‘केककन्या’ स्मिता पुरळकर

07 May 2021 00:19:41

smita parulkar_1 &nb
 
केक बनवण्याची कला ती शिकली. त्याचं शास्त्र तिने विकसित केलं आणि तयार झाला ‘स्मायरा केक’ हा केकचा ब्रॅण्ड. ही स्मिता म्हणजे ‘स्मायरा केक’ची मालक स्मिता पुरळकर.
 
 
वाढदिवस असो वा एखादी गोष्ट साजरी करणं, या सगळ्या समारंभात आवर्जून एक गोष्ट दिसते ती म्हणजे केक. खरंतर पाश्चात्य देशातून आलेल्या केकने वाढदिवस साजरा करण्याच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात कधी स्थान मिळवले कळलेच नाही. गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात केक तयार करण्याची जणू लाटच आली होती. मात्र, केक बनवणं ही एक कला आहे, शास्त्र आहे. स्मिता ‘कॉर्पोरेट ऑफिस’मध्ये नोकरीला असताना, ऑफिसमधल्या सहकार्‍यांचा वाढदिवस साजरा करण्याची जबाबदारी तिची असायची. यातून केकची ‘ऑर्डर’ तिच द्यायची. पण, तिलासुद्धा ठाऊक नव्हतं की, एक दिवस ती अशा केक तयार करणार्‍या कंपनीची खुद्द मालक असेल. केक बनवण्याची कला ती शिकली. त्याचं शास्त्र तिने विकसित केलं आणि तयार झाला ‘स्मायरा केक’ हा केकचा ब्रॅण्ड. ही स्मिता म्हणजे ‘स्मायरा केक’ची मालक स्मिता पुरळकर.
 
 
स्मिता जितक्या सहज केक बनवते, तितका सहज तिचा हा प्रवास निश्चितच नव्हता. पश्चिम उपनगरातला विभाग म्हणजे जोगेश्वरी. लोकसंख्येची घनता जास्त, मराठी मध्यमवर्गीय वस्ती आणि येथील झोपडपट्ट्यांमध्ये मुस्लीम व उत्तर भारतीयांचे वास्तव्य. एकेकाळी मुंबईतले सर्वाधिक तबेले याच परिसरात होते. याच जोगेश्वरीत सुभाष पुरळकर, पत्नी सुचित्रा आणि तीन अपत्यांसह राहत होते. ‘टिपिकल’ कोकणी चाकरमानी असं कुटुंब होतं. सुभाष पुरळकर एका औषधी कंपनीत कामाला होते, तर सुचित्रा गृहिणीच्या भूमिकेत मुलांचा सांभाळ करत होत्या. त्यांची मोठी कन्या म्हणजे स्मिता. लहानपणापासूनच हुशार, कोणत्याही कामात तरबेज. तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण जोगेश्वरीच्याच अरविंद गंडभीर हायस्कूलमध्ये झालं.
 
 
१९९३ साली मुंबईमध्ये जातीय दंगल उसळली. जोगेश्वरीची राधाबाई चाळ जाळण्यात आली आणि दंगलीचा आगडोंब पूर्ण मुंबईत उसळला. संपूर्ण मुंबईत लष्कराला तैनात केले गेले. जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या मैदानावर लष्करी छावणी उभी राहिली होती. कित्येक दिवस संपूर्ण मुंबई दंगलीने धुमसत होती. ही दंगल शांत होताच स्मिताच्या मामाने सुभाष पुरळकरांना जोगेश्वरी सोडण्याचा आग्रह केला. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत पुरळकर कुटुंब दहिसरला स्थलांतरित झाले. स्मिताने तोलानी महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली. याच काळात सुभाषरावांची नोकरी गेली. हा पुरळकर कुटुंबीयांवर खूप मोठा आघात होता. कुटुंबामध्ये कमावणारे असे ते एकमेव होते. भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या असणार्‍या स्मिताने आता मुलाची जबाबदारी पार पाडायचे ठरवले.
 
