समाजासाठी झटणार्या ठाणे जिल्ह्यातील सेवाव्रती अजित भास्कर भालके या समाजाशी नाळ जोडलेल्या तरुणाविषयी...
माणसं करिअरच्या मागे लागतात. करिअर निवडीमध्ये स्वतःची प्रगती हा ध्यास घेतलेली ‘माणसं’ मैलोन्मैल प्रवास करतात. पण, सामाजिक दायित्व घेऊन प्रवास करणारी ‘माणसं’च खर्या अर्थाने समाजाला घेऊन पुढे जात असतात. असेच सामाजिक कार्य हेच करिअर ठरवून समाजासाठी झोकून देण्याची जिद्द ठेवलेल्या अजितने आजवर अनेक सामाजिक संस्थांसोबत काम केले. सध्या तो ‘जागतिक आरोग्य संस्था’ (डब्ल्यूएचओ)मध्ये ‘सिनिअर ट्रिटमेंट सुपरवायझर’ या पदावर कार्यरत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूरसारख्या ग्रामीण वनवासी भागात जन्मलेल्या अजितचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण तालुक्यातीलच किसान हायस्कूल, नडगाव येथे झाले. युवक कल्याणासाठी भरीव कामगिरी करणार्या अजितने कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, गडकिल्ले संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, कुटुंब नियोजन अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे तो सांगतो. याचीच परिणती म्हणून त्याला शासनाच्या युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
अजितचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीसोबतच वडील एका खासगी कंपनीत कामगार म्हणून निवृत्त झाले आहेत. दोन मोठ्या भावांपैकी मोठा मनोज, त्यानंतर पंकज आणि सर्वात शेवटी अजित, असे तिघेही भाऊ उच्चशिक्षित आहेत. वडील कामगार संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांचे समाजकार्य लहानपणापासूनच अजित पाहत आला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने आपणदेखील याहून मोठे काहीतरी समाजोपयोगी कार्य करायचे ठरवले. तसेच त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली.
सामाजिक जीवनात कुटुंब महत्त्वाचे असते. कुटुंबात एकत्र राहिल्याने अनेक सामाजिक मूल्यांची अनुभूती मिळते. अजितदेखील कुटुंबात सर्वात धाकटा असल्याने लहानपणी त्याला मोठ्या भावांचे कपडे परंपरेनुसार वापरावे लागल्याचे तो आवर्जून सांगतो. अजित भालके यांचे शिक्षण ‘एमएसडब्ल्यू’ (समाजकार्यकर्ता) म्हणून झाले असल्याने मागील दहा वर्षांपासून विविध सामाजिक कार्यात त्याचा हिरिरीने सहभाग असतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये ‘एनएसएस’मध्ये असतानाच अजितला विविध सामाजिक निवासी शिबिरांद्वारा समाजकार्याची आवड लागली. अनेक शिबिरांमध्ये अजितने मुंबई विद्यापीठ आणि आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिकला ‘एमएसडब्ल्यू’चे पदवी शिक्षण घेताना तिथे ‘इंडियन रेडक्रॉस’ या संस्थेकडून ‘बेस्ट पीअर एज्युकेटर’ (एचआयव्ही एड्स) असा सन्मान त्याला मिळाला. हा अभ्यासक्रम 2013 मध्ये पूर्ण करून अजितने एक वर्ष भिवंडी येथे ‘एचआयव्ही एड्स’ या आजाराविषयीच्या प्रकल्पामध्ये ‘प्रकल्प समन्वयक’ म्हणून काम केले. नंतर पुढील सहा वर्षे केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ या प्रकल्पावरदेखील काम केले. हे करीत असताना अजित विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असे. माधुरी तारमले यांच्यासोबत मिळून त्याने ‘स्वयंसिद्धा’ नावाची एक सामाजिक संस्था उभारली आणि त्या माध्यमातून आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. ‘महिला स्वसंरक्षण’ हा मुख्य उद्देश समोर ठेवून आतापर्यंत २५ हजारांहून अधिक युवक-युवतींना या संस्थेमार्फत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ‘कराटे’ या खेळातील राष्ट्रीय स्तरावरील (एनकेएफ) ‘रेफ्री’ म्हणून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
समाजकार्य करीत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु, आई-वडील आणि सामाजिक क्षेत्रातील मित्र याच्या मार्गदर्शनामुळे त्यावर मात करता आल्याचे अजित सांगतो. मुंबई येथे शासनाकडून आयोजित युवा प्रशिक्षण शिबिरामध्ये उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून अजितची निवड झाली होती, तर मागील दोन वर्षांपूर्वी अजितने आंतरराष्ट्रीय ‘निफा’ या शिबिरामध्ये हरियाणा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले होते, त्यावेळी विविध देशांमधून युवक-युवती उपस्थित होते. त्यांनी या शिबिरात सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर वैचारिक देवाणघेवाण केली. ‘एनजेन्डर हेल्थ’ या संस्थेमध्ये ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ या पदावरदेखील काम केले आहे. यामध्ये ‘कुटुंब नियोजन’ हा मुख्य उद्देश ठेवून जनजागृती केली. सध्याच्या ‘कोविड’ काळामध्येदेखील गरजूंना धान्यवाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच रुग्णांना रक्तपेढीतून रक्त मिळवून देणे, ‘प्लाझ्मा’ देणे आदी कामे ‘कोविड’काळात त्याने केली.
मागील वर्षी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणेद्वारे ‘जिल्हा युवा पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आल्याचे अजित अभिमानाने नमूद करतो.
“माझ्या या यशामध्ये अनेकांचा वाटा आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मला समाजकार्यासाठी प्रेरीत करणार्या माझ्या आई-वडिलांचा, मला मार्गदर्शन करणार्या माझ्या गुरुजनांचा, माझ्यासोबत प्रत्यक्ष काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला मदत करणार्या त्या असंख्य हातांचा आहे,” असे अजित कृतज्ञपणे व्यक्त करतो. भविष्यामध्ये युवक कल्याणकारी उपक्रम राबविणे हा महत्त्वाचा उद्देश असून राज्य युवा परिषदेच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. शासनाने राज्य युवा धोरणाची अंमलबजावणी करून, जसे खेळ मंत्रालय आहे, त्या धर्तीवर स्वतंत्र ‘युवक कल्याण मंत्रालय’ होणे गरजेचे आहे, तर इतर सामाजिक उपक्रमांबरोबरच युवावर्गासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण हा उपक्रम यापुढे देखील सुरु ठेवण्याचा मानस अजितने व्यक्त केला आहे.
युवक कल्याण आणि समाजोपयोगी कामे करीत असताना समाजातील वंचित घटकांसाठी, तसेच गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याचे व्रत अंगीकारलेल्या अजित भालके याने हे समाजकार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!