व्हेलच्या उलटीला समुद्रातील सोनं का म्हणतात ?

28 Jun 2021 14:58:08
whale ambergris _1 &



मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या आठवड्यामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील दोन ठिकाणी छापा मारून व्हेल माशाची उलटीची (एम्बर्ग्रिस) तस्करी उघडकीस आणली. मुलुंडमध्ये मारलेल्या छाप्यामध्ये २.७ किलो वजनाची व्हेलची उलटी हस्तगत करण्यात आली, तर लोअर परळ येथून ७.७५ किलो वजनाचे ‘एम्बर्ग्रिस’ ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सुकवलेले समुद्री घोडे, प्रवाळ, सी-फॅन, शार्क माशांचे पंख आणि ‘एम्बर्ग्रिस’चा समावेश आहे. मुंबईतून एकाच आठवड्यात ‘एम्बर्ग्रिस’च्या तस्करीची दोन प्रकरणे समोर आल्याने, आजही शहरात छुप्या पद्धतीने या पदार्थाची तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक मच्छीमार समुदाय ‘एम्बर्ग्रिस’ला मिळणार्‍या किमतीच्या हव्यासापोटी तस्करांच्या गर्तेत सापडत आहे. त्यामुळे लागलीच वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीकडे प्रकाशझोत टाकणे गरजेचे झाले आहे.
 
 
महाराष्ट्रातील व्हेल
 
महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रामध्ये व्हेल म्हणजेच देवमाशाच्या काही प्रजातींचा अधिवास आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सागरी परिक्षेत्रात त्यांचा प्रामख्याने वावर आढळतो. सागरी जीवशास्त्रज्ञांच्या नोंदीप्रमाणे ‘ब्लू व्हेल’, ‘बृडस् व्हेल’, ‘हम्पबॅक व्हेल’, ‘स्पर्म व्हेल’, ‘ड्वार्फ स्पर्म व्हेल’, ‘कुविअरस् बिक्ड व्हेल’ यांचा वावर राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आहे. ‘स्पर्म व्हेल’च्या उलटीला ‘एम्बर्ग्रिस’ म्हणतात. मात्र, राज्यातील स्थानिक मच्छीमार समाजाला या माशांविषयी दैवी आस्था असल्याने ते या माशाची शिकार करत नाही. अनावधानाने सापडलेल्या ‘एम्बर्ग्रिस’ची खरेदी-विक्री केली जाते.
 
 
 
‘स्पर्म व्हेल’ आणि ‘एम्बर्ग्रिस’
 
‘स्पर्म व्हेल’ हे ‘कटलफिश’ आणि ‘ऑक्टोपस’ म्हणजेच माकुळ प्रजातीचे मासे खातात. या माशांच्या काटेरी दंत्तपट्टीकेमुळे शरीराअंतर्गत इजा होऊ नये म्हणून व्हेल आपल्या पित्ताशयामधून एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. हा स्राव या दंत्तपट्टीकांना शरीराअंतर्गत इजा करू देत नाही. सरतेशेवटी ‘स्पर्म व्हेल’ उलटीद्वारे आपल्या शरीरातून हा अवांछित स्राव बाहेर फेकतो. काही संशोधकांच्या मते, ‘स्पर्म व्हेल’ विष्ठेद्वारे ‘एम्बर्ग्रिस’देखील शरीराबाहेर टाकून देतो. याच कारणामुळे व्हेलच्या विष्टेमध्ये माकुळ माशांचे काटेरी दात आढळून येतात. व्हेलच्या शरीरामधून बाहेर पडणारा हा स्राव समुद्राच्या पाण्यात तरंगतो. सूर्य प्रकाश आणि खार्‍या पाण्यामुळे ‘एम्बर्ग्रिस’ तयार होतो. ‘एम्बर्ग्रिस’ हा काळा, पांढरा आणि राखाडी रंगाचा एक तेलकट पदार्थ आहे. समुद्रात तरंगताना त्याला अंडाकृती किंवा गोल आकार येतो. हा पदार्थ ज्वलनशील आहे. असे मानले जाते की, ‘स्पर्म व्हेल’च्या डोक्यावर असा एक अवयव असतो, ज्याला ‘स्पर्मेट्टी’ म्हणतात. हा अवयव तेलाने भरलेला असतो. हे तेल व्हेलचे वीर्य किंवा शुक्राणू असल्याचे मानले जाते. म्हणूनच, या व्हेलला ‘स्पर्म व्हेल’ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला ‘एम्बर्ग्रिस’ला सुगंध नसतो. परंतु, हवेबरोबर या पदार्थाचा संपर्क वाढल्यानंतर त्यामधील सुगंध वाढत जातो. त्यामुळे सुगंधित वस्तू खास करून परफ्यूम तयार करण्यासाठी ‘एम्बर्ग्रिस’ खूप उपयुक्त आहे. ‘एम्बर्ग्रिस’ हे परफ्यूममधील सुगंधाला हवेमध्ये उडू देत नाही. ते दुर्मीळ असल्याने त्याची किंमतदेखील खूप जास्त असते. त्याला समुद्री सोने किंवा तरंगणारे सोनेदेखील म्हणतात. त्याचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रति किलो १.५ कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
 
