CBSE १२ वीची परिक्षा रद्द; मोदींच्या बैठकीत निर्णय

01 Jun 2021 20:06:25

modi_1  H x W:


विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेसोबत तडजोड नाही – पंतप्रधान
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशातील करोना संसर्गाची स्थिती ध्यानात घेऊन सीबीएसईची १२ वीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
बैठकीमध्ये करोना संसर्गाची सध्याची स्थिती आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्राप्त अभिप्रायांचा सविस्तर आढावा घेण्यात आली. परिस्थिती पाहता यंदाच्या वर्षी १२ वीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईतर्फे १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निकाल विशिष्ट निकष पद्धतीने लावला जाणार आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
 
 
देशभरातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याविषयी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, सध्याच्या स्थितीमुळे देशभरातील पालक आणि विद्यार्थी अतिशय चिंतेत होते. सध्याच्या काळात आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे, त्यामुळे देशातील तरुणाईचे आरोग्य परिक्षेसाठी धोक्यात टाकण्याचे कारण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यापक हित ध्यानात घेऊन परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
 
 
देशातील करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता सीबीएसई बोर्डाची १२ वीची परिक्षा होणार की नाही, याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी करोना संसर्गाची स्थिती पाहता परिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीस संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, पेट्रोलियम मंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्यासह पंतप्रधानांचे मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव, शालेय व उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांसह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0