मंगळवेढ्याला गावकुसाची भिंत बांधत असताना ती कोसळली. त्यात अनेक मजूर ठार झाले. यात चोखोबांचाही समावेश होता. तो दिवस होता वैशाख वद्य ५ शके १२६० म्हणजे इ. स. ३० मे १३३८. आज संत चोखामेळाच्या ६८२व्या पुण्यस्मरणानिमित्ताने...
मी, जेव्हा जेव्हा संत चोखोबांविषयी काही वाचतो, काही ऐकतो, जेव्हा जेव्हा त्यांच्या कोणत्या अभंगावर चिंतन, मनन करतो, तेव्हा तेव्हा त्यांचे जितके आणि जसे जीवनचरित्र माझ्या आभ्यासात आलेले आहे, ते सगळे माझ्या डोळ्यासमोर तरळून जाते आणि मी अवाक होऊन प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा चोखोबा या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडतो. जितका अचंबा आणि आदर मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा वाटतो, तितकाच अचंबा आणि आदर मला चोखोबांच्या जीवनकार्याचाही वाटतो. अर्थात, दोन्ही विषय आणि या दोन्ही व्यक्ती जरी सर्वार्थाने वेगळ्या असल्या तरी चोखोबांचं समाजकार्यही खूप असाधारण आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. उलट खंत ही आहे की, चोखोबांचं कार्य अजून म्हणावे तितक्या प्रकट रूपात समाजापुढं आलेलं नाही; जे एव्हाना यायला हवं होतं, असं मला वाटतं. कारण त्यात एक प्रेरणादायी असं आपल्या मातीतलं तत्त्वज्ञान रुजलेलं आहे. असं तत्त्वज्ञान जे मला सतत प्रेरणा देत आलं. जे तत्त्वज्ञान मला मी शाळेत असताना माझ्या वाचनात आलेल्या वीणा गवाणकर यांच्या १९८१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकातल्या कार्व्हरच्या जीवनात सापडलं होतं. ज्यामुळे मी अत्यंत भारावून गेलो होतो आणि ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक मी अनेक वेळा वाचून काढलं होतं. त्यावेळी चोखोबा माझ्यापर्यंत का पोहोचले नाहीत, ही खंत मला आता वाटते. कार्व्हर आणि चोखोबा हे जरी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेली दोन वेगळी व्यक्तित्व असली, तरी दोघांच्याही वाट्याला आलेल्या संकटांच्या मालिका, उपेक्षा, अपमान, दु:ख, संघर्ष आणि त्यातून दोघांनीही प्राप्त केलेली सकारात्मक ऊर्जा ज्यातून आकाराला आलेले त्यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व, ही दोघांचीही साम्यस्थळं आहेत. इतिहासाला दखल घ्यायला भाग पडावं इतकं ‘न भूतो न भविष्यती’ असं असामान्य कोटीतील समाजोपयोगी कार्य, समाजप्रबोधनाचं कार्य. सगळ्या जगाला बंधुत्वाकडे नेणारे कार्य. दोघांनाही साधले आहे. हे भौतिक आणि आध्यात्मिक विकासाकडे नेणारे कार्य प्रेमभाव वाढवणारेदेखील आहे आणि ही सगळी शिदोरी जगाला युगानुयुगे पुरणारी आहे. वर्तमान पिढ्यांनी यापासून सतत प्रेरणा घ्यावी, असं प्रेरणादायी ज्ञान या दोघांनी जगात निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळे दोघेही पुढच्या पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ, एक उत्स्फूर्त प्रेरणा स्रोत म्हणून युगानुयुगे उभे राहणार आहेत.