 
‘एम्बर्ग्रिस’ची तस्करी
 
‘एम्बर्ग्रिस’ हा दुर्मीळ पदार्थ असल्याने त्याला मोठी मागणी आहे. या पदार्थाला अरब देशांमध्ये मोठी मागणी आहे. अरब देशातील लोक हा पदार्थ खरेदी करण्यासाठी सर्वाधिक किंमत मोजायला तयार असतात. भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळमधून ‘एम्बर्ग्रिस’ची तस्करी केली जाते. हाडे, तेल आणि ‘एम्बर्ग्रिस’साठी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात व्हेल प्रजातींची शिकार केली जाते. यामुळेच १९७० पासून युरोप, अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत १९८६ सालापासून ‘स्पर्म व्हेल’ला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे, वा त्याच्या कोणत्याही शारीरिक अवयवाची वा घटकाची तस्करी किंवा खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.
 
कामोत्तेजक औषधांमध्ये वापर
 
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ‘एम्बर्ग्रिस’चा अत्तर आणि औषध तयार करण्यासाठी वापर होतो. आयुर्वेदाव्यतिरिक्त, कामोत्तेजक औषधांमध्येदेखील ‘एम्बर्ग्रिस’चा वापर केला जातो. ‘एम्बर्ग्रिस’ हे शतकानुशतके ग्रीक औषधात वापरले जात आहे. अनेक औषधी वनस्पतींमध्ये मिसळून याचा उपयोग शारीरिक, मानसिक,चिंताग्रस्त आणि लैंगिक आजारावरील उपचारासाठी केला जातो.‘एम्बर्ग्रिस’ हे साखरेचे पाक आणि इतर औषधी वनस्पतींमध्ये मिसळून उपचारासाठी वापरले जाते. त्यातून बनवलेल्या औषधाला ‘माजुन मुमसिक मुक्कावी’ असे म्हणतात. लैंगिक समस्यांच्या उपचारासाठी याची भरड बनवून औषध म्हणून दिले जाते. यामुळे लैंगिक क्षमता वाढत असल्याची मान्यता आहे. या व्यतिरिक्त ‘एम्बर्ग्रिस’ हे ‘हब्बे निशात’ या औषधामध्येदेखील वापरले जाते. हे अनेक मान्यताप्राप्त वैद्यकीय औषध विक्री दुकाने आणि ‘ऑनलाईन’ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. ‘एम्बर्ग्रिस’ हे लैंगिक उत्तेजन वाढवतात, असा विश्वास आहे. परंतु, या विश्वासाला कोणतेही वैज्ञानिक किंवा ठोस पुरावे नाहीत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0