 
घरात पैसे येणे गरजेचे होते. शाळेत स्वल्पविराम शिकलेल्या स्मिताला महाविद्यालयीन शिक्षणाला स्वल्पविराम द्यावा लागला. तिने एका संस्थेतून ‘फॅशन डिझायनिंग’चा एका वर्षाचा अभ्यासक्रम पण पूर्ण केला. मात्र, हे ‘ग्लॅमर’ जग आपल्याला झेपणार नाही या विचाराने तिने त्याकडे पाठ फिरवली. यादरम्यान तिने अनेक छोटे-छोटे व्यवसाय केले. ‘इमिटेशन ज्वेलरी’ विकली. कपडे विकले, हापूस आंबेदेखील विकले. सुभाषराव स्मिताला यासाठी मदत करत. त्याचवेळी तिने रुपारेल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. एका कंपनीत अर्धवेळ नोकरी आणि सोबत शिक्षण असं ती करत राहिली. तीन वर्षे अशीच गेली. तिने बी. ए. पूर्ण केले. पुढे आरोग्य क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान संस्थेत तिला ‘सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट’ म्हणून नोकरी मिळाली. याचदरम्यान तिचं लग्न झालं. दहिसरवरून ती वाशीला गेली. नोकरीसाठी वाशी ते ठाणे असा प्रवास सुरु झाला.
 
 
या ‘कॉर्पोरेट’ नोकरीने स्मिताला खूप काही शिकवले. ‘कॉर्पोरेट लाईफस्टाईल’ ती शिकली. तिचा जगण्याचा दृष्टिकोनच पूर्णत: बदलून गेला. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलगी आता ‘कॉर्पोरेट लूक’ मध्ये वावरू लागली. मात्र, वैयक्तिक कारणास्तव स्मिताला नोकरी सोडावी लागली. याच कालावधीत तिच्या आईला ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. तिची शुश्रूषा करणं क्रमप्राप्त होतं. कालांतराने आईचं निधन झालं. स्मिताने पुन्हा कंपनीमध्ये नव्याने रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली. स्मिता कष्टाळू तर होतीच, पण कामामध्ये ती ‘वाघीण’ होती. काम करण्यात ती निष्णात होती. कंपनीने तिला रुजू करुन घेतले. नियतीने पुन्हा एकदा फासे टाकले. कंपनीमध्ये आलेल्या नव्या व्यवस्थापन मंडळाने जुन्या कर्मचार्‍यांमध्ये कपात करण्याचं ठरवलं. त्यामध्ये स्मिताचा क्रमांकदेखील होता. स्मिताची पुन्हा नोकरी गेली.
 
 
स्मिता या कंपनीत काम करत असताना तिच्यावर एक जबाबदारी होती, कार्यालयातील सहकार्‍यांचे वाढदिवस साजरा करण्याची. याकरिता ती एका कंपनीला केकची ‘ऑर्डर’ द्यायची. नोकरी गेल्यानंतर या केक कंपनीसोबत तिने संपर्क साधला, पण नोकरी मागण्यासाठी नव्हे तर व्यवसाय करण्यासाठी. त्या कंपनीच्या मालकाने स्मिताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. किमान वर्षभर स्मिताने या केक कंपनीच्या ‘आऊटलेट’मध्ये जाऊन केक तयार करण्याचे तंत्र शिकून घेतलं. जमवलेले पैसे भांडवल म्हणून तिने गुंतवले. दहिसरमध्ये तिचे ‘केक शॉप’ सुरू झाले. याच दरम्यान तिचा वर्गमित्र महादेव ठाकूर स्मिताला भेटला. स्मिताला व्यवसायात वृद्धी करता यावी, यासाठी तिने ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’मध्ये यावे, असे ठाकुरांनी सुचविले. स्मिता या महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या संस्थेत सामील झाली. त्यांच्या बैठकांना उपस्थित राहू लागली. ग्राहक मिळवायचे कसे, मार्केटिंग कसे करायचे, याचे धडे तिला या संस्थेत मिळाले. संस्थेच्या माध्यमातून स्मिताला कॉर्पोरेट ग्राहक मिळाले.
 
