महिन्याभरात मुंबईतून व्हेलच्या उलटीच्या तस्करीची ७ प्रकरणे उघड; गुजरात-कर्नाटक कनेक्शन

12 Jul 2021 19:41:48
embargris_1  H


मुंबई (अक्षय मांडवकर) -
गेल्या महिन्याभरात मुंबईमधून 'व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीच्या (एम्बर्ग्रिस) तस्करीची सात प्रकरणे उडकीस आली आहेत. या माध्यमातून एकूण ६८ किलो 'एम्बर्ग्रिस' ताब्यात घेण्यात आलंय. या तस्करीमागे गुजरात आणि कर्नाटकमधील तस्करांचे धागेदोरे असल्याचे दिसून आले असून काही प्रयोगशाळाही यामध्ये गुंतल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई हे व्हेलच्या उलटीच्या तस्करीचे केंद्रबिंदू होत असल्याचं चित्र दिसतंय.
 
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत 'व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याला संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे वा त्याच्या कोणत्याही शाररिक अवयवाची वा घटकाची तस्करी किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. 'व्हेल'मधील 'स्पर्म व्हेल'च्या उलटीला एक मंद सुंगध असल्याने ते सुंगधी द्रव्य (परफ्यूम) तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे या पदार्थाला मागणी असल्याने त्याची छुपी तस्करी होते. मात्र, गेल्या महिन्याभरात मुंबईतून व्हेलच्या उलटीच्या तस्करीची सात प्रकरणे उघडकीस आली आहेत. मुंबई पोलिस गुन्हे शाखा आणि वन विभागाने केलेल्या कारवायांमध्ये या तस्करीचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात ठाणे वनविभागाने मुंबईतील मालाड आणि अंधेरी येथे छापा टाकून २८ किलो 'एम्बर्ग्रिस' ताब्यात घेतले.
 
 
ही दोन्ही प्रकरणे समोर आणणारे खर्डी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, "अंधेरी आणि मालाड या दोन्ही ठिकाणी 'एम्बर्ग्रिस'ची खरेदी-व्रिकी होणार असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क साधला. खरेदी रक्कम ठरवून 'एम्बिर्ग्रिस' घेण्यासाठी गेल्यावर ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना अटक केली." या प्रकरणामध्ये 'एम्बिर्ग्रिस' हे गुजरात किंवा कर्नाटकमधून आणल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. गेल्या महिन्याभरात मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि वन विभागाने मुलुंड (२.७ किलो), लोरळ परळ (७.३० किलो), महालक्ष्मी (२७ किलो), घोडबंदर (४ किलो), मरोळ (६ किलो), अंधेरी (१८ किलो) आणि मालाडमधून (८ किलो) 'एम्बर्ग्रिस'ची तस्करी उघडकीस आणली आहे. यामाध्यमातून तब्बल ६८ किलो 'एम्बर्ग्रिस' ताब्यात घेण्यात आलंय.
 
 
 
या सगळ्या प्रकरणांमध्ये 'एम्बर्ग्रिस' हे गुजरात किंवा कर्नाटकमधून आणल्याची शक्यता आहे. कारण, अटक केलेले आरोपी हे या प्रदेशाची निगडीत किंवा तिथल्या तस्करांशी संबंध असलेले आहेत. तसेच 'एम्बर्ग्रिस'ची शुद्धता तपासण्यासाठी हे तस्कर काही प्रयोगशाळांची मदत घेत असल्याची माहितीही एका वन अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे मुंबईतील 'एम्बर्ग्रिस' तस्करीमागे गुजरात आणि कर्नाटक कनेक्शन बरोबर प्रयोगशाळांचाही हात असल्याची शक्यता आहे.
 
 
एम्बर्ग्रिस’ म्हणजे ?
‘स्पर्म व्हेल’ हे ‘कटलफिश’ आणि ‘ऑक्टोपस’ म्हणजेच माकुळ प्रजातीचे मासे खातात. या माशांच्या काटेरी दंत्तपट्टीकेमुळे शरीराअंतर्गत इजा होऊ नये म्हणून व्हेल आपल्या पित्ताशयामधून एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. हा स्राव या दंत्तपट्टीकांना शरीराअंतर्गत इजा करू देत नाही. सरतेशेवटी ‘स्पर्म व्हेल’ उलटीद्वारे आपल्या शरीरातून हा अवांछित स्राव बाहेर फेकतो. काही संशोधकांच्या मते, ‘स्पर्म व्हेल’ विष्ठेद्वारे ‘एम्बर्ग्रिस’देखील शरीराबाहेर टाकून देतो. याच कारणामुळे व्हेलच्या विष्टेमध्ये माकुळ माशांचे काटेरी दात आढळून येतात. व्हेलच्या शरीरामधून बाहेर पडणारा हा स्राव समुद्राच्या पाण्यात तरंगतो. सूर्य प्रकाश आणि खार्‍या पाण्यामुळे ‘एम्बर्ग्रिस’ तयार होतो.
Powered By Sangraha 9.0