भटक्या विमुक्त समाजासाठी...

07 Jun 2021 23:15:15

Shankar Dhadke_1 &nb
 
 
सोलापूरच्या ग्रामीण भागात भटक्या-विमुक्त समाजासाठी समरसतेचा वारसा जोपासणारे प्रा. शंकर धडके यांच्या कार्याचा आणि विचाराचा घेतलेला मागोवा...
 
 
‘मरीआईवाले’ या भटक्या जमातीच्या लोकांना शिक्षणाविषयी जागृत करणे व त्यांना नागरी सुविधा (रेशन कार्ड, जातीचे दाखले, दारिद्य्ररेषेखालील नोंदी, मतदारयादीतील नोंदी इत्यादी) मिळवून देण्यासाठी शंकर प्रयत्नशील आहेत. मरीआईवाल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रा. शंकर धडके यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. इतकेच काय भटके-विमुक्त समाजासाठी कायमच त्यांच्या संवेदनशील मनाचा कोपरा अगत्याचाच राहिला. त्यामुळेच ‘भटके-विमुक्त विकास परिषद’ व ‘भटके-{वमुक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र’ या सेवाभावी संस्थांचे विविध स्नेहमेळावे, पंचपरिषद, युवक-युवतींच्या मेळाव्यात वक्ता, मार्गदर्शक म्हणून त्यांचा सहभाग आहे.
 
 
 
प्रा. शंकरराव धडके हे सोलापूरच्या समरस समाजातले एक आश्वासक नाव. प्रा. शंकरराव सोलापूरच्या सामाजिक, धार्मिक आयामात अत्यंत कार्यशील. ‘श्री. राजेराय मठ’, अक्कलकोट व ‘श्री. मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट’ अक्कलकोट येथे पुराण, प्रवचन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यात वक्ता, निरुपणकार, सूत्रनिवेदक, कार्यसमन्वयक म्हणून त्यांचा नेहमीच सहभाग. ‘सामाजिक समरसता मंच’ आणि ‘समरसता साहित्य परिषद’ यांच्या अभ्यासवर्गात, संमेलनांत वक्ता, अभ्यासक, सूत्रसंचालक म्हणून त्यांचे योगदान आहे. ‘सामाजिक समरसता मंच’च्या विविध विषयांवरील अभ्यासवर्ग, विचार यात्रा, मेळावे इत्यादीमध्येही त्यांची उपस्थिती आणि कार्यप्र{वणता वैशिष्ट्यपूर्ण. शंकररावांनी ‘पारधी व भस्म या दलित कांदबर्‍यांचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर एम.फिल केले, तर ‘भटक्या व विमुक्तांची आत्मकथने : एक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी केली आहे.
 
 
मूळचे अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस गावचे ढोर समाजातील आंदू, रत्नाबाई धडके हे दाम्पत्य. त्यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक शंकर होय. कुटुंबात संस्कार आणि माणुसकीची संस्कृती. कष्ट करावे, न्यायाने आणि माणुसकीने वागावे, असे धडे रत्नाबाई आपल्या मुलांना देत असत. या कुटुंबातले शंकरराव भटक्या-{वमुक्त समाजासाठी कार्य करू लागले, यालाही एक घटना कारणीभूत आहे.
 
 
 