 
पुढे संबंधित केक कंपनी सोबत स्मिताचे व्यावसायिक गणित जुळले नाही. यावेळी संस्थेतील तिच्या मित्रांनी तिला स्वत:चा केक ब्रॅण्ड तयार करण्याचा सल्ला दिला. यातूनच आकारास आला ‘स्मायरा’ हा केक ब्रॅण्ड. या नावामागची कथासुद्धा रंजक आहे. केक ब्रॅण्डला अनेकांनी अनेक नावे सुचवली. पण, यातील बहुतांश बाजारात नावे उपलब्ध होती. नाव देतानासुद्धा त्या नावाखाली केक सोबत इतर खाद्यपदार्थांची सेवा देता आली पाहिजे, असं डोक्यात होतं. कुणीतरी सुचवलं त्याप्रमाणे स्मिताच्या इंग्रजी नावातील पहिली तीन आद्याक्षरे आणि मुलगा रुद्राच्या इंग्रजी नावातील शेवटची दोन अक्षरे असं मिळून तयार झालं ‘स्मायरा.’ २०१९ साली ‘स्मायरा’ ब्रॅण्ड दहिसरमध्ये ‘लॉन्च’ झाला. काहीच दिवसांत ‘स्मायरा’ असलेल्या परिसरांत इतर अनेक केकशॉप्स सुरू झाले. मात्र, चव, दर्जा यामुळे ‘स्मायरा’ने स्वत:चं अढळपद निर्माण केलं होतं. त्यामुळे इतर केक शॉप्सच्या स्पर्धेच्या तुलनेत ‘स्मायरा’ केक अग्रेसर राहिला.
 
 
दोन वर्षांच्या कालावधीतसुद्धा ‘स्मायरा’चे स्वत:चे स्थान कायम आहे. केकचा दर्जा, चव आणि किंमत याबाबतीत ‘स्मायरा’ने कधीच तडजोड केली नाही. ‘स्मायरा’चे या दोन वर्षांतील ग्राहकसुद्धा बदलले नाहीत. उलट त्यात दिवसेगणिक वाढ होत आहे. ‘लाईव्ह किचन’ ही ‘स्मायरा’ची खासियत आहे. अलीकडे ही कल्पना सर्वत्र दिसते. मात्र, दहिसरसारख्या ठिकाणी ही संकल्पना अस्तित्वात आणणारी कदाचित स्मिता पहिलीच असावी. जर कुणाला केकच्या व्यवसायात उतरायचे असेल, तर त्यास सर्वतोपरी साहाय्य करण्यास स्मिता पुरळकर तयार आहेत. इतकेच नव्हे, तर ‘स्मायरा’ केक शॉपची शृंखला भविष्यात सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
 
 
“निव्वळ सहा चौरसफुटांचा काऊंटर घेऊन केक शॉप सुरू करता येऊ शकते. ‘स्मायरा’ तयार केक पुरवेल. अगदी छोट्या गुंतवणुकीसह हा व्यवसाय करता येऊ शकतो. टाळेबंदीनंतर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच व्यवसायाचे हे नवीन केक मॉडेल आम्ही विकसित केले आहे,” असे स्मिता पुरळकर सांगते. केक व्यवसायाला काही लाख रुपये भांडवलाची गरज असते. हा समज खोटा ठरवून सर्वसामान्यांच्या आवाक्यात हा व्यवसाय आणू पाहण्याचा स्मिता पुरळकर हिचा मानस आहे. कोरोना काळात टाळेबंदीने आर्थिक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे, अशा या परिस्थितीस ‘स्मायरा’ केकसारखा व्यावसायिक पर्याय आशेचा किरण ठरू शकतो.
 
 
Powered By Sangraha 9.0