बांबूतज्ज्ञ संजीव कर्पे

03 Jun 2021 20:56:58

sanjeev karpe_1 &nbs


‘सेंटर फॉर इंडियन बांबू रिसोर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘सिबार्ट’चे संचालक म्हणून संजीव कर्पे कार्यरत आहेत. तसेच युरोपियन युनियनच्या अर्थसाहाय्याने सुरु असलेल्या एका प्रकल्पावर ते बांबूतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाचे ‘मॉड्यूलर बांबू फर्निचर क्लस्टर, सिंधुदुर्ग’ याचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा संजीव कर्पे कार्यरत आहेत.

मालदीवच्या ‘टॉप हॉटेल’ कंपनीने पर्यटकांसाठी कॉटेजेस् बांधायची ठरवली. सिंधुदुर्गच्या तरुणाने त्यांना बांबूच्या कॉटेजची कल्पना सांगितली, जी त्यांना आवडली. मात्र, त्या तरुणाने कॉटेजेस् बांधण्यासाठी येणार्‍या खर्चाची किंमत जी सांगितली त्यावरुन त्या कंपनीला वाटले की, एवढ्या स्वस्तात हा तरुण कॉटेज बांधून देतो म्हणजे ते हलक्या प्रतीचं असणारं. हॉटेलने त्या तरुणाचा प्रस्ताव फेटाळला. पण, कालांतराने हॉटेल व्यवस्थापनाने काही कॉटेजेस् बांधण्याची विनंती त्याच तरुणाकडे केली. त्या तरुणाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागिरांच्या मदतीने, सिंधुदुर्गातील बांबू वापरुन जे काही अप्रतिम तयार केलं, त्याला ‘सीएनएन-युके’ या प्रतिष्ठेच्या वृत्तवाहिनीने गौरविले. २०१९मध्ये जगातल्या सर्वोत्तम दहा कलाकृतींमध्ये त्यांना नामांकन मिळून जगातील पहिल्या तीन सर्वोत्तम रिसॉर्ट्ससाठी त्यांचा सन्मान झाला. हा भीमपराक्रम करणारा तो तरुण म्हणजे ‘नेटिव्ह कॉनबॅक बांबू प्रॉडक्ट्स प्रा. लि’चे अध्यक्ष संजीव कर्पे होय.

कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण, याची दुसरी एक खासियत अशी की, भारतात सर्वांत जास्त बांबूचे उत्पादन घेणारादेखील हा एकमेव जिल्हा आहे. या जिल्ह्यातल्या कर्पे कुटुंबात संजीव यांचा जन्म झाला. संजीव यांच्या बाबांचा, शशिकांत शंकर कर्पेंचा इलेक्ट्रिक साधन विक्री करण्याचा व्यवसाय होता. आई सरिता या आपल्या तीन कन्या आणि चिरंजीव संजीव यांचा सांभाळ करत होत्या. त्यांच्यावर सुसंस्कार करत होत्या. संजीव यांचं प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण पाटकर हायस्कूल मध्ये झालं. अकरावी-बारावी ‘साबू सिद्दिकी’मधून केल्यावर पुढे बाबांच्या व्यवसायाला पूरक अशा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला जाण्याचं ठरलं. त्याप्रमाणे ‘रत्नागिरी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक’मधून तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअर’ची पदविका संजीवनी मिळवली.त्यानंतर संजीवना ‘आयआयएम, लखनौ’मधून सोशल ‘आंत्रप्रिन्युअर’ची फेलोशिप मिळवली.

