पुस्तकविक्रीचा जादूगार!

29 Jun 2021 21:27:18

Nikhil Date_1  
 
 
नाशिक येथील निखिल दाते यांच्या साहित्यसेवेच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
साहित्यसेवेमध्ये लेखक, कवी, प्रकाशक, वाचक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकविक्रेते यांचा बहुमोल सहभाग असतो. मान्यवर लेखकांनी साकारलेली साहित्यकृती ही वाचकांच्या सेवेत सुपूर्द होण्याकामी पुस्तकविक्रेते हे कायमच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वाचकांना जे म्हणून पुस्तक हवे ते उपलब्ध व्हावे, सरस्वतीचा वावर हा ज्ञानी लोकांना सहज अनुभवता यावा, यासाठीची ‘पुस्तकपेठ’ नाशिक शहरात वाचकांच्या सेवेत आहे. नाशिक येथील निखिल दाते यांनी आकर्षक ‘पुस्तकपेठ’ साकारत नाशिकच्या साहित्य संस्कृतीत एक मोलाचे योगदान दिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
 
निखिल उत्तम दाते हे मूलत: स्थापत्यशास्त्र अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत. तसेच त्यांनी ‘इंटेरिअर डिझाईन’ची पदविकादेखील प्राप्त केली आहे. अनेकांना सुयोग्य आसरा मिळावा, या पद्धतीचे शिक्षण घेतलेल्या दाते यांनी आपल्या कार्याद्वारे विविध साहित्यकृतींना एकाच छत्राखाली आणत नागरिकांसाठी साहित्यविश्व खुले करून दिले. सुरुवातीच्या काळात दाते यांनी नाशिकमधील एका नामांकित वास्तुविशारद यांच्याकडे चार वर्षे सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे बहारीन येथील एका नामांकित वास्तुविशारद संकुलामध्ये ‘चीफ इंटिरिअर डिझायनर’ म्हणून कामदेखील केले. या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा अनुभव घेण्याची संधी दाते यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव हा भारतात कार्य करण्याकामी यावा, यासाठी त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. ‘व्हेनचर्स-७’ या आपल्या फर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणांना सुशोभित केले आहे. विविध कार्यालये, अपार्टमेंट्स, दवाखाने, आदींना सुशोभित करुन त्यांचे स्वरुपच पालटले आहे. न केवळ नाशिक, तर पुणे, मुंबई आदी ठिकाणीदेखील दाते यांनी कार्य केले. आजवर जवळपास तीनशेहून अधिक कामे यशस्वीरीत्या करत दाते यांनी आपला नावलौकिक वाढविला आहे.
 
 
 
दि. १२ नोव्हेंबर, २०१७ रोजी उत्तम वाचक असलेल्या दाते यांनी ‘पुस्तकपेठ’ हे मराठी, इंग्रजी आणि हिंदी साहित्यिक पुस्तकांचे ग्रंथदालन सुरू केले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, वनाधीपती विनायकदादा पाटील आणि सिनेअभिनेता किशोर कदम यांच्या हस्ते ‘पुस्तकपेठे’चे उद्घाटन करण्यात आले. साहजिकच आहे की, दाते हे ‘इंटिरिअर डिझायनर’ असल्यामुळे ‘पुस्तकपेठ’चे स्वरूप अत्यंत देखणे साकारण्यात आले आहे. कोणत्याही कामात परिपूर्णता असणे आवश्यक असते आणि तेच पेठेत पुस्तकांची मांडणी करताना लक्षात घेण्यात आले. पेठेत वाचकांना सोयीचे व्हावे, यासाठी विषयानुसार पुस्तकांची मांडणी करण्यात आली. त्यातदेखील लेखक, प्रकाशक यानुसार वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे पेठेत दाखल वाचकांना आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करणे सहज सोपे होते. नाशिक हे पहिल्यापासूनच संपन्न साहित्यिक वारसा जोपासणारे शहर. त्यामुळे दाते यांचा ‘पुस्तकपेठ’ सुरू करण्याचा उद्देशच मुळी वाचनसंस्कृती वाढील लागावी, हाच आहे. तसेच ज्या साहित्यिकांची पुस्तके वाचक वाचतात, त्याच लेखकांना वाचकांच्या भेटीचे व्यासपीठ साकारले जावे, यासाठी जानेवारी २०१८ मध्ये पेठेतच लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली.
 
 
 
बघता बघता ‘पुस्तकपेठ’ अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून, रसिक वाचकांपर्यंत पोहोचू लागली. आजपर्यंत पन्नासपेक्षा जास्त कार्यक्रम पेठेमार्फत राबविण्यात आले आहेत. अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, कादंबरीकार विश्वास पाटील, अच्युत पालव, किशोर कदम, नितीन रिंढे, किरण येले, प्रवीण बांदेकर, गोविंद काजरेकर, मंगेश काळे, किशोर पाठक, संजय भास्कर जोशी, नीलांबरी जोशी अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचे कार्यक्रम दाते यांनी आयोजित केले आहेत. तसेच, जे साहित्यिक आणि कलाक्षेत्रातील मान्यवर नाशिकमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी येतात, तेव्हा ते पेठेत आवर्जून भेट देत असतात. वाचनसंस्कृती रुजावी आणि वाढावी, यासाठी पेठेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते दि. १ मे, २०१९ रोजी पेठेत महाप्रदर्शन आणि विक्रीचादेखील शुभारंभ करण्यात आला. तत्पर सेवा, कामात पारदर्शकता आणि नवे आणि दुर्मीळ पुस्तक उपलब्ध करून देणे, हेच पेठेच्या कार्याचे गमक आहे.
 
 
 
आजवर पेठेचे तीन हजारांपेक्षा जास्त वाचक आहेत. केवळ शहरात नाही, तर ग्रामीण भागातदेखील पेठेच्या माध्यमातून पुस्तकं वाचकांच्या सेवेत पोहोचविण्यात येत आहेत. वाचकांच्या मागणीनुसार ‘पुस्तकपेठे’चे ‘अ‍ॅप’देखील सुरू करण्यात आले आहे. दाते यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’ पुस्तकविक्रेता उत्तेजन पुरस्कारदेखील मिळाला आहे. साहित्य हे नेहमीच दिशादर्शक आणि ज्ञानवृद्धी करणारे असते. त्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचेही पाहायला मिळते. साकारण्यात आलेली साहित्यकृती ही जर सहज उपलब्ध झाली, तर, तिची उपयोजिता नक्कीच सिद्ध होते; नव्हे तिला गती मिळत असते. ‘पुस्तकपेठ’च्या माध्यमातून दाते वाचकांची ही अभिलाषा पूर्ण करत आहेत. त्यामुळेच त्यांचे हे कार्य एका किमयागारापेक्षा कमी नाही, असेच म्हणावेसे वाटते. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0