पवार-प्रशांत स्ट्रॅटेजी

18 Jun 2021 20:01:47

Sharad Pawar_1  
 
 
 
हिंदू या भावनेतून मतदान करायचे आहे, ही जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती जातीपातीचा विचार करीत नाही. मुस्लीम समुदायातील एका छोट्या वर्गात मुसलमान होण्यापूर्वी आपण कोण होतो, या अस्मितेचा शोध चालू आहे. ही हिंदू भावना कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होणारी नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वव्यापी कामाचा प्रभाव प्रशांत किशोर रोखू शकत नाहीत आणि शरदराव पवारांच्या शक्तीबाहेरील ती गोष्ट आहे.
 
 
 
प्रशांत किशोर हे कुणी राजनेता नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाचे ते नेते नाहीत. राजनेता होण्यासाठी मोठी लोकप्रियता मिळवावी लागते, तसे ते लोकप्रिय आहेत असेही नाही. परंतु, भारतीय राजकारणातील त्यांचे महत्त्व फारच मोठे झालेले आहे. कोणत्याही पक्षाचे निवडणूक विशेषज्ज्ञ समजले जातात. निवडणुका कशा जिंकायच्या, याची ते आखणी करतात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता दीदीने त्यांना त्यांची निवडणूक व्यूहरचना ठरविण्याचे काम दिले. राजनेता नसताना आणि लोकप्रिय नसतानादेखील राजकारणात एवढे महत्त्वाचे स्थान त्यांना कशामुळे मिळाले?
 
 
प्रशांत किशोर यांना जे काम दिले, ते त्यांनी केले. डिसेंबरमध्येच त्यांनी भाकित केले की, भारतीय जनता पक्षाला दोन आकडी जागा मिळविणे कठीण जाईल आणि तसेच झाले. निवडणूक जिंकण्याची त्यांनी जी व्यूहरचना ममता दीदींना आखून दिली, ती यशस्वी झाली. त्यामुळे निवडणूक जिंकवून देणारा विशेषज्ज्ञ अशी त्यांची कीर्ती झाली. एकदा यश चिकटले की, त्या क्षेत्रातील लोक यश मिळवून देणार्‍याच्या मागे लागतात, ही जगरीत आहे. त्याप्रमाणे शरदराव पवार यांनी प्रशांत किशोर यांना शुक्रवार, ११ जून, २०२१ रोजी सिल्व्हर ओकमध्ये जेवायला बोलाविले. तीन तास त्यांची चर्चा झाली. २०२४च्या निवडणुका लढविण्यासाठी काय केले पाहिजे, हा विषय चर्चेत होता, हे एखादे शेंबडे पोरदेखील सांगेल.
 
 
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी तसे काही म्हटले नाही. राष्ट्रवादी काँगे्रसने खुलासा केला की, ही भेट खासगी होती आणि राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांच्याकडे निवडणुकीचे व्यूहरचना ठरविण्याचे काम दिलेले नाही. प्रशांत किशोर यांनीदेखील म्हटले की, खासगी भोजनाची ही भेट होती. शरदराव पवार राजकारणी आहेत आणि प्रशांत किशोर हे राजकारणाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. जो पैसा देईल त्याची सेवा करायची, हे त्यांचे काम आहे. व्यावसायिक माणूस आपल्या व्यवसायाची गुपिते फोडत नाही. म्हणून ते म्हणाले, “मी, जेवायला गेलो होतो” आणि शरद पवार राजकारणी असल्यामुळे म्हणणार की, “मी, प्रशांत किशोर यांना जेवण घातले.” आता हे जेवण पचवून प्रशांत किशोर अपत्याला जन्म घालतात की, आपत्ती जन्माला घालतात हे कळेल.
 
 
पुढील लोकसभा निवडणूक २०२४ला आहे. मोदी निवडून यावेत, तेच पंतप्रधान राहावेत, त्यांनीच देशाचे नेतृत्व करावे, असे भाजप सोडून अन्य कुठलाही राजकीय पक्ष म्हणू शकत नाही. भाजप सोडून सर्व राजकीय पक्ष हेच म्हणणार की, २०२४च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि मोदी पंतप्रधान होता कामा नयेत, असे सर्व राजकीय पक्षांना वाटणे, यात काहीही चूक नाही आणि हीच लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सत्तेची मक्तेदारी एकाच पक्षाकडे किंवा एकाच राजनेत्याकडे दीर्घकाळ राहणे, अपेक्षित नसते. रशियामध्ये लोकशाहीचा तमाशा केला जातो आणि एकच व्यक्ती मरेपर्यंत सत्तेवर बसविली जाते. लोकशाहीत असे चालत नाही.
 