sanjeev karpe_1 &nbs


वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत असतानाच त्याकाळी कोकणात अवतरलेल्या कोकण रेल्वेसाठी काही काम करण्याची संधी त्यास मिळाली. संजीव यांच्या कंपनीने कोकण रेल्वेत सुरुवातीला इलेक्ट्रिकल क्षेत्रातील कामास सुरुवात केली, त्यानंतर मेकॅनिकल आणि नंतर सिव्हील या प्रकारचे कंत्राटसुद्धा मिळवले. कोकण रेल्वेचा सर्वांत लांब बोगदा म्हणजे रत्नागिरीतील ‘करबुडे’ बोगदा. या बोगद्याला काँक्रिटद्वारे सुरक्षित करण्याचं काम संजीव कर्पेंनी केले होते. त्याचप्रमाणे ‘लिनलिंकीग’चे काम असो की इतर बोगद्यांचे काम तेदेखील संजीव कर्पेंनीच केले आहे. त्यांच्या कामाचा दर्जा इतका उच्च होता की, कोकण रेल्वेच्या इतिहासातील रोख रकमेचे सर्वोच्च बक्षिस त्यांच्याच कंपनीला मिळाले. कोकण रेल्वेसोबतच गुवाहाटी, आंध्र प्रदेश या ठिकाणीसुद्धा रेल्वेच्या प्रकल्पासाठी त्यांनी काम केले.

२००४मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे तत्कालीन खासदार सुरेश प्रभू हे सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी कुडाळमधल्या विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणार्‍या तरुणांसोबत संवाद साधला. यावेळी भविष्यातील कोकणचा विकास याविषयी बोलताना बांबू उत्पादन, त्यातील संधी यावर त्यांनी भर दिला. त्यासंबंधी कोकणातल्या तरुणांनी विचार करुन एक उद्योग म्हणून उभारावा असे सुचवले. आपल्या खासदाराने आपल्या भागात पंचतारांकित हॉटेल उद्योगक्षेत्र कसे उभे राहील, असे काही बोलण्याची अपेक्षा असलेल्या त्या तरुणांना हे काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं. मात्र, सुरेश प्रभू निव्वळ राजकीय नेते नसून एक दूरदर्शी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे, हे माहीत असणार्‍यांनी प्रभूंच्या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली.

या विचारमंथनातून ‘कोकण बांबू अ‍ॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर’ अर्थात ‘कॉनबॅक’ ही संस्था उभी राहिली. संजीव कर्पे या संस्थेचे संस्थापक संचालक होते. कोकणातील बांबू उत्पादकांना व्यावसायिकदृष्ट्या प्रोत्साहित करणे, बांबूवर प्रक्रिया करुन त्यापासून निरनिराळे उत्पादन घेणे आदी संस्थेची मुख्य कार्ये होती. आपल्या अन्य सहकार्‍यांसह संजीव कर्पेंनी संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ही संस्था गेल्या १७वर्षांपासून कार्यरत आहे. ही संस्था बांबू उत्पादन क्षेत्रात काम करणार्‍या ‘इनबार’ या शिखर संस्थेसोबत काम करु लागली. ‘इंटरनॅशनल नेटवर्क फॉर बांबू अ‍ॅण्ड रत्तन’ असे या संस्थेचे विस्तृत शीर्षक आहे. जगातील ४६ देश संस्थेचे सदस्य असून चीनमधील बीजिंग शहरात संस्थेचे कार्यालय आहे. ‘इनबार टास्क फोर्स- बांबू कन्स्ट्रक्शन’ या समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून संजीव कर्पे कार्यरत आहेत. २००९मध्ये कर्पेंनी ‘नेटिव्ह कॉनबॅक बांबू प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या नावाची कंपनी स्थापन केली. अवघ्या २० कामगारांसह सुरु झालेल्या या कंपनीत सध्या ४५०हून अधिक कामगार कार्यरत आहेत. भारतातील सर्वांत मोठा बांबू बांधणी प्रकल्प कंपनी उभारत असून १० हजार, ७५०चौरस फूट क्षेत्रफळात हा प्रकल्प विस्तारलेला असून तब्बल ८२ फूट उंच आहे. भारतातील विविध राज्यांत या कंपनीच्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. परदेशात युगांडा आणि मालदीव येथे कंपनीने प्रकल्प तयार केले आहेत.