पण, तुलनात्मक आभ्यास केल्यास असे दिसते की, चोखोबांच्या वाट्याला आलेल्या वेदना, चोखोबांच्या वाट्याला आलेला संघर्ष, चोखोबांच्या वाट्याला आलेले अपमानाचे प्रसंग, सामाजिक हेळसांड ही कार्व्हरच्या तुलनेत कितीतरी जास्त होती. चोखोबांच्या वाट्याला आलेली सामाजिक परिस्थिती ही कार्व्हरच्या तुलनेत कितीतरी जास्त भयावह होती. 1864 मध्ये अमेरिकेसारख्या लोकशाही प्रस्थापित असलेल्या देशात जन्मलेल्या जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हरच्या तुलनेत त्याच्या कितीतरी आधी म्हणजे तेराव्या शतकात भारतासारख्या देशात जेथे त्यावेळी उपेक्षितांचा साधा आवाजही उमटत नव्हता, दलितमुक्ती, स्त्रीअधिकार आदी शब्दांनी तर जन्मही घेतला नव्हता, त्या काळात चोखोबांचा एका महार कुटुंबात जन्म झाला होता आणि इतके असूनही कार्व्हरची जितकी दखल अमेरिकेने घेतली आणि जगाला घ्यायला भाग पाडली, तितकी संत चोखोबांची दखल आपल्याला घेता आली नाही. त्यामुळे साहजिकच अनावधानाने का होईना, चोखोबांवर अन्याय झाल्याची माझी भावना आहे. ज्याची दखल अख्ख्या जगाने घ्यावी, असे कालातीत तत्त्वज्ञान चोखोबाने आपल्यासाठी निर्माण करून ठेवले आहे की, ज्याचा दाखला आजकालच्या मोठ्या मोठ्या ‘मोटिव्हेशनल सेमिनार्स’मधून देण्यासारखा आहे. पण, असं काही करण्याची गोष्ट तर लांबच राहिली. पण, त्याउलट आपण चोखोबांना धार्मिक आणि जातीभेदाच्या परिघात बंदिस्त करून ठेवले आहे आणि त्यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या सर्वोपरी प्रेरणादायी असणार्या तत्त्वज्ञानाला आणि त्यांच्या जीवन अनुभवातून निर्माण झालेल्या त्यांच्या बौद्धिक तेजाला मर्यादा घातल्या, हे फारच दुर्दैवी आहे.
संत चोखोबा म्हणजे ज्ञानदेवांनी लावलेल्या आणि नामदेवांनी गगनापर्यंत विस्तार केलेल्या समरसतारूपी वारकरी पंथ नावाच्या झाडाला आलेल्या संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत जनाबाई, संत कबीर, अशा विविध मधुर फळांपैकी एक मधुर फळ, ज्याचा सुगंध निःसंशय युगे युगे दरवळत आला आहे आणि पुढेही दरवळत राहणार आहे.नामदेवांनी त्या काळी चंद्रभागेच्या वाळवंटात राबवलेल्या ‘सर्वज्ञाती बंधुत्वाच्या प्रयोगाला सर्वजातीय संतांच्या रूपानं जे अद्भुत यश मिळालं, ते त्या वेळेच्या सामाजिक समरसतेचं एक कौतुकास्पद, असं उदाहरण होतं. ज्ञानदेवादी ब्राह्मण संत वाळवंटात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा अशा अठरापगड जातीतली संत मंडळी आणि सामान्य वारकरी यांची उराउरी भेट घेऊ शकत होते. म्हणूनच तर चोखामेळ्यानं हा सगळा प्रसंग आपल्या अभंगातून कसा उभा केला आहे बघा आणि त्या बरोबरच ज्ञानदेवांची महतीही गायली आहे, ते म्हणतात.