 
अमेरिकेत कुठलाही राजनेता फक्त दोनदा म्हणजे आठ वर्षे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. तिसर्‍यांदा त्याला निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही. विन्स्टन चर्चिल यांनी दुसरे महायुद्ध ब्रिटनला जिंकून दिले. महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या निवडणुकीत चर्चिलच्या पक्षाचा पराभव झाला. ज्या देशामध्ये लोकशाहीची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत, त्या देशाची ही उदाहरणे आहेत.
भारताचे तसे नाही. भारतात नेहरू-गांधी घराण्याची सत्ता राहिली. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी या घराणेशाहीला हादरे दिलेले आहेत. त्यांनी आपल्या देशाला घराणेशाहीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे २०२४च्या निवडणुकीत आपल्या देशातील अनेक राजनेत्यांना ‘मीदेखील पंतप्रधान होऊ शकतो’ अशी स्वप्ने पडू लागली आहेत. ममता बॅनर्जी त्यातील एक आहेत. शरदराव पवार त्यातील एक आहेत. मायावती, अखिलेश यादव हेही त्यातीलच आहेत. दक्षिणेतील अनेक राजनेत्यांनाही असे वाटू शकते. म्हणून सर्वांना असे वाटते की, मोदींचा पक्ष सत्तेवर येऊ नये.
 
 
या सर्वांना सल्ला देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रशांत किशोर आहेत. त्यांच्यासारखा व्यावसायिक विशेषज्ज्ञ लोकसभेच्या सर्व जागांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करतो. एकूण मतदार किती आहेत आणि त्या मतांची विभागणी वेगवेगळ्या पक्षात कशी होती, हा अभ्यासाचा विषय आहे. दुसरा विषय मतदारसंघात वेगवेगळ्या जातींचे किती मतदार आहेत, उदा. - दलित, ओबीसी, ब्राह्मण, ठाकूर, जाट, रजपूत, आणि ते कोणाला मतदान करतात. मुसलमानांची मतदार संख्या किती आहे आणि ते मतदान कसे करतात. ख्रिश्चन मतदार किती आहेत, त्यांचे मतदान कसे होते. महिलावर्ग मतदान कसे करतो. असे सर्व विषय अभ्यासाचे असतात. या अभ्यासातून काही आकडेवारी समोर येते आणि त्यावरून ठोकताळे बांधता येतात.
 
 
व्यूहरचनेचा पुढचा भाग येतो की, जी मते विभागली जातात ती एकत्र कशी करता येतील. त्यासाठी छोटे-छोटे राजकीय पक्ष एकत्र कसे आणता येतील. त्या प्रत्येकाची खरेदी किंमत काय आहे. धार्मिक अल्पसंख्याकांचे खरेदी मूल्य काय आहे, हे निश्चित करावे लागते. अशा अनेक गोष्टींवरून कागदावरचा का होईना जिंकून देण्याचा फॉर्म्युला तयार करावा लागतो. मी या विषयातील काही तज्ज्ञ नाही. तज्ज्ञ प्रशांत किशोर आहेत. असा सर्व अभ्यास करण्यासाठी मनुष्यबळ लागते. विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी लागतात आणि हे सर्व काम अतिखर्चिक आहे. म्हणून प्रशांत किशोर यांचे कॉन्ट्रॅक्ट काही कोटींचे असू शकते.
 
 
अशा तर्‍हेचा अभ्यास करून कागदावरची रचना निर्माण करता येऊ शकते. परंतु, ती व्यवहारात यशस्वीच होईल आणि संपूर्ण देशाचा पश्चिम बंगाल होईल हे कुणीही सांगू शकत नाही. रशियावर स्वारी करण्यापूर्वी (इ. स. १८१२) नेपोलियन याने रशियाचा सखोल अभ्यास केला. पॅरिस ते मॉस्को या मार्गाचे नकाशे तयार केले. रशियन हिवाळा कधी सुरू होईल याचा मागील दहा वर्षांचा अभ्यास करून एक तारीख निश्चित केली आणि तोपर्यंत मोहीम संपविण्याची योजना तयार केली.
 
 
नेपोलियनची रशियावर स्वारी झाली. त्याच्या काटेकोर योजनेप्रमाणे त्याला यश मिळायला पाहिजे होते. सहा लाख सैन्य त्याच्याबरोबर होते. त्यातील ६०० सैन्यदेखील जीवंत परत आले नाही. रशियन हिवाळा १५ दिवस आधीच सुरू झाला. उणे 40 तापमानात अर्धे अधिक सैन्य गारठूनच मेले. प्रशांत किशोर यांचा नेपोलियन होऊ नये, अशा आपल्याला सदिच्छा द्यायला काही हरकत नाही.
 
