केनियाची मदत आणि मोदीद्वेष्ट्यांची पोटदुखी

26 Jun 2021 22:50:21


keniya_1  H x W


कोरोना विषाणू मानवनिर्मितच भाग 5  
 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतावर जेव्हा संकट ओढावले, त्यावेळेस अनेक देश पाठीशी उभे राहिले. केनिया हा त्यापैकीच एक... मात्र, या देशाने भारताला मदत केली म्हणून अनेकांनी केनियातील नागरिकांची खिल्ली उडवलीच; पण त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्याची संधी वामपंथ्यांनी सोडली नाही. कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय मदत मिळवणे सोडाच. मात्र, ज्यांनी मदत देऊ केली त्यातही खोडा घातला...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रकोप सुरू असताना भारताला मदत म्हणून केनियाने मुंबईत मदत पाठवली होती. तुलनेने हा देश खूपच गरीब म्हणून गणला जातो. इथल्या नागरिकांचे राहणीमान अद्याप पारंपरिकच म्हणावे लागेल. दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान आदी बाबींशी नागरिकांचा थेट संबंध होण्यास बराच अवकाश आहे. पण, या देशानेही कठीण काळात भारताची साथ सोडली नाही. विली बेट्स हे भारतातील केनियाचे हाय कमिशनर दिल्लीहून मुंबईत आले. त्यांनी १२ टन वस्तुरूपात मदत पाठवली. चहा, कॉफी आणि शेंगदाणे अशी १२ टनांची मदत घेऊन ते मुंबईत उतरले. ही मदत काहींना फारच तोकडी वाटली असेल किंवा ती प्रातिनिधिकच होती. कारण, भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत आहोत, हा संदेश या देशाने देण्याचा प्रयत्न केला.



कोरोनाकाळात अनेक देशांनी भारताला मदत केली. पाठिंबा दर्शविला. ‘ऑक्सिजन सिलिंडर्स’, ‘ऑक्सिमीटर’, ‘व्हेंटिलेटर्स’, लसी, ‘रेमडेसिवीर’ आदी ज्या-ज्या प्रकारे शक्य होईल, तशी मदत इतर देशांनी आपल्याला केली होती. भारताने पहिल्या लाटेच्या वेळी ज्या ९२ देशांची मदत केली होती, त्याचाच हा परतावा होता. केनियाच्या मदतीला कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीचा दाखला देत देशवासीयांनीही कौतुक केले. ‘सुदाम्याचे पोहे’ या गोष्टीत आपण पाहतो की, भगवान श्रीकृष्णाने त्यांचा मित्र सुदाम्याने दिलेले पोहे आनंदाने ग्रहण केले. या कथेने हिंदू धर्मीयांना एक बोध दिला. सार सांगितले. पण, केनियाच्या या मैत्रीची ज्यांना थट्टा करावीशी वाटली, त्यांनी स्वतःलाच उघडं पाडून घेतलं आहे.


केनियाची भौगोलिक, आर्थिक रचना तर आपण जाणतोच. मात्र, तिथल्या जनतेला भारताबद्दलचे वेगळे आकर्षण आहे. केनियात बरेचसे भारतातील गुजराती व्यापारी आपला उद्योग-व्यवसाय चालवतात. त्यामुळे तिथे राहणार्‍या भारतीयांना आपल्यापासून ते वेगळे मानत नाहीत. त्यामुळेच ही मदत त्यांनी आपल्याला पाठविली. त्याशिवाय केनिया हा पर्यटनाच्या आणि वन्यजीवांसाठीही ओळखला जाणारा देश. मसाईमारा हे या देशातील सर्वात आकर्षक ठिकाण मानले जाते. पर्यटकांची या भागात जास्त वर्दळ असते.