sanjeev karpe_1 &nbs


मालदीव देशातील एक उद्योगसमूह पर्यटन केंद्र उभारत होते. या कंपनीला कर्पे यांनी बांबूच्या कॉटेजेस्ची माहिती दिली. ही माहिती ऐकून उद्योगसमूहाचा अध्यक्ष प्रभावित झाला. किती किमतीत हे कॉटेज तयार होईल, असे त्याने विचारले. मूळ खर्चापेक्षा परदेशातील बांधणीस खर्च जास्त म्हणून त्यांनी २० लाखांचा आकडा सांगितला. दुसर्‍या दिवशी सादरीकरणाची बैठक ठरली. मात्र, दुसर्‍या दिवशी ही बैठक रद्द करण्यात आल्याचे तो अधिकारी म्हणाला. त्याने सांगितलेल्या कारणामुळे उद्योगाकडे पाहण्याचा संजीव कर्पेंचा एकूण दृष्टिकोन बदलून गेला. तो अधिकारी म्हणाला, “आम्ही तयार करत असलेल्या एका कॉटेजच्या निर्मितीचा खर्च सुमारे दीड कोटी रुपये इतका आहे. तोच तुम्ही २० लाख रुपयांमध्ये तयार करून देणार आहात. त्यामुळे आमच्या कंपनीला असे वाटते की, एवढा आलिशान आणि कोट्यवधींचा प्रकल्प तयार करण्यास आपण सक्षम नाही.” नियतीचे फासे पण असे पडले की, याच हॉटेल समूहासाठी कर्पेंच्या कंपनीने जे रिसॉर्ट बांधले, त्यास ‘सीएनएन’ या प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने सन्मानित केले. एवढेच नव्हे, तर २०१९च्या सर्वोत्तम पहिल्या तीन रिसॉर्ट्समध्ये त्यांचे नाव आले. खर्‍या अर्थाने हा सन्मान भारताचा, महाराष्ट्राचा आणि सिंधुदुर्गचा होता. कुडाळच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने आपले नाव जागतिक पटलावर कोरले होते.

साध्या खुर्चीपासून ते अलिशान कॉटेजपर्यंत सारं काही ‘नेटिव्ह कॉनबॅक’ तयार करते. बांबूपासून उत्पादन तयार करणारी अशाप्रकारची बहुधा ही एकमेव कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील शेकडो तरुणांना रोजगार मिळाला तर काहीजणांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. बांबू उत्पादन व व्यवसायाची तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी संजीव कर्पे भारतभर जनजागृती करतात. कुडाळमध्ये ते प्रशिक्षणदेखील देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना संचालक म्हणून नियुक्त केले आहे. ‘सेंटर फॉर इंडियन बांबू रिसोर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘सिबार्ट’चे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच युरोपियन युनियनच्या अर्थसाहाय्याने सुरु असलेल्या एका प्रकल्पावर ते बांबूतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाचे ‘मॉड्यूलर बांबू फर्निचर क्लस्टर, सिंधुदुर्ग’ याचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा संजीव कर्पे कार्यरत आहेत.संजीव कर्पे यांच्यासोबत बोलताना बांबू उत्पादनाची तळमळ त्यांच्या प्रत्येक वाक्यात जाणवते. येणार्‍या पिढीसाठी आपल्याला जर चांगले पर्यावरण द्यायचे असेल, तर बांबू सारख्या उत्पादनांना पर्याय नाही. टिकाऊ आणि कमी खर्चिक असे हे उत्पादन कुठेही सहज वाहून नेण्याजोगे आहे. निव्वळ तीन वर्षांत उभे राहणारे आणि कितीही वेळा कापले तरी पुन्हा उगवणारे असे हे पीक वरदान आहे. प्रत्येकाने बांबू उत्पादनाचा गांभीर्याने विचार करावा, या क्षेत्रात अमाप संधी आहेत, त्याकडेदेखील डोळसपणे पाहावे.संजीव कर्पे खर्‍या अर्थाने बांबूतज्ज्ञ आहेत.
Powered By Sangraha 9.0