कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरूंच्या संख्येत दुपटीने वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2021
Total Views |
kalsubai-harishchandragad





मुंबई (अक्षय मांडवकर) -
कळसूबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणजेच शेकरूचा वाढता अधिवास निदर्शनास आला आहे. अभयारण्यात नुकत्याच झालेल्या शेकरू गणनेत १०६ शेकरूंची प्रत्यक्ष नोंद करण्यात आली. २०१९ च्या तुलनेत अभयारण्यामध्ये शेकरूंची संख्या दुप्पट झाली आहे.
 
 
 
पावसाळ्यापूर्वी शेकरू आपली घरटी तयार करत असल्याने दरवर्षी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये त्यांची गणना केली जाते. गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे ही गणना पार पडली नव्हती. मात्र, यंदा केवळ वनकर्मचाऱ्यांचा मदतीनेच अभयारण्यातील राजूर आणि भंडारदरा वनपरिक्षेत्रामध्ये शेकरू गणना पार पडली. २७ मे ते ३ जून दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जंगलात फिरून या गणनेचे काम केले. यावेळी त्यांनी प्रत्यक्षपणे दिसलेल्या शेकरूंबरोबरच त्यांच्या जुन्या आणि नव्या घराट्यांची नोंद केली. ही नोंद करताना त्यांनी जीपीएस यंत्राच्या मदतीने शेकरूंच्या घरट्यांच्या नेमक्या जागांचीही नोंद घेतली. या गणनेमध्ये राजूर वनपरिक्षेत्रात ९७ आणि भंडारदरा वनपरिक्षेत्रात ९ शेकरूंनी प्रत्यक्षपणे दर्शन दिल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.
 
 
 
राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे, विहीर लव्हाळी, पाचनई, कुमशेत या गावातील देवरायांमध्ये शेकरूंची संख्या अधिक आहे. त्यामध्ये कोथळे येथे आदिवासींनी राखून ठवलेल्या देवराईमध्ये सर्वाधिक ४३ शेकरू दिसून आले. त्यापाठोपाठ लव्हाळी २०, विहीर १७, पाचनई १४ आणि कुमशेतमध्ये ३ शेकरू नोंदवण्यात आले. या वनपरिक्षेत्रात शेकरूची २४४ नवीन घरटी आणि १५२ जुनी घरटी नोंदवण्यात आली. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कोलटेंभेत ६ आणि रतनवाडी येथे ३ शेकरू प्रत्यक्षपणे दिसले, तर एकूण ५७ घरटी आढळून आली.
 
 
 
  
शेकरूविषयी...
 
 
शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. त्याला झाडांवर राहणारी मोठी खारुताई असे देखील म्हटले जाते. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात तो आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून तो उपयोग करतो. उंच झाडावर शेकरू घ्ररटे बांधतो. झाडाच्या काटक्या मऊ पानांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घरटे तो तयार करतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो. शेकरू एकावेळेस १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@