‘फिरस्ती’ची आस...

09 Jun 2021 22:01:44

Anand Sapate_1  
 
 
हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत ‘फिरस्ती’ची आस जपणारा ठाणेकर तरुण आनंद सपाटे याची चित्तरकहाणी...
 
 
‘भेटीलागी जीवा, लागलीसे आस’ या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे ऐपत नसतानाही श्रद्धेने आपल्या मुशाफिरीचा छंद जोपासणारा आनंद सपाटे ‘फिरस्ती’चा ‘आयडॉल’ ठरावा. सपाटे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील केवड या छोट्याशा खेडेगावातील. १९७०च्या दुष्काळामध्ये पोटापाण्यासाठी ठाण्यात खोपट येथे स्थलांतरित झाल्यानंतर आनंदचा जन्म झाला. शिक्षण घेत असताना आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील दिव्यांग असल्याने सुरक्षारक्षकाची नोकरी करून कुटुंबाचा गाडा हाकत, तर आई किराणामालाच्या दुकानात काम करायची. आनंदनेदेखील लहान वयापासून कधी कुरियर कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून तर कधी केटरिंगची कामं, अगदी बँकेच्या ‘एटीएम’बाहेर वॉचमन म्हणून, तर सोसायटीमध्ये मॅनेजर म्हणूनदेखील कामे केली. परिस्थितीमुळे शिक्षणाचा गाडा रुतला असतानाच, ‘समता विचार प्रचारक संस्थे’ने ‘एकलव्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले, तर पदवीच्या द्वितीय वर्षापासून ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’ने त्याला शैक्षणिक अर्थसाहाय्य केले.
 
 
 
एकीकडे हलाखीची परिस्थिती असल्याने ‘फिरस्ती’ म्हणजे नेमकं काय, हे कळतही नव्हतं, तेव्हापासून त्याने भटकंतीचा छंद जोपासला. मामाच्या गावाला जाताना धुरळा उडवत, ऐटीत धावणार्‍या लालपरीची खिडकी पकडून ‘तो’ निसर्गाच्या प्रेमात पडला. मग कालांतराने गड-किल्ले हेच त्याच आजोळ झालं आणि ट्रेकिंगचा थरार अनुभवणे हा छंद बनला. आनंदला फिरस्ती हा त्याच्या आजवरच्या आयुष्याने आणि परिस्थितीने शिकवलेला मंत्र आहे. या सगळ्या संघर्षाच्या काळात त्याचे ‘ट्रेकिंग’ आणि ‘सायकलिंग’ सुरू होते. ट्रेकच्या सुरुवातीच्या गमती सांगताना आनंद म्हणाला, “भटकायचा बेत असला की, आम्ही तीन-चार जण अगदी तयार असायचो. शनिवारी संध्याकाळी डोक्यात एखादा किल्ला यायचा, रात्री ठरलं की, सकाळी पहिली लोकल पकडून आम्ही निघालेलो असायचो.” त्यात एकदा कुठं जायचं ते ठरलं की, मग ट्रेकच वेळापत्रक बनवणं, खर्चाचा अंदाज बांधणं, बॅग भरणं, अशा बर्‍याच गोष्टी तो शिकत गेला. मग वारा प्यावा तसा मुंबईच्या आजूबाजूला असलेले गड-किल्ले त्याने सर केले. यात शहापूर तालुक्यातील माहुली, पनवेलमधील कर्नाळा, प्रबळगड, कलावंतीण, कधी कर्जतकडे कोथळीगड तर कधी कोकणात उतरून सरसगड आणि अवचितगड. ही यादी न संपणारी असल्याचे आनंद सांगतो. पुढे या प्रवासात अपघाताने सायकल सामील झाली आणि त्याची पावलं अधिक गतिमान झाली. भारत पादाक्रांत करण्याची इच्छा मनात बाळगून फिरस्ती करणारा आनंद घरचा आर्थिक भार सावरत जोमाने कुटुंबाचा तोलही सांभाळत आहे.
 
