‘आरे’ आता वन विभागाच्या ताब्यात

07 Jun 2021 21:26:46

Aarey_1  H x W:
 
 
 

२८६.७३२ हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे वळते

मुंबई : गोरेगाव दुग्ध वसाहतीमधील (आरे काॅलनी) २८६.७३२ हेक्टर जागेचा ताबा वन विभागाला देण्यात आला आहे. या जागेला आता अधिकृतपणे राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला असून ही जागा यापुढे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या अधिपत्याखाली असणार आहे.
 
 
आरेमधील मेचे-३ कारशेडच्या वादानंतर ठाकरे सरकारने येथील कारशेड कांजुरमार्गला हलविले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी वनक्षेत्राची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवार दि. ७ जून रोजी आरेमधील २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपविला.मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांच्याकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक यांना हा ताबा देण्यात आला. बोरिवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला. त्यामुळे या जागेला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
 
 
बोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने ८१२ एकर जागा आता वन विभागाच्या अधिपत्याखाली आली आहे. यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
 
 
संरक्षण कसे होणार ?
 
 
२८६.७३२ हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे वळते केल्यानंतर आता या क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची असणार आहे. हे क्षेत्र राष्ट्रीय उद्यानाच्या तुळशी वनपरिक्षेत्राचा भाग असेल. त्याचा संरक्षणासाठी १ वनपाल, ४ वनरक्षक आणि ८ वनमजूरांच्या नवनियुक्तीची शिफारस सरकारकडे पाठवण्यात आली आहे. यापुढे या २८६.७३२ हेक्टर परिसरात कोणताही वनगुन्हा घडल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0