मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेची खाण असणाऱ्या आंबोली गावातून गोगलगायीची नवी पोटजात आणि प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या पोटजातीला ‘वरदिया’ असे नाव देण्यात आले असून प्रजातीचे नामकरण ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आंबोलीतून शोधण्यात आलेली ही २१ वी नवीन जीव प्रजात आहे.
पावसाला सुरुवात झाल्यावर गोगलगायींच्या अनेकविध प्रजाती दिसू लागतात. शंखधारी गोगलगायींच्या या प्रजातींमध्ये आता नव्या पोटजातीची आणि प्रजातीची भर पडली आहे. सिंधुदुर्गातील आंबोली गावातील ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळा’मधून ही पोटजात शोधण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. कराडमधील ‘संत गाडगे महाराज महाविद्यालया’तील प्रभारी सहाय्यक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले, ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे, दिपक मुळ्ये आणि ‘एनएचएम लंडन’चे डाॅ. दिनारझार्दे रहिम यांनी हा शोध लावला आहे. ‘युरोपियन जर्नल आॅफ टॅक्सोनाॅमी’ या संशोधन नियतकालिकामध्ये मंगळवारी या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले.
सप्टेंबर, २०१७ साली आंबोलीमध्ये सर्वेक्षण करताना भोसले यांना ही प्रजात सर्वप्रथम आढळली. त्यानंतर २०१९ आणि २०२० च्या पावसाळी हंगामातही त्यांना ती दिसून आली होती. ही प्रजात याठिकाणी आढळणाऱ्या दुसऱ्या एका गोगलगायीच्या प्रजातीबरोबर साम्य साधणारी होती. अशावेळी भोसले यांनी जिज्ञासेपोटी या नव्या प्रजातीचे नमुने गोळा केले. या नमुन्यांची डीएन तपासणी, शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शनसिस्टमचे निरिक्षण केल्यानंतर ही केवळ नवीन प्रजात नाही, तर गोगलगायीची नवीन पोटजात असल्याचे आम्हाला समजल्याची माहिती भोसले यांनी दिली. गोगलगायीच्या या नव्या पोटजातीचे नामकरण ज्येष्ठ सरीसृप आणि उभयचर शास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी यांच्या नावे ‘वरदिया’ असे करण्यात आले असून प्रजातीचे नामकरण आंबोलीच्या नावे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘वरदिया आंबोलिएन्सिस’ ही पश्चिम घाटाला प्रदेशनिष्ठ असणारी प्रजात आहे. म्हणजेच पश्चिम घाटाखेरीच ती जगात कुठेही आढळत नाही. आंबोली धबधबा, शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ, आंबोली वन उद्यान, तिलारीतील कोडीळी आणि कर्नाटकातील याना वनक्षेत्रामध्ये ही प्रजात आजवर आढळून आली आहे. ही गोगलगाय इतर गोगलगायींप्रमाणेच आर्द्रता असलेल्या ठिकाणी आढळते. आंबोली धबधब्यानजीक झाडावर, पाळापोचोळ्यामध्ये, दगडावर आणि हिरण्यकेशी मंदिराच्या भिंतींवर ही गोगलगाय दिसून येते. तिचा रंग करडा काळसर असून ती ७ सेंटीमीटर पर्यंत वाढते.
नव्याने घोषित झालेले ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ’ हे वाघ, शिस्टुरा हिरण्यकेशी मासा, काही सरीसृप-उभयचरांच्या प्रजाती आणि आता ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ या नव्या गोगलगायीच्या प्रजातीचे अधिवासक्षेत्र झाले आहे. गोगलगायींसारख्या सूक्ष्म प्रजातींचा फार कमी अभ्यास झाला असून पश्चिम घाटामध्ये त्या अनुषंगाने अभ्यास होणे आवश्यक आहे. कारण, मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. डॉ. अमृत भोसले हे मागील काही वर्षांपासून नव्याने शोधलेल्या गोगलगायीच्या प्रजातीवर काम करत असून या शोधाला हातभार लावल्याचा मला आनंद आहे.
- तेजस ठाकरे, संशोधक
आंबोलीचे महत्व
सांवतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव विस्तारले आहे. या गावाचा परिसर जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट आहे. कारण, उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग असल्याने या ठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे इथली जैवविविधता समृद्ध आहे. एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ पासून २० नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींमध्ये काही साप, उभयचर, खेकडे, कोळी आणि स्काॅरपियन प्रजातीबरोबरच 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या माशाचाही समावेश आहे. या गावामध्ये शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ असून येथील वनक्षेत्राचा समावेश आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये होतो.
डाॅ. वरद गिरींविषयी…
डाॅ. गिरी हे भारतातील ज्येष्ठ सरीसृप आणि उभयचर शास्त्रज्ञ आहेत. तरूण संशोधकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या गिरी बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सरीसृप आणि उभयचर जीवांमधील तीन पोटजाती आणि ५७ प्रजाती शोधून काढल्या असून ५ प्रजाती आणि एका पोटजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. गोगलगायीसारख्या छोट्या प्रजातींवर काम करणारे फार कमी संशोधक असून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे गिरी यांनी सांगितले.