांची मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटदेखील त्यांनी केली. यासह अनेक ‘आयपीएस’, ‘आयएएस’ अधिकार्यांच्या घरांची सजावटसुद्धा करता आल्याचे नमूद करताना कुलकर्णी यांनी एका बड्या अधिकार्यासाठी चक्क झाडांच्या मुळ्यापासून डायनिंग टेबल बनवून दिल्याचे सांगितले.
कुलकर्णी सरांचा आणि त्यांच्या चित्रांचा देश-विदेशात प्रवास झाला. चित्रांच्या कॅनव्हासवरील अनेक प्रयोगांचे प्रभाकर कोलते, शंकर पळशीकर, वासुदेव कामत, विनोद गुरुजी, सुहास बहुळकर आदी मातब्बरांनी कौतुक केले. निसर्गचित्र आणि कृतिशील निसर्गचित्र यांची २३ प्रदर्शने त्यांनी भरवली. यातील नेपाळमधले भरलेले त्यांचे प्रदर्शन तर खूप गाजले.कलाक्षेत्रात अष्टपैलू कामगिरी बजावणार्या कुलकर्णी सरांना १९७० मध्ये पहिले पारितोषिक मिळाले. ‘महाराष्ट्र स्टेट आर्ट्स कॉम्पिटिशन’मध्ये त्यावेळी त्यांना पाच रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर ‘ठाणे नगररत्न’, ठाणे महापालिकेच्या ‘ठाणे गुणिजन’ आणि ‘सेवारत्न’ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या गणपती आरास स्पर्धांचे परीक्षणही ते गेली अनेक वर्षे करत आहेत.
चित्रकला जोपासताना त्यांना अनेक वाईट आणि सुखद अनुभवांनी समृद्ध केले. एक आठवण सांगताना ते म्हणाले की, “‘द क्लब अंधेरी’ येथे माझे प्रदर्शन भरले होते. रात्री अडीच वाजता मला फोन आला, “मला तुमचे चित्र खूप आवडले आहे, मला घेऊन जायचं आहे. पण, माझ्याकडे फार पैसे नाहीत, तुम्ही सांगा मी काय करू!” त्यावर मी, दोन हजार रुपये फक्त काऊंटरवर ठेवा आणि घेऊन जा चित्र, असं सांगितलं. पैसे मिळण्यापेक्षा त्या माणसाला आवडलेलं चित्र हा एक अनुभव मनाला खूप काही देऊन गेला.” शिक्षणमहर्षी म्हटले जाणारे बालशिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या कार्यालयाचे अफलातून इंटिरिअर कुलकर्णी यांनीच घडवले. तेव्हा काही ड्रॉव्हर असे केले होते की, पानसे यांनी त्याला चक्क ‘येडचाप ड्रॉव्हर’ असं नाव ठेवलं.
‘कलास्पर्श’ या अनियतकालिकाच्या नोंदणीला अडचणी आल्याने ‘नित्य नवा कलास्पर्श’ या नव्या नावाने ते सुरू करण्यात आले. १९८६पासून सुरू असलेल्या या अनियतकलिकात नानाविध कलाकारांचे भावविश्व टिपले. यात थोर शिल्पकार वि. वि. करमरकर यांच्यासह अनेक दुर्मीळ वस्तू संग्रहाकांना स्थान दिल्याचे कुलकर्णी सांगतात. कोरोना काळातील ‘लॉकडाऊन’मध्ये ‘नित्य नवा कलास्पर्श’ हे ‘डिजिटल मॅगझिन’ तयार झालं. त्यात ‘तंबूतला सिनेमा’ हे आगामी आकर्षण आहे. ६० जणांचा चमू साकारत असलेल्या ‘नित्य नवा कलास्पर्श’साठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्याकडे मुख्य संपादकांची जबाबदारी सोपवली असून, स्वतः कार्यकारी संपादक असल्याचे सदाशिव कुलकर्णी सांगतात.
तरुण पिढीविषयी बोलताना ते म्हणतात की, “सध्याची सगळी पिढी ‘टेक्नोसॅव्ही’ आहे. ‘सोशल मीडिया’वर पण सगळे ‘अॅक्टिव्ह’ आहेत. त्यांनी फक्त काम करताना, कामात किंचित जास्त योगदान द्यावं. जेणेकरून त्याचा फायदा नेहमीच चांगला होईल. थोडक्यात, ‘लिटिल मोअर’ या एका शब्दाने तुमचा आयुष्यपूर्ण बदलून जाईल आणि तुम्हाला ‘रिटर्न्स’ चांगले मिळतील.” अशा या चित्रकारी जगणार्या अवलियाला भावी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!