'तुतारी' पक्ष्याचा नवी मुंबई ते चीन प्रवास; शहरातील पाणथळींचे महत्त्व अधोरेखित

09 Jun 2021 16:45:37
bird_1  H x W:



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाअंतर्गत नवी मुंबईच्या पाणथळीवर रिंग केलेला कर्ल्यु सॅण्डपायपर (बाकचोच तुतारी) पक्षी चीनमध्ये सापडला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'अंतर्गत हा अभ्यास सुरू असून त्याअंतर्गत या पक्ष्याच्या पायाला रिंग लावण्यात आले होते. या पक्ष्याने मुंबई ते चीन असा प्रवास केल्याने स्थलांतरित पक्ष्यांकरिता मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जागा महत्त्वाच्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय.
 
 
 
हिवाळ्यामध्ये दक्षिण आशियात आणि प्रामुख्याने भारतात स्थलांतर केलेल्या पक्ष्यांनी आता पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात केली. या स्थलांतरादरम्यान त्यांच्याकडून होणारा हजारो किलोमीटरचा प्रवास उलगडत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी रिंगिग आणि टेलिमेट्री पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये पक्ष्यांच्या पायात लोखंडी गोलाकार रिंग किंवा रंगीत फ्लॅग लावले जातात, तर सॅटेलाईट लोकेशनच्या माध्यमातून पक्ष्यांच्या प्रवासाचे ठिकाणे सांगणारे ट्रान्समीटर त्याच्या शरीरावर बसविण्यात येते. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून शतकापेक्षा अधिक काळापासून भारतामध्ये पक्ष्यांना रिंग लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईमध्ये स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांच्या पायात २०१८ पासून रिंग लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांनी मुंबई महानगर क्षेत्रात आजपर्यंत १० हजार पक्ष्यांना रिंग केले असून त्यामध्ये ३६ प्रजातींचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रज्ञांना प्रथमच मुंबईतून आंतरराष्ट्रीय सीमांपलीकडे गेलेल्या पक्ष्यांची नोंद मिळाली आहे.
 
 
 
प्रभू यांनी १८ मार्च, २०१९ रोजी नेरूळच्या पाम बीच रोडवरील टी.एस.चाणक्य इमारतीच्या मागे असलेल्या पाणथळीवर एका पक्ष्याला रिंग केले होते. कर्ल्यु सॅण्डपायपर नावाच्या या पक्ष्याच्या पायात लोखंडी रिंग लावण्याबरोबरच 7N5 सांकेतिक क्रमांक असलेला फ्लॅग लावण्यात आला होता. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वर्षभरानंतर म्हणजेच १३ जानेवारी, २०२० रोजी हा रिंग केलेला पक्षी प्रभू यांना भांडूप उद्दचन केंद्रामध्ये पुन्हा सापडला. म्हणजेच त्यावेळी या पक्ष्याने आपल्या स्थलांतराचे एक चक्र पूर्ण केले होते. हा पक्षी पुन्हा पकडला गेल्यामुळे प्रभू यांनी त्याची नोंद करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले. त्यानंतर आता हा पक्षी चीनच्या टियांजिन प्रातांमध्ये आढळून आला आहे. ६ मे रोजी हा पक्षी चीनच्या टियांजिन प्रातांतील टांगू मिठागरामधील पाणथळीवर दिसून आला. सध्या तो आपल्या विणीच्या ठिकाणी स्थलांतर करत आहे. या माध्यमातून मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जमिनी दूर देशातून स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

 
 
Powered By Sangraha 9.0