भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची,निविदा प्रक्रिया सुरू करावी - खासदार कपिल पाटील

22 Jun 2021 16:58:54

kapil patil_1  

खासदार कपिल पाटील यांची मागणी, ६० गावांसाठी रिंगरोडचा आग्रह

भिवंडी : बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.



खासदार कपिल पाटील यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची काल भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्यापि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.



कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्यापी काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली.एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.



Powered By Sangraha 9.0