चंदनाच्या संगे बोरीया बाभळी। हेकळी टाकळी चंदनची॥
संताचिया संगे अभाविक जन। तयांच्या दर्शने तोची होती॥
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा। नाहीतरी भार व्हावा खरा ऐसा॥
पुढे ते म्हणतात,
सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव। मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणी॥
सोपान सावता गोरा तो कुंभार। नरहरी सोनार प्रेम भरीत॥
कबीर कमाल रोहीदास चांभार। आणिक अपार वैष्णव जन॥
चोखा म्हणे पायी घाली लोटांगण। वंदीतो चरण प्रेमभावे॥
अक्षराचा ‘अ’ही न शिकलेल्या निरक्षर अशा संत चोखामेळाने जीवनाच्या तत्त्वज्ञानाने आणि विठ्ठलाच्या भक्तीने भरलेले असे एक ना दोन तब्बल ३५०च्या वर अभंग रचना केली आहे. काही अभंगातून त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे, तर काही अभंगांतून विठ्ठलभक्तीचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णनही त्याने अनेक अभंगांतून केले आहे. पण, कुठेही समाजाप्रति राग वा द्वेष चोखोबांच्या अभंगातून दिसून येत नाही, तर आपल्याला लाभलेल्या परिस्थितीला, आपल्या पुढे उभ्या राहिलेल्या समस्यांनाच चोखोबाने संधीत परावर्तित करून दाखवले आहे. यावरून चोखोबांची बौद्धिक उंची कोणत्या पातळीवर होती हे दिसून येते. त्यामुळेच तर आपल्या कर्मठ ब्राह्मण वडिलांच्या विरोधाला न जुमानता कर्नाटकातल्या अनंतभट नावाचा युवक चोखामेळ्याच्या अभंगांचा आजीवन लेखक बनला. या अनंतभटांमुळे तर चोखोबांचे हे अभंग आज आपल्याला वाचायला मिळतात. समरसतेचे असे उदाहरण तेराव्या शतकात बघायला मिळते, हे अद्भुत आहे. जीवनाचे तत्त्वज्ञान आणि भक्तिवैराग्य याचे वर्णन करणारा हा अभंग पाहिला तर वेदांनाही लाजवणारं हे तत्त्वज्ञान चोखोबांकडे कुठून आलं होतं, याच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या अभंगात चोखोबा म्हणतात, “परमार्थाच्या मार्गावरून चालत असताना हा प्रपंच म्हणजे एक बाजारच आहे. बाजारात अनेक वस्तू विकायला येतात. पण, परमार्थाच्या या बाजारात आपण वस्तू विकून आपल्या इच्छा, आकांशा पूर्ण करू पाहतो. पण, विकायला नेलेल्या वस्तू नाशवंत असल्यामुळे आपले माप रितेच राहते. म्हणजेच, कित्येक जण जन्माला येतात आणि मरूनही जातात. पण, हा बाजार मात्र तसाच राहतो. आपण मात्र हे माझे ते माझे करत राहतो. संध्याकाळ झाल्यावर बाजारातले पंचप्राण नाहीशे होतात आणि देहाचा शेवट होतो.” चोखोबा म्हणतात, “मी मात्र माझे गुरू नामदेवांच्या परिसस्पर्शाने माझी गोणी शिगोशिग भरली आहे. मला विठ्ठलभक्तीची अशी वस्तू मिळाली आहे जी सगळी सगळीकडे भरून राहिली आहे.”
गोणी भरियेली रितिया मापाची। भाव अभावाची बैलापाठी॥
आवडीच्या हाटा घेऊनिया जाय। आशा, दंभ पाहे गिर्हाईक॥
मांडीले दुकान घातिला पसारा। झाला सारा वारा बाजाराचा॥
चोखा म्हणे, हाट संपोनिया नेला। एकला उरला नामदेव॥
नामदेवे आजि उपकार केला। हाटाचा हाट चौबारा ठेला॥
अवघ्या वाणाची देवोनिया गाठ। बांधली मोट सरळ तेणे॥
अवघा पसारा उघड जो होता। झाकिला तत्वता निजबळे॥
चोखा म्हणे, आता वाणची पावलो। गोणी विसरलो हाटामाजी॥
संत चोखामेळा आणि त्याच्या परिवाराची त्यांच्या कार्याची परिपूर्ण माहिती आज उपलब्ध आहे की नाही, याबाबत शंका आहे. चोखामेळांवरही फार थोडे लिखाण झालेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा पुस्तके अशी आहेत, ज्यात बर्यापैकी चोखोबांचे चरित्र मांडले गेले आहे. पण, त्यापैकी बहुतांश पुस्तकांतून एकच विचार पुढे येतो, तो हा की, चोखोबा हे ‘परिस्थितीशरण होते’ जे की माझ्या मते बिलकूल बरोबर नाही. जशी परिस्थिती आहे, तशा परिस्थितीत जगणे आयुष्य नेईल तिकडे वाहत जाणे, याला परिस्थितीशरण जगणे म्हणता येईल. पण, जी परिस्थिती आहे तिला आपल्या कर्तृत्वाने, स्वयंप्रेरणेने संधीत रूपांतर करून असामान्य कार्य निर्माण करणे याला परिस्थितीशरण कसे म्हणू शकतो? तर अजिबात नाही, उलट याला परिस्थितीचा नियंता वा नियंत्रक म्हणू शकतो. ‘लाभल्या खडकातही पिंपळाचे झाड झालो’ या ओळी चोखोबाच्या असामान्य अशा कार्यकर्तृत्वाला अगदी चपखल बसतात.
