गेला चोक्सी कुणीकडे? पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी पुन्हा फरार

25 May 2021 17:18:31

Mehul Choksi_1  
 
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी आता अँटिग्वा -बारबुडामधून बेपत्ता झाला आहे. १४,५०० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याने २०१७मध्येच अँटिग्वा-बारबुडाचे नागरिकत्व घेतले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता तो तिथूनही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
'अँटिगा न्यूज रूम' या स्थानिक माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, सोमवारी रात्री जेवणासाठी म्हणून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा दिसलाच नाही. पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच, त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही काळाने त्याची गाडी जॉली हार्बर येथे आढळली. मात्र, तो अद्याप बेपत्ता आहे. एका वृत्तपत्राला त्याच्या वकिलाने माहिती दिली की, मेहुल चोक्सी हा बेपत्ता झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत आहेत. त्यांनी मला बातचीत करण्यासाठी बोलावले होते. याप्रकरणी तेथील स्थानिक पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
 
 
पंजाब नॅशनल बँकचा १४, ५०० कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही भारताबाहेर पलायन केले होते. चोक्सी हा अँटिग्वा-बारबुडाला स्थायिक झाला होता. तर, नीरव मोदी हा लंडनमध्ये स्थायिक झाला होता. पीएनबी घोटाळ्याचा तपास करत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) आणि अमंलबजावनी संचालनालय (ईडी) सारख्या संस्था चौकसीच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्नात आहेत. त्याने अनेकदा तब्येतीचे कारण देऊन भारतात येण्यास नकार दिला होता.
Powered By Sangraha 9.0