तामिळनाडू, केरळ, प. बंगाल, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दि. २ मे रोजी घोषित झाले. यातील तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये झालेल्या निवडणूक निकालांची चर्चा येथे करण्यात आली आहे.
तामिळनाडूमधील राजकारण हे गेल्या अनेक वर्षांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरत राहिले. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे त्या राज्यात अस्तित्व असले, तरी त्या पक्षांचा मतदारांवर विशेष प्रभाव नसल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. तामिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव असलेले द्रमुक नेते एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्या पक्षाची सूत्रे त्यांचे पुत्र एम. के. स्टालिन यांच्याकडे आली. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्या पक्षात बेदिली माजेल की काय, अशी शक्यता प्रारंभीच्या काळात वाटत असतानाच, स्टालिन यांनी पक्षाची सूत्रे हाती घेऊन पक्षावर आपली चांगली पकड बसविली. त्याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आले. स्टालिन यांचा द्रमुक आणि काँग्रेस यांची या निवडणुकीमध्ये युती होती. तामिळनाडूमध्ये असलेली अण्णाद्रमुकची सत्ता घालवून तेथे आपल्या पक्षाची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान स्टालिन यांच्यापुढे होते. ते आव्हान स्टालिन यांनी पेलले. गेली दहा वर्षे त्या राज्यामध्ये सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुकचा पराभव करून त्या राज्यावर पुन्हा द्रमुकचा झेंडा त्या पक्षाने फडकविला आहे. द्रमुकचा सूर्य पुन्हा तेथे उगवला!
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचा प्रभाव ओसरेल; तसेच पक्षांतर्गत संघर्षामुळे पक्षात बेदिली माजेल आणि पक्षाची शक्ती क्षीण होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पक्षात असलेल्या ताणतणावांचे, संघर्षाचे उमटत असलेले पडसाद पाहून पक्ष फुटणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, तशी वेळ त्या पक्षावर आली नाही. इडापड्डी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे सरकार स्थिरावले. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णाद्रमुकला जे दारुण अपयश मिळाले होते, ते पाहता २०२१ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत या पक्षास विशेष भवितव्य नसल्याची भाकिते व्यक्त करण्यात येत होती. पण, प्रत्यक्षात अण्णाद्रमुकच्या बाजूने मतदार अजूनही मोठ्या संख्येने असल्याचे या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून दिसून आले. विधानसभेच्या २३४ जागांपैकी द्रमुक युतीला १५९ जागा मिळाल्या असल्या तरी अण्णाद्रमुक आणि मित्र पक्षांनी ७५ जागा मिळविल्या. आपला पक्ष अजून तामिळनाडूमध्ये भक्कम पाय रोवून उभा असल्याचे या निकालावरून अण्णाद्रमुकने दाखवून दिले आहे. या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने भारतीय जनता पक्षासाठी २० जागा सोडल्या होत्या. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमवेत कार्य करीत असलेल्या अण्णाद्रमुकने भाजपसमवेत केलेल्या युतीचा लाभ भारतीय जनता पक्षास झाला असून, त्या पक्षाचे चार उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. द्रमुकचे नेते एम. करुणानिधी किंवा अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता हे दोन्ही दिग्गज नेते हयात नसताना लढल्या गेलेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक नेते स्टालिन आणि अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाचा कस लागला. त्यामध्ये द्रमुकचे नेते स्टालिन यांनी बाजी मारली. अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये द्रमुकचे बडे बडे नेते गुंतले असताना, त्यातील काहींनी तुरुंगवास भोगला असताना, तामिळनाडूमधील मतदार असे नेते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षास सत्तेवर कसे काय बसवितात, याचे मात्र आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही!