शंकर त्यावेळी लहान होते. इतक्यात मरीआई समाजाचा एक मुलगा अत्यंत करुणपणे, “काही आहे का खायला?” असे विचारू लागला. अत्यंत कठोरपणे तो स्वतःच्या अंगावर आसूड मारत होता. त्यानंतर वेदनेने कळवळत तो पुन्हा-पुन्हा काहीतरी मागत होता. शंकर यांना त्यावेळी ते आवडले नाही. त्यांनी त्या मुलाला मारून हाकलवून लागले. “अरे दुष्मना, कुठं कसं हे पाप फेडशील, दारावरच्या मागतकर्‍यांना काही तरी द्यायचं असतं, मारायचं असतं?” असे म्हणत रत्नाबाईंनी त्या मरीआई समाजाच्या लेकराला परत बोलावले. त्याची मायेने विचारपूस करून त्याला भरपेट अन्न दिले आणि अन्न बांधूनही दिले. रत्नाबाईंचे वर्तन प्रा. शंकर धडके यांनी कायमच लक्षात ठेवले. त्यातच शाळेत अठरापगड समाजाचे विद्यार्थी सोबत शिकायला होते. गावात जातीय विषमता होतीच. पण, ती प्रथा म्हणून त्याविरोधात लहानपणी शंकर यांना काही वाटले नाही. मात्र, जातीयतेच्या या विषारी प्रथेचे गांभीर्य महाविद्यालयात असताना त्यांना समजले. त्या काळात ते विविध दलित साहित्य वाचू लागले. पण, तरीही आपण सगळे एकच आहोत, हा मंत्र कायम त्यांच्या मनात राहिला. महाविद्यालयात असताना त्यांचे वडील आजारी होते, आईचीही तब्येत तोळामासा. घरची गरिबी. वडिलांना रुग्णालयात भरती करायला पैसे नाहीत. अशा काळात शंकर यांच्या सोबत हॉस्टेलमध्ये राहणार्‍या त्यांच्या चार सहविद्यार्थ्यांनी आपल्या शिष्यवृत्तीचे पैसे एकत्र केले आणि ते शंकर यांना दिले. त्या पैशांनी त्यांनी वडिलांना रुग्णालयात दाखल केले. हे सगळे दोस्त वेगवेगळ्या जातगटाचे. पण, जातीपलीकडे माणुसकी हाच धर्म हे मानणारे. तर अशा परिस्थितीत शंकर एम.ए झाले आणि त्यांना महाविद्यालयात नोकरी मिळाली. त्यापूर्वीच महाविद्यालयात साठे प्राध्यापकांमुळे शंकर यांची ओळख ‘समरसता मंच’शी झाली होती. रा. स्व. संघाची शाखा आणि तिचे कार्य हेसुद्धा त्याच काळात जाणले. उगीच जातीय विषमतेमुळे भेद निर्माण करून समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍यांपेक्षा समाजाला समरस भाव देणारे ‘समरसता’चे कार्यकर्ते शंकर यांना भावले. विजयराव कापरे, दादा इदाते, मधुकर व्हटकर यांच्या वैचारिक तालमीत शंकर ‘समरसते’चे जग अनुभव लागले. अशातच एकदा दामुअण्णा दातेंची शंकर यांच्याशी भेट झाली. दामुअण्णा म्हणाले, “आपण समाजासाठी चांगले काम करता, निष्ठापूर्ण कामाची समाजाला गरज आहे. तुम्ही संवेदनशील, सुशिक्षित आहात. तुम्ही वंचित आणि संधी न मिळालेल्या समाजबांधवांसाठी यापुढेही कायमच चांगले काम कराल.” दामुअण्णांनी आपल्यावर व्यक्त केलेला हा विश्वास शंकर यांना प्रेरणा देऊन गेला. आयुष्यात आपण जमेल तसे नव्हे, तर अगत्याने समाजासाठीच काम करायचे, हे शंकर यांनी ठरवले. शंकर विविध समाजातील तरुणांना शाश्वत मानवी मूल्य संवर्धनासाठी समरस समाजाच्या निर्मितीचे महत्त्व सांगतात. शंकर म्हणतात की, “सध्याच्या जगात गुणवत्ता महत्त्वाची. तुमचे कार्य आणि विचार आणि वर्तन यातूनच तुमचे भवितव्य ठरते. ‘जात’ हा कर्तृत्वाचा आणि यशाचा निकष, नसतो.” असे हे समरसतेचा भाव समाजात निर्माण करू पाहणारे प्रा. शंकर धडके... त्यांच्या कार्याच्या समरसतेचा वारसा अखंड प्रज्वलित राहो, हीच सदिच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0