संत चोखामेळाने आपले अभंग रचनेचे कौशल्य केवळ आपल्या पुरतेच मर्यादित न ठेवता, आपली पत्नी सोयरालाही हे कौशल्य शिकवले होते, जिची जन्म-मृत्यूचीही नोंदही आज सापडत नाही, अशी चोखोबाची पत्नी सोयराबाईंनी रचलेल्या अभंगातून तीसुद्धा संत रूपाला प्राप्त झाली होती, हे सहज लक्षात येते. ‘अवघा रंग एक झाला’ हा तिचा सर्वश्रुत अभंग जर आठवला, तर आपल्याला तिच्या विद्वत्तेच्या उंचीची कल्पना येईल. एवढेच नाही, तर चोखोबाची बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा यांनीसुद्धा अभंगरचना करत संतपद मिळवलेले आहे. यावरून चोखोबांच्या कार्यकर्तृत्वाचा परीघ किती मोठा होता, हे कळून येणे फार अवघड आहे, असे मला वाटत नाही. अंत्यजातीत जन्माला येऊनसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही संपूर्ण कुटुंबाला संतपद प्राप्त करून देऊन संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करणारे संत चोखामेळा हे आजपर्यंतच्या इतिहासातले एकमेव संत असावेत. त्यामुळे त्यांना ‘परिस्थितीशरण’ म्हणणे हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अपमान आहे, असे मला वाटते. डोळे दीपवून टाकणारे त्यांचे कार्य हा त्याच्या संपूर्ण कार्याचा उजेडात आलेला केवळ काही भाग असावा. कारण, त्यांचे बरेच कार्य अजून अंधारात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर संशोधन करायला निश्चित वाव आहे.
समाजाच्या अतिशय तळागाळापर्यंत भगवत भक्तीचा जागर व्हावा, या हेतूने ज्ञानदेव-नामदेवांनी आपल्या या प्रिय भक्ताकडे वारकरी पंथाची जी पताका दिली, त्याला अनुसरूनच चोखोबांनी नामदेवांच्या ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥’ या मताप्रमाणे हा भक्तीचा दीप सतत तेवत ठेवण्याचे काम केले. मंगळवेढ्याला गावकुसाची भिंत बांधत असताना ती कोसळली. त्यात अनेक मजूर ठार झाले. यात चोखोबांचाही समावेश होता. तो दिवस होता वैशाख वद्य ५ शके १२६० म्हणजे इ. स. ३० मे १३३८. त्यानंतर आठ दिवसांनी संत नामदेवांनी ढिगार्याखाली असलेल्या आपल्या या आवडत्या शिष्याला, त्याच्या अस्थींचा शोध घेऊन त्या अस्थींना पंढरपूरला महाद्वारी समाधी दिली. तो दिवस म्हणजे वैशाख वद्य त्रयोदशी होय. ‘महाद्वारापुढे मला ठाव द्यावा’ ही आपल्या प्रिय भक्ताची इच्छा विठ्ठलाने नामदेवाच्या हातून पूर्ण करून घेतली. दिनांक ३० मे, २०२१ रोजी आपण संत चोखामेळाचे ६८२वे पुण्यस्मरण करत आहोत. आजही वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी संत चोखोबाचे दर्शन घेतात. संत चोखोबाचा विठ्ठलावरचा अधिकार किती मोठा होता याचे वर्णन संत जनाबाई आपल्या अभंगातून करताना म्हणतात,
चोखामेळा संत भला। त्याने देव भुलविला॥
भक्ति आहे ज्याची मोठी। त्याला पावतो संकटी॥
चोखामेळ्याची करणी। देव केला त्याने ऋणी॥
लागा विठ्ठल चरणी। म्हणे नामयाची जनी॥
- काशिनाथ पवार
(लेखक समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यचे सदस्य आहेत.)