'घोस्ट नेट' उठल्या सागरी कासवांच्या जीवावर; जुहूमधून तीन कासवांचा बचाव
21 Jun 2021 19:01:37
मुंबई - जुहू किनाऱ्यावर सोमवारी सकाळी 'घोस्ट नेट'मध्ये अडकून वाहून आलेल्या समुद्री कासवांना वाचवण्यात आले आहे. या कासवांवर प्राथमिक उपचार करुन त्यांनी 'कांदळवन कक्षा'च्या ऐरोलीतील 'सागरी कासव उपचार केंद्रा'मध्ये हलवण्यात आले आहे. यामाध्यमातून समुद्रात तरंगणारे 'घोस्ट नेट' हे समुद्री जीवांच्या मुळावर उठल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
बऱ्याचदा समुद्रामध्ये मच्छीमारांनी मासेमारीकरिता लावलेली जाळी ही लाटांच्या प्रवाहामुळे समुद्रात वाहून जातात. तसेच किंवा मच्छीमारांकडून समुद्रामध्ये टाकली जातात. अशा जाळ्यांचे तुकडे हे समुद्रातील अंतर्गत प्रवाहामुळे भरकटतात. या जाळ्यांना 'घोस्ट नेट' म्हटले जाते. अशी भरकटणारी घोस्ट नेट सागरी जीवांच्या मुळाशी उठतात. डाॅल्फिन, पाॅरपाईज, व्हेल असे सागरी सस्तन प्राणी किंवा समुद्री कासवे या जाळ्यात अडकतात आणि त्यामुळे त्यांचा जीव जातो. पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्रामुळे अशा 'घोस्ट नेट'मध्ये अडकलेले सागरी जीव जाळ्यासह किनाऱ्यावर वाहून येतात. यामध्ये सागरी कासवांची संख्या अधिक असते. अशाच अवस्थेत वाहून आलेली तीन कासवे सोमवारी सकाळी जूहू किनाऱ्यावर आढळून आली.
जूहू किनाऱ्यावरील उद्यानातील माळी संजय सिंह यांना जाळ्यात अडकलेली तीन कासवे किनाऱ्यावर वाहून आलेली दिसली. त्यांनी लागलीच जाळे कापून या कासवांची सुटका केली आणि त्यांनी जूहू किनाऱ्यावरील पोलीस स्थानकात आणले. पोलिसांनी राॅ या प्राणी बचाव संघटनेचे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांना यासंदर्भात माहिती दिली. शर्मा यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. या कासवांना ताब्यात घेऊन त्यांची डाॅ. रिना देव यांच्याकडे प्राथमिक तपासणी करुन ऐरोलीतील समुद्री कासव उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे.
यामधील दोन कासवे ही आॅलिव्ह रिडले प्रजातीची असून एक कासव हाॅक्सबील प्रजातीचे असल्याची माहिती 'कांदळवन प्रतिष्ठान'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. यामधील एका आॅलिव्ह रिडले कासवाच्या जखमा निसर्गत: भरल्या गेल्या असून इतर दोन कासवांच्या जखमा गंभीर आहेत. त्यांच्या पुढील परांना जाळी अडकल्यामुळे त्याठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून ते पर कापावेच लागणार असल्याचे कर्वे यांनी सांगितले. घोस्ट नेट ही गंभीर समस्या असून मच्छीमारांनी अशा प्रकारे समुद्रात जाळ्या न टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच अशा तंरगणाऱ्या जाळ्या आढळल्यास मच्छीमारांनी त्या समुद्राबाहेर काढण्याची विनंती कर्वे यांनी केली आहे.