अमेरिकेवर ज्यावेळी ९/११चा दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा संपूर्ण जगावर भीतीचे सावट होते. मसाईमारा या भागातील नागरिकांना ही बातमी फार उशिरा समजली. अमेरिकेतील उंच मनोरे जेव्हा हल्ल्यात जमीनदोस्त झाले, अनेक जीव त्यात गेले, तेव्हा मसाईमारा टोळीतील नागरिकांनाही त्याबद्दल हळहळ व्यक्त केली होती. या मसाईंनी अमेरिकेला मदत करण्याचे ठरविले. हे लोक चालण्यासाठी फार प्रसिद्ध आहेत. अमेरिकेला मदत करण्यासाठी १४ गाई घेऊन ते तीन दिवस चालत चालत नैरोबीला आले होते. तिथे पोहोचल्यावर अमेरिकन राजदूताला त्यांनी सांगितले की, “तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि मदतीसाठी आम्ही गाई आणल्या आहेत.” हे ऐकून राजदूतांनाही अप्रूप वाटलं. इतकासा देश; पण तिथल्या नागरिकांच्या भावनांचा अमेरिकेने आदर केला.


हा काळ ओबामा सरकारच्याही पूर्वीचा आहे. ओबामांचे वडील हे केनियन होते. मात्र, जेव्हा ओबामा कुठेही अमेरिकेच्या राजकारणात चर्चेत नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे. गाई मदत म्हणून अमेरिकेने स्वीकारल्या. पण, त्या अमेरिकेत नेण्याचे आव्हान मोठे होते. त्यामुळे गाई विकून त्या पैशाने जी काही मदत मिळेल ती देशात एक स्मरणवस्तू उभारू, असा विचार राजदूत आणि अधिकार्‍यांनी केला. पण, ज्यावेळी अमेरिकेतील नागरिकांना ही बाब कळली तेव्हा गाई देशात आणण्यासाठी मोहीम सुरू झाली. जी काही कार्यवाही करावी लागेल ती केली आणि देशात मदत आणली. यासाठी अमेरिकेलाही थोडाफार खर्च आला. पण, त्या देशानं तो केला. केनियाच्या दातृत्वाची जाण अमेरिकेने ठेवली. त्यावेळेस केनियाची कुणी खिल्ली उडवली असती तर हा इतिहास घडलाच नसता.

 

Kenia _2  H x W 
 

केनियातील गाईंचा वंश मुळात महाराष्ट्रातील पंढरपूरचा आहे. कारण, तिथल्या गाई मुळात इथूनच तिथे नेऊन पुढे संकरित करण्यात आल्या. कारण, मुळात गाय हा तिथला मूळचा प्राणी नाही. तिथल्या गाईंची प्रजाती भारतातून तिथे नेण्यात आली. असे हे एक वेगळं नातं भारताचं केनियाशी आहे. केनिया तंत्रज्ञान, भाषा, अर्थ-उद्योगांत पुढारलेला नसेलही; पण या देशाची, देशबांधवांची माणुसकी मात्र जागी आहे. अशा देशातून आलेल्या मदतीचा आदर करायलाच हवा. त्यानुसार, केंद्र सरकारने हा आदर केला. भारताने त्यांचे परराष्ट्र संबंध राखलेच; परंतु आपल्या देशांतीलच काही वैचारिक दरिद्री आणि करंट्यांनी या मदतीची थट्टा केली. कारण, त्यांना भारतीय संस्कृती कळली नाही, माणुसकीही कळली नाही, त्यांना खिल्ली उडवण्याशिवाय दुसरा धंदाच उरलेला नाही, असे या प्रकारातून गेल्या काही काळात दिसून आले.


