गेल्या काही काळातील रुग्णालयांमधील आगींच्या घटनांमुळे एरवी दुर्लक्षित रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने रुग्णालयांमधील आगीच्या घटनांची नेमकी कारणे व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
कोरोनाकाळातील नऊ महिन्यांत ऑगस्टपासून २४ रुग्णालयांच्या आगीच्या तडाख्यात आतापर्यंत एकूण ९३ माणसे मृत्युमुखी पडली आहेत. ही आग लागलेली बहुतेक रुग्णालये कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करीत होती. या २४ आगींच्या घटनेत ११ मोठ्या व १३ छोट्या स्वरूपाच्या आगी होत्या. रुग्णालये ही जीव वाचविण्याकरिता मदत करत असतात. पण, या दुष्ट आगीने त्यांचीही राखरांगोळी केली.
या २४ पैकी अर्ध्याहून जास्त आगी या वर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यातीलच आहेत. त्यावेळी देशात कोरोना विषाणूचे दुसर्या लाटेचे आजार सुरू होते. या दोन महिन्यांतील आगीत सापडलेल्या लोकांची संख्या ५९ होती. त्यातील महाराष्ट्रातील सहा आगीच्या घटनांतील ३३ व गुजरातमधील तीन आगीच्या घटनांतील २१ जणांचा समावेश आहे. परंतु, ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्रात एकूण ४३ मृत्यू व गुजरातमध्ये ३५ दुर्दैवी मृत्यू झाले. त्यातील फक्त भरुचच्या रुग्णालयाच्या आगीत १६ रुग्ण होते व दोन परिचारिकांचाही मृत्यू झाला.
अतिदक्षता विभाग व वातानुकूलित साधनांवर बोजा वाढला
कोरोना विषाणूबाधित रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे रुग्णालयातील अनेक साधने, खाटा, मनुष्यबळ, अतिदक्षता विभाग आणि वातानुकूलित साधने, विजेच्या वाहिन्या, वैद्यकीय उपकरणे यांची संख्या वाढवावी लागली. वैद्यकीय उपकरणांतील विद्युतप्रवाहातील ‘अॅम्पिअरेज’ वापरात क्षमता नसूनही मोठी वाढ करावी लागली. त्यामुळे कदाचित वापरलेल्या त्या उपकरणांत प्रमाणाबाहेर उष्णतेची वाढ झाली असावी. त्यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या रुग्णालयांचे सर्वेक्षण करताना फक्त ‘फायर ऑडिट’ करून भागणार नाही, तर ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’पण करायला हवे.
अतिदक्षता विभागावर ताण
यावर निर्देशिलेल्या २४ रुग्णालयांपैकी १३ घटनांच्या ठिकाणी अतिदक्षता विभागात स्फोट झाल्यामुळे आग लागल्याच्या घटना घडल्या. अतिदक्षता विभाग नेहमी १०० टक्के वापरात नसतो. पण, महामारीच्या काळात तो १०० टक्के वापरावा लागला. अग्निशमन अधिकार्यांच्या असे निदर्शनास आले की, बहुतेक सर्व रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात योग्य तेवढे ‘क्रॉस व्हेंटिलेशन’ नव्हते. कारण, ते सर्व विभाग ‘स्टरिलिटी’करिता बंद ठेवले होते. ज्वालाग्राही असणार्या सॅनिटायझर, ‘ऑक्सिजन’चा वापर, ‘पीपीई किट’ इत्यादींचा वापर तेथे असल्यामुळे आगीचा लवकर भडका उडाला. भांडुपच्या ‘सनराईज’ रुग्णालयात आगीच्या भक्ष्यस्थानी ११ जणांना जीव गमवावा लागला, तर त्यानंतर दोन महिन्यांनी भंडार्याच्या सुस्थितीतील रुग्णालयात दहा बालकांचा मृत्यू झाला. कारण, त्या बालकांना ‘बेबी वॉर्मर’मध्ये ठेवले होते आणि त्या ‘वॉर्मर’मध्ये असहनशील अशी उष्णता वाढली. अनेक ठिकाणी ‘इलेक्ट्रिकल’सेवेवर जास्त भार आला व ‘शॉर्ट सर्किट’ने आग लागल्याच्या घटना घडल्या.