तामिळनाडूमधील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला प्रसिद्ध चित्रपट अभिनेता कमल हसन आणि त्यांच्या ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षास जनतेने विशेष महत्त्व दिले नसल्याचे निवडणूक निकालांवरून दिसून आले. तामिळनाडूमधील राजकारणावर तेथील चित्रपट अभिनेते, तारका यांचा प्रभाव असतानाही कमल हसन यांच्या पक्षास काही यश मिळू शकले नाही. एवढेच नाही, तर कमल हसन ज्या कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीस उभे होते, तेथे त्यांचा भाजपच्या उमेदवार वनथी श्रीनिवासन यांनी पराभव केला. कमल हसन हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रारंभी ते चेन्नईमधून उभे राहण्याचे घाटत होते. पण, त्यांनी शेवटी कोईम्बतूरची निवड केली. पण, कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांनी १,५४० मतांच्या फरकांनी त्यांचा पराभव करून भाजपच्या श्रीनिवासन यांना विजयी केले.
तामिळनाडूच्या या निवडणुकीमध्ये अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी केलेल्या आणि ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ पक्षाचे संस्थापक असलेल्या टी. टी. व्ही. दिनकरन यांनाही मतदारांनी थारा दिला नाही. जयललिता यांची मैत्रीण असलेल्या शशिकला यांचा दिनकरन हा भाचा. एकेकाळी अण्णाद्रमुकमध्ये दिनकरन यांचा खूप मोठा प्रभाव होता. पण, तो पुढे ओसरला. शशिकला यांची चार वर्षांसाठी कारागृहात रवानगी झाल्यानंतर दिनकरन यांचा प्रभाव ओसरणे स्वाभाविकच होते. या निवडणुकीमध्ये दिनकरन यांच्या पक्षाने ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षाशी युती केली होती. पण, या युतीस मतदारांनी जवळ केले नसल्याचे निकालांवरून दिसून आले. तामिळनाडूमधील मतदारांना आपल्या नेत्यांनी केलेल्या मोठमोठ्या चुका, भ्रष्टाचार यांचे काही देणे-घेणे नसल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना दिसून आले. या स्थितीमध्ये इतक्यात बदल होण्याची शक्यताही नाही!
तामिळनाडूमध्ये दहा वर्षांच्या खंडानंतर पुन्हा द्रमुकचे सरकार सत्तेवर येत आहे. येत्या ७ मे रोजी एका साध्या समारंभात स्टालिन हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाबद्दल स्टालिन यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कोरोना महामारीशी लढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. द्रमुक नेते स्टालिन केंद्र सरकारसमवेत कोणती भूमिका घेतात, हे नजीकच्या काळात दिसून येईलच.
पुदुच्चेरीमध्ये रालोआच्या हाती सत्ता
तामिळनाडूमध्ये जरी सत्तापालट झाला असला, तरी शेजारच्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरी येथील मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत दिले आहे.
या केंद्रशासित प्रदेशामध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली होती. व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अल्पमतात गेल्यावर तेथे राष्ट्रपती शासन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एन. आर. काँग्रेससमवेत भारतीय जनता पक्षाने युती केली होती. या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या ३० जागांपैकी या युतीने १६ पेक्षा अधिक जागा प्राप्त केल्या आहेत. या युतीचे नेते एन. रंगास्वामी हे पुदुच्चेरीचे मुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. एन. रंगास्वामी यांनी या आधी दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. आता ते तिसर्यांदा या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होतील. पुदुच्चेरीमधील काँग्रेस-द्रमुक युतीचे सरकार गेल्या फेब्रुवारीमध्ये पडले होते. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नारायणस्वामी यांचे सरकार पाडल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले. पण, त्या आरोपांना मतदारांनी काही महत्त्व दिले नसल्याचे तेथे जे निकाल लागले त्यावरून दिसून येत आहे. ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी हे लोकांमध्ये सहज मिसळणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. दुचाकीवरून फिरून ते लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात, अशी त्यांची ख्याती आहे.
पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे. दक्षिणेकडील आणखी एका प्रदेशामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आली आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकशी केलेल्या युतीमुळे भाजपचे काही उमेदवार विजयी झाले. प्रादेशिक पक्षांच्या गलबल्यात आपले राष्ट्रीय विचार कायम ठेवून तेथील जनमानसावर प्रभाव पाडण्याचे कार्य भाजप अनेक वर्षांपासून करीत आहे. त्या प्रयत्नांना काही प्रमाणात का होईना यश मिळत आहे, असे या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होते.