रुग्णांचे कैवारी : वैद्य स्नेहलकुमार रहाणे

01 Jul 2021 23:18:05

as_1  H x W: 0
 
 
काल राष्ट्रीय डॉक्टर दिन संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. कोरोना काळात डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येक कोरोनाबाधितांचे जीव वाचवले. त्यांना प्राणदान दिले. या दरम्यान शेकडो डॉक्टरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. एका वयोवृद्ध रुग्णाच्या दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान होऊन एका डॉक्टरने ते पुढील ४८ तासच जगू शकतील, असे सांगितले. त्या वृद्धाच्या मुलाने त्या बाबांना एका दुसर्‍या डॉक्टरांकडे आणले. त्यांनी केलेल्या उपचारामुळे ते बाबा तब्बल साडेतीन वर्षे जगले. रोगाच्या मुळाशी जाऊन त्या डॉक्टरांनी उपचार करून बाबांना वाचवले होते. शाखा कोणतीही असो. त्या शाखेचा उपयोग रोग्याचा रोग ठीक करण्यासाठी करणारा खरा डॉक्टर. त्या डॉक्टरने हे वाक्य तंतोतंत खरे करून दाखवले. हे डॉक्टर म्हणजे ‘विश्वमंगल आयुर्वेद’चे डॉ. स्नेहलकुमार रहाणे होय.
 
 
 
 
श्रीगोंदा तालुक्यातील एका खेडेगावात राहणारे श्रीकांत वसंत रहाणे सुमारे ४० वर्षांपूर्वी अहमदनगर मध्ये वास्तव्यास आले. पोस्टात चांगली नोकरी मिळाली. पण त्यांचं मन रमत होतं ते स्वतंत्र व्यवसायात. स्वत:चा व्यवसाय असावा या भावनेने त्यांनी औषधी दुकान सुरू केलं. तोपर्यंत मोठ्या मुलाने औषधी शाखेची पदवी प्राप्त केली होती. स्वेच्छानिवृत्ती घेऊन आलेला पैसा रहाणेंनी औषधी दुकानात गुंतवला. पत्नी वैशाली या घर सांभाळून रहाणेंना दुकान सांभाळण्यास मदत करायच्या. तीन मुलं सोबतीला होतीच. त्या तीन मुलांमधील मधला मुलगा होता स्नेहल.
 
 
स्नेहल यांचं प्राथमिक शिक्षण अहमदनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे माध्यमिक शिक्षण भिंगार हायस्कूलमध्ये झाले. ‘न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालया’तून बारावी झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कारणदेखील तसंच होतं. एकतर घरातच औषधी दुकान होतं. मोठा भाऊ बी. फार्मा झालेला. वहिनीदेखील ‘डीएमएलटी’ झालेली. एकूणच घरातलं वातावरण वैद्यकीय क्षेत्राला अनुकूल होतं. औषधी दुकानाच्या बाजूला पुढे दवाखाना सुरू केल्यास तो चांगला चालेल, याची खात्री होती. या सगळ्या ठोकताळ्यानुसार स्नेहल यांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी पुण्याच्या भारती विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. आयुर्वेद म्हणजे वनस्पतींचं शास्त्र. नावं न ऐकलेल्या वनस्पती कुठं शोधणार आणि मिळाल्या तरी त्याने रुग्ण कसा बरा होईल, अशा शब्दांत त्यावेळेस आयुर्वेद शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची थट्टा केली जाई. स्नेहल पण मित्रांच्या संगतीने त्यात सामील होत. पण त्यांना कुठं ठाऊक की नियतीच्या मनात काही वेगळंच आहे.
 
 
वैद्य समीर जमदग्नी म्हणजे आयुर्वेद क्षेत्रातले नावाजलेले वैद्य. एका मित्रासोबत स्नेहल सहज त्यांच्याकडे गेले. त्यावेळेस एक पोट फुगलेला माणूस त्या डॉक्टरांकडे आला होता. वैद्यांनी त्याची तपासणी केली. काही वनस्पतींचा काढा त्यास दिला आणि काही वेळात तो माणूस ठणठणीत झाला. स्नेहलसाठी हे अप्रूप होतं. ज्या वनस्पतींना आपण नाव ठेवत होतो त्याच्यामुळे ठणठणीत झालेला माणूस त्याने याचि देही पाहिला. वैद्य जमदग्नी तसे विद्यार्थीप्रिय होते. वैद्य म्हटला की, आपल्या नजरेसमोर धोती, कुर्ता परिधान केलेला, शबनम पिशवी खांद्याला अडकवलेला वैद्य येतो. मात्र हे वैद्य वेगळे होते. ते नेहमी सुटाबुटात वावरायचे. वेगवेगळ्या मोटारींमधून फिरायचे. अगदी ५० मुले जरी असली, तरी त्या मुलांना स्वखर्चाने सिनेमाला न्यायचे. कधी त्यांना नाश्ता द्यायचे. त्याचं आयुर्वेदातील ज्ञान म्हणजे जणू अमृताचा ठेवा होता. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.
 
