‘टोकियो ऑलिम्पिक’साठी भारतीय तिरंदाजी संघात निवड झालेल्या सातारकर प्रवीण जाधव याची संघर्षमयी कहाणी..
सध्या जगभरात ‘ऑलिम्पिक’चे वारे जोरदार वाहत आहेत. अशामध्ये अनेक खेळाडू हे या जागतिक स्पर्धेत आपल्या देशाचा झेंडा फडकावण्यासाठी कसून मेहनत घेत आहेत. कोणत्याही देशातील खेळाडूंसाठी ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा ही जणू क्रीडापंढरीच. तेव्हा, या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी म्हणून खेळाडू आपल्या जीवाचे रान करतात. अशामध्ये देशपातळीवरही या स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, म्हणून त्यांनाही सतत प्रोत्साहित केले जाते. अशा अनेक खेळाडूंची उदाहरणे आहेत, ज्यांनी शून्यातून वर येत या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. स्वतःच्या अडीअडचणींवर विजय मिळवत ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी हे खेळाडू सज्ज आहेत. असाच एक खेळाडू म्हणजे सातार्याचा प्रवीण जाधव. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्याचा उल्लेख करत, त्याने मिळवलेल्या या यशाचे कौतुक केले. तसेच मोलमजुरी करणार्या आई-वडिलांपोटी जन्मलेल्या या मुलाने स्वतःचे ध्येय गाठत ‘ऑलिम्पिक’चे पदक घरी घेऊन यावे, यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. जाणून घेऊया त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल...
प्रवीण जाधव याचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील सरडे या छोट्याशा गावात झाला. त्याचे आई-वडील हे मोलमजूर म्हणून गावात काम करत होते. एकवेळच्या जेवणाचाही त्यांना भ्रांत पडली होती. कधीकधी तर त्यांना उपाशी पोटी झोपावे लागे. त्यामुळे प्रवीणसमोर या परिस्थितीतून स्वत:ला तसेच कुटुंबीयांनाही सावरण्याचे खूप मोठे आव्हान होते. गावामध्येही सातवीपर्यंतच शिक्षणाची सोय होती. अशामध्ये शिक्षणाचाही मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. दरम्यान, लहानपणापासून त्याला क्रीडा प्रकारात रस होता. अशामध्ये शालेय वेळेत तो कबड्डी, खो-खोसारख्या खेळांमध्ये भाग घेत असे. खेळासाठी त्याची असलेली जिद्द पाहून त्याचे प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ हे प्रभावित झाले. त्यांनी त्याला कमी खर्चिक अशा धावण्याच्या खेळामध्ये भाग घेऊन दिला. मात्र, कुपोषित बालपणामुळे तो फारच कमकुवत होता. प्रवीणच्या मनात जिद्द असूनही त्याचे शरीर मात्र त्याला साथ देत नव्हते. त्याची शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती अवघड होती. व्यावसायिक ‘अॅथलेटिक्स’ प्रशिक्षण आणि सुधारित आहारासाठी त्याचे शिक्षक त्याला महाराष्ट्र सरकारच्या ‘क्रीडा प्रबोधिनी’ योजनेचा लाभ होतो का, यासाठी प्रयत्न करू लागले. परंतु, तिथेही अपयशच हाती आले. कारण, तिथे निवड होण्यासाठी त्याला महत्त्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे होते. मात्र, या विभागात तो बसत नव्हता. त्याच्या पौष्टिक आहाराची जबाबदारी ही विकास भुजबळ यांनी स्वीकारली. त्यांनी प्रवीणला अंडी आणि कोंबडीचा पौष्टिक खुराक देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे प्रवीणची तब्येतही सुधारली आणि जिल्हा पातळीवर चांगली कामगिरी करण्यास मदत झाली.
पुढे वयाच्या १२व्या वर्षी प्रवीणला अहमदनगरमधील प्रवरनगर येथे ‘क्रीडा प्रबोधिनी’त भरती होण्याची संधी मिळाली. येथे धावणे, लांब उडी मारणे, अशा छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत होता. एका वर्षाच्या सरावानंतर ठरावीक खेळामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मुलांचे वेगवेगळे गट पाडले गेले. यावेळी दहा मीटर अंतरावर असलेल्या एका रिंगमध्ये चेंडू फेकण्याचा खेळ घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रवीणने दहापैकी दहा चेंडू त्या रिंगमध्ये टाकले होते. त्यामुळे तिरंदाजीच्या गटात त्याची निवड झाली आणि इथूनच त्याचा आणि तिरंदाजीचा प्रवास सुरू झाला. ‘क्रीडा प्रबोधिनी’मधील त्याचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी त्याच्या शैलीचे बारकाईने निरीक्षण केले आणि “प्रवीणकडे तिरंदाजीसाठी लागणार्या सर्व क्षमता आहेत,” असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
तिरंदाजी खेळ हा आता फक्त त्याच्यासाठी छंद नव्हता, तर यामधून आपल्याला घरच्यांनादेखील हातभार लावता येईल, असे त्याला वाटत होते. परंतु, त्याच्यासमोरील आव्हाने अजून संपली नव्हती. इतर ‘अॅथलेट’च्या तुलनेत तो थोडाफार कमकुवत होता. त्यामुळे अकादमीमधून त्याला वगळण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा त्याचे प्राथमिकचे शिक्षक विकास भुजबळ हे धावून आले आणि सातार्यातील शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याशी संवाद साधून प्रवीणला मदत करण्याचा निर्णय घेतला. पुढे त्याने तिरंदाजी कौशल्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली आणि आपली वाटचाल सुरू ठेवली. १९व्या वर्षी त्याने ‘आशियाई चषक’मध्ये पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याला अडीच लाखांचे पारितोषिक मिळाले आणि त्याने स्वतःचे असे एक तिरंदाजीचे किट घेतले. पुढे भारतीय लष्करात ‘हवालदार’ म्हणून पद मिळवले. ‘ऑलिम्पिक’च्या पात्रतेसाठीही दीड वर्षे कठोर मेहनत घेतली. खडतर रस्ते पार करत, अडीअडचणी दूर करत त्याने ‘ऑलिम्पिक’चा रस्ता गाठला आहे. यासाठी त्याने पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये तिरंदाजीवर कसून मेहनत घेतली आहे. आता तो भारतासाठी सुवर्ण पदक आणतो का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशा या ध्येयवेड्या प्रवीणला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...