 
 
कॉलेजमध्ये असताना सायकल शिकला आणि सायकलवरून थेट कोकणात गेला. त्याचा पहिला सायकल ट्रेक म्हणजे हिमाचल प्रदेशमधला जलोरी पास. हिमाचलनंतर त्याने मग पूर्व घाटात (अरुकू), दक्षिणेत (म्हैसूर) सायकलिंग अनुभवलं आणि त्यानंतर पश्चिम घाट (उटी) सायकलिंग केली. या सार्‍या भटकंतीने त्याला जसे नवनवे अनुभव घ्यायला शिकवले तसेच घेतलेले अनुभव लिहायलादेखील शिकवले. त्यातूनच जन्म झाला प्रवासाच्या डायरीचा आणि ‘फिरस्ती’ (www.firasti.in) या ब्लॉग चा..!! या माध्यमातून तो त्याची फिरस्ती सार्‍यांसोबत शेअरही करतोय. आतापर्यंत त्याची भारतात चारी दिशांना एक-एक का होईना; पण सायकल सफर झाली आहे. फिरस्तीच्या प्रवासातला एक प्रसंग मला खूप स्पर्शून गेल्याचे तो सांगतो. ‘फिरस्ती युट्यूब’ माध्यमातून दर शनिवारी एक मराठी कविता सार्‍यासोबत शेअर करतो. एका शनिवारी त्याने सादर केलेल्या संत तुकडोजी महाराज यांच्या कवितेला एका ज्येष्ठ नागरिक महिलेने प्रतिसाद देत तिने स्वतःच कविता सादर केल्याचा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला. आपण करत असलेलं अगदी छोटंसं काम किती लोकांपर्यंत पोहोचते, आहे हे पाहून त्याला अत्यानंद झाला. त्याचबरोबर जबाबदारीचीही जाणीव झाल्याचे तो प्रांजळपणे नमूद करतो. आता त्याच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. संपूर्ण भारत सायकलवर फिरण्याचं. कारण, आपला देश, आपली माणसं, त्याला दोन चाकांवरून अनुभवायची आहेत.
 
 
आनंदला जसा आपसूकच त्याचा छंद, त्याची फिरस्ती गवसली, तसंच कामाचं क्षेत्रही गवसलं. तर्‍हेतर्‍हेची कामं केल्यानंतर त्याला जाणवलं की, ज्या ‘विद्यादान साहाय्यक मंडळा’ने त्याला मदत केली, त्या संस्थेत काम करण्याने त्याला खरा आनंद मिळतोय. मग आनंदने एका खासगी कंपनीच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) विभागात काम करण्यास सुरुवात केली आणि पुढे जाऊन सामाजिक उद्योजगता (Social Entrepreneurship) या विषयात व्यवस्थापनक्षेत्रात ‘एमबीए’ केलं. सध्या तो ‘जय वकील फाऊंडेशन’ या संस्थेत मॅनेजर म्हणून काम करीत आहे. ही संस्था संपूर्ण महाराष्ट्राभर असलेल्या गतिमंद मुलांच्या शाळांसाठी काम करते. या व्यतिरिक्त आवड, निवड आणि सवड म्हणून फिरस्ती चालूच आहे. सध्या ‘फिरस्ती’च युट्यूब चॅनेल सुरू असून या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ले, लोककला, जीवन तसेच पुढे जाऊन भारत आणि जगभर भ्रमंती करून आलेले अनुभव सर्वांसोबत मांडायचा त्याचा मानस आहे.
 
 
आज मागे वळून पाहताना काय वाटतं, असं विचारलं, तेव्हा आनंद हसत म्हणाला, “आज जेव्हा, आजवर केलेल्या ट्रेक्सची यादी बनवतो, तेव्हा मनात आजवर केलेल्या कामांचीही यादी तयार होते. कारण, काम केल्याने हातात येणार्‍या प्रत्येक रुपयाची किंमत कळली आणि ती माहीत असल्याने ट्रेकची कधीच पिकनिक झाली नाही.” आज आनंद नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळतो आहे. त्याच्या मते, सामाजिक क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून काम करणारे खूपजण आहेत, ज्याला जसा वेळ मिळेल, जशी आवड असेल त्यानुसार काम केलं जातं. मात्र, या क्षेत्रात व्यावहारिक दृष्टीचा अभाव आहे. तेव्हा, भविष्यात या क्षेत्राला एक व्यावसायिक दृष्टिकोन देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आनंदला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0