‘एसी’ व व्हेंटिलेटरचा वापर वाढला
‘एअर कंडिशनर’ व ‘व्हेंटिलेटर’ इत्यादी उपकरणे वाढीव कोरोना रुग्णसंख्येच्या दबावाखाली २४ तास वापरावी लागली. ही साधने सुरळीत राहण्यासाठी २४ तासांपैकी १५-१६ तास थंड म्हणजे बंद ठेवावी लागतात वा सगळी साधने ठीक व दक्ष राहण्यासाठी पर्यायी ‘एसी’ बाळगणे रास्त असते. विरारच्या ‘विजयवल्लभ’ रुग्णालयात १५ जणं आणि सुरतच्या ‘आयुष’ रुग्णालयात तीन माणसे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली, ती ‘एसी’च्या २४ तास सतत वापरण्यामुळे घडलेल्या स्फोटात. मार्चमध्ये दिल्लीच्या ‘सफ्तरजंग’ रुग्णालयातही ‘व्हेंटिलेटर’च्या सतत वापरण्यातून जास्त उष्णता निर्माण झाल्यामुळे आगीची घटना घडली.
आगीच्या घटनास्थळी कमी वेळात पोहोचण्याकरिता...
गुजरात अग्निशमन दलाचे संचालक के. के. बीश्नॉय म्हणतात की, “भरुचच्या रुग्णालयाकरिता ‘रिस्पॉन्स’ वेळ सात मिनिटांची ठरली होती. पण, ‘ऑक्सिजन’चा वापर व सॅनिटायझरने व्याप्त असलेल्या अतिदक्षता विभागात तोपर्यंत सात मिनिटांत मोठी आग भडकली होती.” बीश्नॉयनी सुचविले आहे की, “अतिदक्षता विभागासाठी ‘क्रॉस व्हेंटिलेशन’ची गरज आहेच, जेणेकरुन आगीचे लोट व धूर बाहेर जाण्यासाठी उपयोगी होईल. पण, ते दक्षता विभाग-सीलिंगमुळे शक्य नाही, असे वाटते.”
मुंबईतील आधीचे अग्निशमन अधिकारी प्रताप करगुटकर म्हणतात की, “रुग्णालयात ‘स्प्रिंक्लर’ची सोय करायला हवी. आगीचे तापमान ७८ अंश झाल्यावर ही ‘स्प्रिंक्लर’ साधने आपोआप काम सुरू करतात व आग विझविण्याकरिता दर मिनिटाला ३५ लीटर पाण्याचा फवारा मारतात. म्हणजे ‘रिस्पॉन्स’ वेळेकरिता ते उपयोगी ठरते.”
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणतात की, “मुंबईतील तात्पुरत्या व घाईत बनविलेल्या कोरोना रुग्णालयांकरिता मोठ्या आगीच्या घटनांकडे वेळेवर लक्ष देण्यासाठी मुलुंड, दहिसर व वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोरोना केंद्रांच्या रुग्णालयाशेजारी ‘फायर इंजिन’ आम्ही सज्ज ठेवले आहेत. म्हणजे ‘रिस्पॉन्स’ वेळ अगदी कमी होईल.”
सर्वात दु:खदायक बाब ही आहे की, या रुग्णालयांच्या आगीच्या घटना काही महिन्यांपूर्वीच घडल्या व त्या आगीच्या घटना मनात ताज्या असतानाच, मुलुंडच्या ‘अॅपेक्स’ रुग्णालयाला ऑक्टोबर २०२० मध्ये आग लागून दोन रुग्णांना जागा बदलत असताना जीव गमवावा लागला. तसेच मरोळच्या ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला २०१८ मध्ये आग लागून नऊ माणसांचा मृत्यू झाला होता.
