मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण विभागात खवले मांजरांची छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तस्करीचा पुरावा देणारे अजून एक प्रकरण समोर आले आहे. वन विभागाने गुरुवारी सुधागड पाली येथून जीवंत खवले मांजराची तस्करी उघड केली. यावेळी दोन खवले मांजरांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभलेल्या खवले मांजराची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कोकणात आजही या प्राण्याची छुप्या मार्गाने शिकार होऊन त्याची खरेदी-विक्री होते. सुधागड-पाली वनपरिक्षेत्रामधील नवघर येथून अशाच प्रकारे खवले मांजराची तस्करी उघड करण्यात आली आहे. यापरिसरात खवले मांजर खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकांच्या मदतीने हा व्यवहार उघड केला. नवघर येथे बनावट ग्राहकाच्या मदतीने वन विभागाने गुरुवारी सापळा लावला होता. येथील नाडसुर-जांभुळपाडा रोडवर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन संशयीतांची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मोटार सायकलवरील अनिल भागु वाघमारे यांचे पाठीवर असणारी बॅग वन विभागाने तपासली. यावेळी बॅगेमध्ये गोणपाटामध्ये झाकून ठेवलेली खवले मांजराची मादी आणि तिचे पिल्लू सापडल्याची माहिती सुधागड-पाली वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही या आरोपींच्या मागावर असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये हिरामण हिलम, दशरथ वालेकर, अनिल वाघमारे आणि रमेश जाधव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अलिबागचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि सहाय्यक वनसंरक्षक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आंतरराष्ट्रीय वन्यजीव बाजारपेठेत खवले मांजरांना मोठी मागणी असल्यामुळे राज्यातून छुप्यामार्गाने या प्राण्यांची तस्करी होते. या तस्करीला चाप लावण्याकरिता त्यामागील कारणे, उपाय आणि योजना अंमलात आणण्यासाठी 'कृती आराखडा' तयार करण्यात येत आहे.