पर्दे में रहने दो!

23 Jun 2021 21:04:59

imran khan 1_1  
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. जीभ घसरण्याचा प्रकार नव्हे, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या देशातील पुरुषांची मानसिकता कशी आहे, याचे उत्तम उदाहरणच एका मुलाखतीत देऊ केले. इमरान खान म्हणतात, “बलात्कार झाला तर त्या महिलेची चूक; कारण तिने कपडेच तसे घातले होते,” असे म्हणत, “पीडिताच या सगळ्याला जबाबदार आहे,” असेही ते म्हणाले. पाकिस्तानातील सर्वच जण त्यांच्यासारखा विचार करतात का, असाही प्रश्न पडतो. म्हणजे लैंगिक शोषणाला गुन्हेगार जबाबदार नाहीच, असे इमरान खान यांना या विधानातून सूचवायचे होते का?

“बलात्कार, स्त्री अत्याचाराला केवळ तोकडे कपडे घालणार्‍या महिलाच जबाबदार आहेत,” असेही इमरान म्हणाले. ‘कपड्यांपेक्षा बुरख्यात राहायला शिका,’ असा सल्लाच त्यांनी दिला. “महिलांचे तोकडे कपडे हेच अशा होणार्‍या अत्याचारासाठी जबाबदार आहेत,” असे इमरान म्हणाले. पाश्चिमात्य देशांची संस्कृती स्वीकारत असताना पाकिस्तानातील इस्लामींनी या गोष्टींपासून दूर राहावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.



‘एचबीओ एक्सिओस’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इमरान यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. काय तर म्हणे, “जर कुठल्याही महिलेने कमी कपडे घातले असतील, तर त्याचा परिणाम पुरुषांवर होईल.पुरुष कुठलेही रोबॉर्ट नाहीत. ही बाब ‘कॉमनसेन्स’ आहे.” याचबाबतीत इमरान यांना त्यांच्याच एका वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्ही बलात्कार पीडितेलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याबद्दल तुमचं मत काय?” यावर, “मी, कुठलेच वक्तव्य केले नाही,” असे म्हणून त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. बुरख्याची व्यवस्था पुरुष जातीला संयमी बनवण्यासाठी आखून देण्यात आली आहे.



पत्रकाराने इमरान खान यांना त्यांच्याच जीवनशैलीबद्दल बोलून दाखवले. इमरान यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार असतानाच्या त्यांच्या जीवनशैलीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा वक्तव्यावरून घुमजाव केला. “मी, जे काही बोलतोय ते माझ्याबद्दल नव्हे, तर माझ्या देशावासीयांच्या जीवनशैलीबद्दल बोलतोय,” असेही ते म्हणाले. म्हणजे, समाजाने बुरख्यात राहावे, तिथल्या महिलांनी सर्व नियम पाळावेत. मी मात्र, जेव्हा मौजमजा करणार तेव्हा माझ्यासोबत असलेल्या महिलांसाठी हे नियम लागू नाहीत, असेच कदाचित म्हणणे त्यांचे असावे.बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल कठोर कायदा, शिक्षा याबद्दल एक शब्दही पाक पंतप्रधान काढत नाहीत, त्यांना सर्वच दोष हा महिलांनी परिधान केलेल्या तोकड्या कपड्यांचाच वाटतो. काय तर म्हणे, “महिलांचे तोकडे कपडे पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात आणि त्याचमुळे गुन्हे घडतात.” ही त्यांची मानसिकता आणि उपाययोजना असेल, तर म्हणावे तरी काय?



इमरान म्हणतात की, “पाकिस्तानात ‘डिस्को’ नाहीत किंवा ‘नाईट क्लब’ नाहीत. आमचा समाज वेगळा आहे. आमची ‘सोसायटी’ पूर्णपणे वेगळीच आहे. आमची जगण्याची पद्धतच निराळी आहे. अशा देशात तुम्ही तोकडे कपडे घालणार, तर त्याचे परिणाम वाईटच होतील ना!” असा तर्क त्यांनी लावला.



इमरान खान यांच्या मते, भारत आणि युरोप या देशांमुळे त्यांच्या देशात अश्लीलता पसरली म्हणे. कारण, पाकिस्तानातील महिला भारतातील संस्कृतीकडून प्रेरणा घेऊन स्वतःचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. युरोपातील पाश्चिमात्य संस्कृतीचे आकलन पाकिस्तानातील महिलांनी करायला नको, अशा मताचे ते आहेत. महिलांनी कायम बुरख्यात राहावे, यावरच इमरान ठाम आहेत. बुरखा संस्कृतीला प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे महिला कुणाच्या नजरेतच येणार नाहीत. महिला नजरेत आली नाही म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होणारच नाहीत, असली दरिद्री शक्कल त्यांच्या पंतप्रधानांनी लावली आहे.



पाकिस्तानातील बलात्काराच्या आकडेवारीवर लक्ष दिले असता सरासरी ११ घटनांची नोंद केली जाते. यात तक्रार न करणार्‍या पुढे न येणार्‍यांची गणनाच नाही. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील आकडेवारी गंभीर आहे. २२ हजार बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात केवळ ७७ आरोपींना शिक्षा झाली आहे. म्हणजे शिक्षेचे प्रमाण केवळ ०.३ टक्के इतके आहे. ज्या देशाचा पंतप्रधान बलात्कार पीडितेला तिच्या कपड्यांमुळेच दोषी मानणार असेल तर त्या देशाचे भविष्य काय असेल, हे वेगळे सांगायला नको.



Powered By Sangraha 9.0