‘ग्लोबल डिसीज बर्डन स्टडी’ या संस्थेने एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये जगातील प्रत्येक पाच आगींच्या घटनेत एक भारतातील असते, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अॅण्ड पब्लिक हेल्थ’ या संस्थेने १०० खाटांहून जास्त खाटा असलेल्या ३३ रुग्णालयांचा २०१०-२०२० काळातील आगींचा संशोधनपूर्वक अभ्यास केला आणि त्यांना आढळले की, पाच आगीत चार आगी ‘इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट’मुळे लागल्या होत्या. ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’ करणे, ‘फायर ऑडिट’ करण्यासारखेच अगदी महत्त्वाचे ठरते. कारण, मुंबईतील ५० टक्के रुग्णालयांनी अग्निशमन कायद्याचे उल्लंघन केले आहे.
भंडारा जिल्हा सार्वजनिक रुग्णालयातील जानेवारी २०२१ मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आदेश काढला की, राज्यातील सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षेकरिता सर्वेक्षण करणे जरुरी आहे.
एकूण १,३२४ रुग्णालयांचे सर्वेक्षण केले गेले आणि सरकारला आढळले की त्यापैकी ६६३ रुग्णालयांनी अग्निशमन कायद्याचे उल्लंघन केले आहे व त्या कायद्याच्या प्रकारे अग्निशमनाची कामे केली नाहीत व त्याला लागणारी साधने (पुरेशी ‘फायर हायड्रेण्ट्स’, ‘फायर स्प्रिंक्लर्स’, ‘स्मोक अलार्म्स’ आणि ‘फायर एक्स्टिंग्विशर्स’, ‘फायर पंप’, ‘वेट रायझर’, ‘होझ रील’ व ‘होझ पाईप’) रुग्णालयात बसवलेली नाहीत. काही रुग्णालयांनी काही साधने बसवूनही ती चालू स्थितीत ठेवली नाहीत.
या सरकारी सर्वेक्षणात खालील महत्त्वाच्या घटना आढळल्या
१,३२४ रुग्णालयांपैकी ६६३ रुग्णालयांनी अग्निसुरक्षेचे नियम तोडले आहेत. ३८ सरकारी रुग्णालयांनी अग्निसुरक्षा कायद्याचे पालन केलेले नाही. ठाण्यातील ३४७ रुग्णालयांचे सर्वेक्षण केले गेले, त्यातील २८ रुग्णालये बंद करण्याचा आदेश काढला गेला. १५१ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा कायद्याचे नियमन केलेले आढळले आणि १६८ रुग्णालयांना फेब्रुवारी २०२२ पर्यंत अग्निसुरक्षा कायद्याचे नियमन करण्यासाठी वेळ देण्यात आला.
मुंबई अग्निशमन दल
मुंबईत एकूण ३४ अग्निशमन केंद्रे आहेत. शहरातील मुख्य केंद्र हे भायखळ्याला व उपनगरांकरिता मरोळ येथे आहे. या अग्निशमन दलात १,६८६ अग्निशमनासाठी धावाधाव करणारे जवान आहेत, ४८३ ड्रायव्हर ऑपरेटर आणि ३००हून अधिक फायर अधिकारी आहेत. पण, मुंबईच्या लोकसंख्ये अनुरुप अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. तसेच सर्व इमारतींचे ‘फायर ऑडिट’ आणि विजेचे ‘ऑडिट’ करावे. प्रत्येक गाळाधारकांनी ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यावर सुरक्षितता म्हणून ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर’ (ईएलसीबी) लावावे, कारण अनेक आगी लागतात त्यात ‘शॉर्ट सर्किट’मुळे आगी लागतात, अशी नोंद झाली आहे. गॅस सिलिंडरमुळेही काही आगी लागतात. ते गॅसची यंत्रणाही इमारतीतील गॅस वापरणार्यांनी तपासून घ्यावी. ‘स्मोक डिटेक्टर’, ‘स्प्रिंक्लर’, ‘अलार्म’, ‘हायड्रंट प्रणाली’, ‘फायर एक्झिट’ व ‘रिफ्युझ रूम’ इत्यादी साधने वापरावीत. तेव्हा, निवासी भागांबरोबरच रुग्णालयांनीही अग्निप्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन केल्यास अशा घटनांना नक्कीच आळा घालता येईल.