ध्येयवादी दिव्यांश!

13 Jul 2021 21:05:11
manse 2_1  H x

‘पबजी’ची सवय सोडण्यासाठी वडिलांनी ‘शूटिंग रेंज’मध्ये धाडले आणि आता ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या दिव्यांशसिंग पनवरविषयी...

सध्या ‘ऑलिम्पिक’ची केवळ भारतातच नाही, तर अगदी जगभर जोरदार तयारी सुरु आहे. कारण, आता ‘टोकियो ऑलिम्पिक’ची स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. सर्व भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी गेली काही वर्षे यासाठी अगदी कसून तयारी केली आहे. प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न आहे की, टोकियो येथे होणार्‍या या ‘ऑलिम्पिक’मध्ये पदकांची लयलूट करावी आणि भारताची जागतिक शान वाढवावी. अनेक खेळाडूंनी कष्ट करून, अनेक अडचणींवर मात करत ‘ऑलिम्पिक’चे तिकीट मिळवले आहे. गेल्या काही महिन्यांत आपण याच सदरातून अशा अनेक खेळाडूंच्या जीवनप्रवासाचा परिचय करुन घेतला आहे, ज्यांनी शून्यातून पुढे येत स्वतःची अशी एक वेगळी ओळख भारतीय क्रीडाक्षेत्रात निर्माण केली. आज आपण अशाच एका अवलियाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याला ‘पबजी’चे वेड होते, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला ‘शूटिंग रेंज’वर धाडले. हो! ही गोष्ट आहे ‘टोकियो ऑलिम्पिक’साठी पात्र ठरलेल्या नेमबाज जयपूरच्या दिव्यांशसिंग पनवर याची. जाणून घेऊया ‘पबजी’च्या वेडापायी नंतर नेमबाजीमध्ये ध्येयवादी झालेल्या या अवलियाबद्दल...

दिव्यांशसिंग पनवर याचा जन्म दि. १९ ऑक्टोबर, २००२ साली जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात झाला. त्याचे वडील अशोक पनवर हे सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत होते, तर त्याची आई निर्मलादेवी यादेखील परिचारिका म्हणून काम करत होत्या. तसेच ते औषधाचे दुकानदेखील चालवतात. दिव्यांशला तसा क्रीडाक्षेत्रातील कोणताही वारसा नव्हता. त्याने शालेय शिक्षण महेश्वरी पब्लिक स्कूलमध्ये घेण्यास सुरुवात केली. मात्र, अभ्यासामध्ये तो एक साधारण विद्यार्थीच होता. पण, लहानपणापासूनच त्याला ‘शूटिंग’बद्दल प्रचंड आकर्षण होते. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्याला ‘पबजी’ या ‘ऑनलाईन’ गेमचे प्रचंड वेड जडले होते. या सवयीपासून आपल्या मुलाची सुटका व्हावी म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला मोठी बहीण मानवीसोबत जयपूरच्या ‘जंगपुरा शूटिंग रेंज’मध्ये धाडले. दिव्यांशच्या वडिलांनी घेतलेला हा निर्णय त्याच्या भविष्याचा विचार करता मैलाचा दगडच ठरला. २०१७ पासून त्याने नेमबाजीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. लहानपणापासून नेमबाजीमध्ये आवड असल्याने ‘शूटिंग रेंज’चे हे प्रशिक्षण घेत असताना, दिव्यांशच्या खेळात उत्तम प्रगती होत गेली. दिव्यांश हा मितभाषी आणि साधे राहणीमान असलेला एक उत्तम शिष्य होता. नवी दिल्लीतील प्रसिद्ध ‘डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज’ येथे प्रशिक्षण घेण्यास त्याने सुरुवात केली. तिथे त्याने प्रशिक्षक दीपक कुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले. याचवेळी त्याने ठरवले होते की, देशासाठी एकतरी ‘ऑलिम्पिक’ पदकाची कमाई करून देशासाठी मोठे योगदान द्यायचे.

 त्यानंतर त्याने राष्ट्रीय संघात प्रवेश केल्यानंतर कुलदीप शर्मा आणि महावीर सिंग यांच्याकडे पुढचे प्रशिक्षण घेतले.२०१४ पासून दिव्यांशने नेमबाजीबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर प्रशिक्षण घेत असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत आपल्या लक्ष्यभेदी नेमबाजी कामगिरीचा प्रभाव इतरांवर पाडला होता. सराव आणि छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने २०१८ मध्ये जर्मनीतील सुहाल येथे झालेल्या ‘आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप’मध्ये चमकदार कामगिरी केली. यावेळी त्याने हृदय हजारिका आणि शाहू तुषार माने यांच्यासोबत सांघिक कामगिरी करत कनिष्ठ पुरुष संघात दहा मीटर ‘एअर रायफल’ स्पर्धेत १८७५.३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. हा त्याचा ऐतिहासिक पराक्रम होता. एवढेच नव्हे, तर याच स्पर्धेत ‘ज्युनिअर मिश्र सांघिक इव्हेंट’मध्ये इलेव्हनिल वलारिव्हनसोबत ४९८.६ गुणांची कमाई करत सुवर्ण पदक तर जिंकलेच; शिवाय एक नवा जागतिक ज्युनिअर रेकॉर्ड केला. त्यानंतर पुढे याच वर्षी चांगवॉन येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर ‘एअर रायफल’ ज्युनिअर मिश्र दुहेरी प्रकारात श्रेया अग्रवालच्या साथीने कांस्य पदकाची कमाई केली.

२०१९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘आयएसएसएफ वर्ल्डकप’च्या दहा मीटर ‘एअर रायफल इव्हेंट’मध्ये १२व्या स्थानावर दिव्यांशला समाधान मानावे लागले. मात्र, या अपयशाचे ओझे पुढे न वाहता बीजिंग येथे झालेल्या ‘आयएसएसएफ वर्ल्डकप’ स्पर्धेमध्ये रौप्य पदक त्याने मिळवले. या स्पर्धेत त्याने तब्बल सहा पदकांची कमाई केली, ज्यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. दहा मीटर ‘एअर रायफल’मध्ये त्याने स्वतंत्रपणे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले आहे. मिश्र दुहेरीत त्याने तीन सुवर्ण पदके आणि एक कांस्य पदक कमावले. त्याची ही नेत्रदीपक कामगिरी पाहता, टोकियो येथे ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेमध्ये पदकाच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत. दिव्यांशच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!










 
Powered By Sangraha 9.0