 
 
asd_1  H x W: 0
 
 
 
आयुर्वेदामध्ये सेवा करुन सुबत्ता येऊ शकते, हे त्यांच्या राहणीमानातून जाणवत होते. वैद्यांचा प्रभाव स्नेहलवर पडला. ते आयुर्वेद विषय घेऊन वैद्य अर्थात डॉक्टर झाले. साडेचार वर्षे शिक्षणाची आणि एक वर्ष उमेदवारीची त्यांनी पूर्ण केली. उमेदवारी करत असतानाच त्यांनी आपल्या औषधी दुकानात पाटी लावली की ‘वैद्य स्नेहलकुमार रहाणे उपलब्ध आहेत.’ त्यामुळे लोकांचा ओघ वाढला होता. स्नेहलकुमारांचे सवंगडी उमेदवारी करुन नोकर्‍या शोधत असताना स्नेहलकुमारांनी स्वत:चा दवाखाना थाटला होता.
‘विश्वमंगल आयुर्वेद’ नावाने हा दवाखाना सुरू करताना त्यांनी घरातून एक रुपया पण घेतला नव्हता. उमेदवारी करत असतानाच त्यांनी ३० हजार रुपये जमवले होते. त्यातून त्यांनी भाड्याने जागा घेऊन, औषधे आणून दवाखाना सुरु केला. खरंतर स्नेहलकुमारांच्या बाबांचा त्यांच्या वैद्य होण्याला आणि आयुर्वेद क्षेत्रात जाण्याला विरोध होता. सर्वसामान्य लोकांसारखाच त्यांचादेखील समज होता की, आयुर्वेद शाखेला काही अर्थ नाही. यामध्ये पैसा नाही. मात्र वैद्य जमदग्नी स्वत: स्नेहलकुमारांच्या घरी गेले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी विविध ठिकाणांहून शेकडो विद्यार्थी आणि माणसे आली होती. जमदग्नींचा हा ’फॅन फॉलोईंग’ पाहून आपला गैरसमज झाल्याचे स्नेहलकुमारांच्या बाबांना वाटले. त्यांनी आयुर्वेदिक दवाखाना उभारणीस परवानगी दिली.
 
 
 
डिसेंबर २००१ मध्ये ‘विश्वमंगल आयुर्वेद’ उद्यास आले. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. ऐन नाक्यावर असल्याने खूप लोक चिकित्सेसाठी यायचे. अशोक नावाच्या मुलाला मुतखड्याचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यास आयुर्वेद पद्धतीने ठीक केलं. याच अशोकचे बाबा हरिभाऊ पवार आजारी पडले. डॉक्टरांनी दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान केले. निव्वळ ४८ तास उरलेत तुम्ही घरी घेऊन जा, असे त्यांच्या मुलास सांगितले गेले. मुलाने स्नेहलकुमारांना बाबांची चिकित्सा करण्याची विनंती केली. मात्र, त्याच डॉक्टरकडे उपचार करावे असे स्नेहलकुमारांनी सांगितले. अशोकने घडलेला प्रकार कथन केला. माझा मुतखडा तुम्ही ठीक केलात, तुम्ही बाबांना पण ठीक करू शकता. अशोकच्या या बोलण्याला मात्र स्नेहलकुमार कापू शकले नाही. त्यांनी हरिभाऊंना दाखल करुन घेतले. त्यांची मूत्रपिंडे निकामी झालेली नसून त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, हे स्नेहलकुमारांना जाणवले. त्यांनी त्यापद्धतीचे उपचार केले. एका आठवड्यात हरिभाऊ ठणठणीत बरे झाले. निव्वळ 48 तासांची मुदत असलेले हरिभाऊ पुढे साडेतीन वर्षे जगले.
 
 
स्नेहलकुमारांच्या या अचूक निदानामुळेच त्यांना विविध ठिकाणांहून बोलावणी येऊ लागली. बंगळुरू, बडोदा, अहमदाबाद, इंदौर अशा ठिकाणांहून त्यांना उपचारासाठी निमंत्रण येऊ लागले. दादर, ठाणे, पुणे अशा ठिकाणी ‘विश्वमंगल’च्या अन्य शाखा सुरु झाल्या. सध्या अहमदनगर आणि पुण्यात ते प्रॅक्टिस करतात. १० ते १२ लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ते रोजगार देतात. आयुर्वेदिक पद्धतीतील ‘पंचकर्म’सारख्या पद्धतीचा अवलंब करुन ते रुग्णांना बरे करतात. डॉ. स्नेहलकुमार रहाणेंच्या पत्नी डॉ. श्रुती रहाणे यादेखील डॉक्टरांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये समर्थपणे साथ देत आहेत. वैद्यकीय शाखेतील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपथी अशा शाखा येतात. या सगळ्या शाखेच्या उपचार पद्धतींचा रोग्यास चांगला गुण येऊ शकतो जेव्हा ते उपचार करणारे डॉक्टर सेवाभावी वृत्तीचे आणि निष्णात असतील तर... डॉ. स्नेहलकुमार रहाणे या वाटचालीतील एक सदगुणी आदर्श आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0