 
आकडेशास्त्राच्या आधारे केलेल्या कागदावरील योजना आणि प्रत्यक्षात दिसणारे परिणाम नेहमीच सारखे राहत नाहीत. याचे कारण असे की, आकडे निर्जीव असतात आणि वास्तवातील जीवन सजीव असते. एक लाख अमुक अमुक जातीचे मतदार आहेत, हा निर्जीव आकडा झाला. एक लाख सजीव माणसे आहेत, हा सजीव आकडा झाला. सजीव माणसाला दोन गोष्टी प्राप्त झालेल्या असतात. १. विचारशक्ती आणि २. भावनाशक्ती. तुम्ही बाकी काहीही करू शकता. परंतु, सजीव माणसाची विचारशक्ती आणि भावनाशक्ती कुठल्याही पैशाने, आमिषाने, प्रलोभनाने, धमक्यांनी, खरेदी करता येत नाही. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर डोंगर-दर्‍यात राहणार्‍या महिलेपासून ते मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर राहणार्‍या महिलेपर्यंत एकच विषय गेला, इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांना मत द्यायचे आहे. तेव्हा प्रशांत किशोर नव्हते आणि समजा असते आणि त्यांनी काँगे्रसविरुद्ध व्यूहरचना आखून दिली असती तर ती मातीत मिसळली गेली असती. म्हणून प्रशांत किशोर आणि शरदराव पवार यांना एकत्र बसवून मोदींच्या विरोधातील व्यूहरचना करू द्यावी. प्रशांत किशोर यांचा तो व्यवसाय आहे, त्याबद्दल त्यांना चार पैसे मिळतील, त्याविषयी आपल्याला दुःखी करण्याचे कारण नाही आणि शरद पवार यांच्याकडे पैसा आहे, त्यांना त्याची गुंतवणूक करायची आहे, याचेही दुःख करण्याचे कारण नाही.
 
 
लोकसभेच्या पुढील निवडणुकीला अजून तीन वर्षांहून अधिक काळ आहे. या तीन वर्षांत काय घडेल, देशाचे राजकीय चित्र कसे असेल, कोरोना संकटाचे परिणाम काय काय दिसायला लागतील, आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय असेल, चीन-भारत मर्यादित युद्ध होईल का, पाकिस्तानचे अस्तित्त्व टिकेल का, युरोपियन युनियन कायम राहील का, एक ना अनेक शतप्रश्न आहेत. त्याची उत्तरं कुणी निश्चितपणे देऊ शकत नाहीत. या सर्व प्रश्नांचे परिणाम देशाच्या राजकीय वातावरणावर होत जाणार आणि ते संख्याशास्त्रात येणार नाहीत. जातीय समीकरणात ते येणार नाहीत आणि सांप्रदायिक समीकरणातही येणार नाहीत.
 
 
देशातील हिंदू समाजाची स्थिती पाहता तो आता राजकीयदृष्ट्या जागरूक होत चाललेला आहे, प्रभावी होत चाललेला आहे आणि आग्रही होत चाललेला आहे. हिंदू या भावनेतून मतदान करायचे आहे, ही जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती जातीपातीचा विचार करीत नाही. मुस्लीम समुदायातील एका छोट्या वर्गात मुसलमान होण्यापूर्वी आपण कोण होतो, या अस्मितेचा शोध चालू आहे. ही हिंदू भावना कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होणारी नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वव्यापी कामाचा प्रभाव प्रशांत किशोर रोखू शकत नाहीत आणि शरदराव पवारांच्या शक्तीबाहेरील ती गोष्ट आहे आणि सर्वात शेवटी व्यक्तीचे भवितव्य आणि देशाचे भवितव्य घडविण्यात नियती नावाचा पाचवा घटक असतो, असे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतच सांगितले आहे.(दैवं चैवात्र पत्र्चमम्) त्या नियतीच्या मनात काय आहे, हे ईश्वर सोडून कुणाला माहीत नाही आणि गेल्या काही वर्षांचे संकेत पाहिले तर भारताचे पुनरुत्थान हिंदुस्थान म्हणून व्हायला पाहिजे आणि तो आपल्या प्राचीन वैभवाने विश्वगुरुपदावर गेला पाहिजे. या दिशेनेच आपली वाटचाल चालू आहे, असे म्हणावे लागेल. पवार आणि प्रशांत ही वाटचाल पुढे नेणार की, त्याला खोडा घालणार की, ती थांबविणार! याचे उत्तर २०२४ला मिळेल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0