केनिया १९६१ मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी त्यांचे पहिले राष्ट्रपती जो मो केन्याटा पूर्वी क्रांतिकारी होते. त्यांच्या क्रांतिलढ्याच्या काळात भूमिगत होण्याची वेळ आली, तेव्हा ब्रिटनमधील भारताचे उच्चपदस्थ अधिकारी आप्पासाहेब पंतांकडे ते आश्रयासाठी जात. त्यानंतर जेव्हा केनिया स्वतंत्र झाला, तेव्हा केन्याटा यांनी पंतांना विचारले, “तुम्ही आमची फार मदत केली हे ऋण कसे फेडू?” त्यावेळी पंतांनी सांगितले, “आम्हाला काही नको, केवळ महाराष्ट्र मंडळासाठी आम्हाला केनियात एक छोटीशी जमीन द्या!” आज नैरोबीमध्ये ‘महाराष्ट्र मंडळा’ची स्वतःची वास्तू उभी आहे. व्यापारी सर्व गुजरातहून आलेले व्यापारी केनियामध्ये वसले. इतके केनियाशी भारताचे घट्ट संबंध आहेत. केनियात जेव्हा रेल्वेरुळ टाकण्यात आले, तेव्हा त्याकामी मजूरही भारतातूनच गेले होते. केनियातील प्रसिद्ध व्यापारी मनू चंदारीया भारतीय वंशाचेच आहेत.


केनियातील प्रतिव्यक्ती उत्पन्न, सकल उत्पन्न हे भारताच्या तुलनेत जास्तच आहे. प्रतिव्यक्ती उत्पन्न २,०४४ डॉलर्स इतके आहे. जगात १४४व्या अर्थव्यवस्थेच्या क्रमांकाचा हा देश भारतापेक्षा श्रीमंत ठरतो का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण, सकल उत्पन्न काढताना लोकसंख्या हा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यात भारताची लोकसंख्या ही १३० कोटी, तर केनियाची लोकसंख्या केवळ सहा कोटी इतकी आहे. त्यामुळे ही तफावत. भारताचा याच गणनेतील क्रमांक १४८ इतका आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला, तर भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा देश मानला जातो. दुर्दैवाने हा ‘नंबर गेम’ डाव्या विचारसरणीच्या लोकांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये चालवला आणि ते पुरेसे यशस्वीही ठरले.
 
 

Kenia _3  H x W 

 


आधी अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स आणि त्यानंतर भारत अशी ही क्रमवारी आहे. अमेरिकेसारख्या देशाच्या तुलनेत भारतातील खर्च हे कमी असतात. तशीच स्थिती भारत आणि केनियाच्या दृष्टीने विचार होतो तेव्हा असते. केनियाच्या तुलनेत भारतातील नागरिकांचे खर्च हे जास्त आहेत.

 

आकारमानाचा विचार केला तर केनिया हा पाच लाख ८० हजार चौरस फुट घनमीटर क्षेत्रफळ असणारा देश. लोकसंख्या अवघी सहा कोटींवर. उत्तर केनियात वाळवंट असल्याने त्या भागातील वस्तीही तुरळक. मात्र, वन्यजीवसृष्टीने बहरलेला हा देश. गरीब देश जरी असला तरीही नैतिकतेबद्दल, नीतीमूल्यांबद्दल आणि परंपराबद्दल केनियन फार ठाम असतात. ज्यावेळी केनियामध्ये हस्तिदंतांच्या व्यापारावर बंदी आणण्यात आली, तेव्हा हस्तिदंतांचा ढिगारा तिथे रचून जाळून टाकण्यात आला होता. जाळून नष्ट न करता जर हे हस्तिदंत बाजारात विकले असते, तर पुन्हा चोरट्यांनी हत्तींची शिकार करून हा काळा बाजार सुरूच ठेवला असता. पण, केनियाने जगासमोर या घटनेतून एक उदाहरण समोर ठेवले. त्यानंतर या देशातील हत्तींच्या शिकारीवर आळा बसला.



Kenia _4  H x W


तसेच केनियात फुलांची शेतीही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. गुलाबांच्या सर्व प्रकारच्या फुलांची शेती करून युरोपात निर्यात केली जाते. अर्थव्यवस्थेला चालना देणारा केनियाचा हा एक मोठा व्यवसाय आहे. त्यानंतर पर्यटन, चहा-कॉफी आदी निर्यात हे या देशातील इतर प्रमुख व्यवसाय आहेत. अशा या मित्रराष्ट्राने संकटकाळात केलेल्या मदतीचे आभार...


 
- चंद्रशेखर नेने
(शब्दांकन : तेजस परब)





Powered By Sangraha 9.0