मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण किनारपट्टीवरुन यंदा समुद्री कासवांची २३ हजार ७०६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. २०२०-२१ सालच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची ४७५ घरटी आढळली आहेत. पिल्लांची आणि घरट्यांची ही संख्या २०१९-२० सालच्या हंगामापेक्षा दुप्पट आहे. तसेच पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ५७ टक्के आहे, जो गेल्यावर्षी केवळ ३५ टक्के होता.
गेल्या दोन दशकापासून कोकणातील काही किनाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने समुद्री कासवांची संवर्धन मोहिम राबविली जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १३ किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदा (२०२०-२१) या हंगामात कोकण किनारपट्टीवर कासवांची ४७५ घरटी आढळली. गेल्यावर्षी ही संख्या २२८ होती. म्हणजेच यंदा दुपटीने घरटे आढळली. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ किनार्यावर कासवाची २९ घरटी आढळली. रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, तवसाळ, गावखडी, माडबन, वडाव्येत्ये या किनार्यांवर एकूण २८२ घरटी संवर्धित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गमध्ये ही संख्या १६४ आहे.
पिल्लांचा जन्म दर
या ४७५ घरट्यामध्ये एकूण ५०,७९९ अंडी सापडली आणि त्यामधूून २३ हजार ७०६ पिल्ल जन्मास आल्याची माहिती 'कांदळवन प्रतिष्ठान'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. यंदा पिल्लांचा जन्म दर हा ५७ टक्के असून गेल्यावर्षीच्या तुलनेत तो अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रायगड जिल्ह्यात घरटी आणि अंडी कमी प्रमाणात सापडली असली तरी, त्याठिकाणी पिल्लांचा जन्म दर हा दोन्ही जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे. रायगडमध्ये सापडलेल्या ३ हजार २११ अंड्यांमधून २ हजार १३७ पिल्ले जन्मास आल्याने जिल्ह्यातील पिल्लांच्या जन्माचा दर हा ६६.६ टक्के आहे, जो रत्नागिरीमध्ये ४२.१५ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ५०.९ टक्के आहे. किनारपट्टीवर कासव संवर्धन करण्यासाठी वन विभागाकडून कासव मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासव मित्रांकडून कासवांची अंडी शोधणे, त्यांचा सांभाळ करणे, घरट्यामधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याची जबाबदारी असते.
तौत्के चक्रीवादळामुळे संवर्धित केलेली काही घरटी नष्ट झाल्यामुळे पिल्लांच्याही संख्येत काही प्रमाणत घट झाली. अशा परिस्थितीतही २०१९-२० सालच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये कोकण किनारपट्टीवरुन दुपटीने कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. तसेच कासव संवर्धनाचे काम करणाऱ्या कासवमित्रांना कांदळवन प्रतिष्ठानकडून मानधन देण्यात आले आहे. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष