सागरी जीवांविषयी...
सिटेशिअन्स (व्हेल, डॉल्फिन, पॉरपॉईज) आणि सागरी कासवे हे त्यांचे संपूर्ण जीवन समुद्रामध्येच घालवतात. केवळ ठरावीक कारणासाठीच सागरी कासवे (विणीसाठी) आणि काही सागरी सस्तन प्राणी किनार्यावर येतात. जगभर दरवर्षी हजारोंच्या संख्येने व्हेल, डॉल्फिन, पॉरपॉईज, समुद्री कासवे जीवंत अथावा मृत परिस्थितीमध्ये किनार्यावर वाहून येतात. यापैकी काही जीव समुद्रामध्येच मृत्यू पावतात आणि त्यांचे मृत शरीर लाट आणि समुद्राअंतर्गत प्रवाहांमुळे वाहून किनार्यावर येतात. परंतु, जीवंत सागरी सस्तन प्राणी किनार्यावर वाहून येण्याची कारणे वेगवेगळी असतात.
सागरी जीव किनार्यावर येण्यामागची कारणे
- सागरी प्रदूषणामुळे
- हवामानातील बदलामुळे
- परभक्षी प्राण्यांमुळे
- दिशादर्शनात येणार्या अडचणींमुळे
- भक्ष्याचा पाठलाग करताना रोग
- मानवनिर्मित अथवा संबंधित कारणांमुळे
- जहाजांच्या धडकांमुळे
- मासेमारी जाळ्यांमध्ये गुंतल्यामुळे
- शारीरिक जखमा आणि तणावांमुळे
- उपासमारीमुळे
बचावकार्य केव्हा करावे?
सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे ही ’भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972’ अंतर्गत संरक्षित असल्याने हे जीव किनार्यावर आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा स्थानिक पोलिसांनी त्यासंबंधी माहिती द्यावी. किनार्यावर जीवंत अवस्थेमध्ये आलेल्या सागरी जीव हे स्वत:हून समुद्रामध्ये परतण्यास असमर्थ ठरतात किंवा उथळ पाण्यामध्ये पोहोताना आढळतात. अशावेळी त्यांना मदतीची गरज भासते. मात्र, किनार्यावर आलेल्या आणि उथळ पाण्यात पोहणार्या प्रत्येक जीवाला मदतीची गरज भासतेच असे नाही. त्या जीवाची परिस्थिती सामान्य असून तो स्वत:हून पुन्हा समुद्रामध्ये जाण्यास सक्षम असेल, तर आपण कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जीव जर शारीरिकदृष्ट्या जखमी झाला असल्यास आणि तो जीवंत असल्यास तातडीने कार्यवाही करण्याची गरज असते.
हाताळताना घ्यायची काळजी
किनार्यावर वाहून आलेल्या सागरी जीवांमध्ये नैसर्गिकरीत्या वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य जीव उपस्थित असतात. यातील काही जीवजंतू रोगराई पसरवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे रोगाच्या लागणीची शक्यता कमी करण्यासाठी खालील उपाययोजना अंमलात आणाव्यात -
- जीवंत किंवा मृत परिस्थितीमध्ये किनार्यावर आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांना हाताळताना हातमोजांचा वापर करावा.
- दूषित घाणीपासून संरक्षणासाठी जलरोधक कपडे वापरावे.
- स्वत:ला जखमा झालेल्या असल्यास मलमपट्टी करावी.
- सागरी जीवाला हाताळल्यानंतर हात आणि उघडी त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी.
- जीवाची विल्हेवाट लावताना कोणतीही गंभीर इजा झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
जीवंत सागरी सस्तन प्राण्यांचा बचाव करताना...
- बचावकार्य हे वन विभागाच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करावे.
- प्राण्याच्या डोळ्याचा भाग आणि डोक्यावरील ‘ब्लोहोल’ झाकून ठेवू नये. त्याठिकाणी लागलेली वाळू स्वच्छ करावी.
- प्राण्याच्या शरीराखालील आणि पंखांखालील वाळू काढून त्यामध्ये समुद्राचे पाणी ओतावे.
- प्राण्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याचे पंख, ‘ब्लोहोल’ आणि पाठीवरील पंख वगळता शरीरावर समुद्राच्या पाण्याने भिजलेला टॉवेल किंवा कपडा टाकावा.
- त्याच्या शरीरावर समु्द्राचे पाणी ओतावे
- प्राण्याला पुनर्वसन केंद्रामध्ये वाहून नेताना त्याचे पंख दुमडून इजा होऊ नये म्हणून योग्य ठिकाणी छिद्र असलेले ‘स्ट्रेचर’ वापरावे.
- प्राण्याला समुद्रात सोडताना पोटाकडील भागाला कापडी पट्ट्याने आधार देऊन त्याच्या डोक्यावरील ‘ब्लोहोल’ पाण्याबाहेर ठेवण्यास मदत करावी.
- आकाराने छोट्या सस्तन प्राण्यांना हाताने आधार देऊन पाण्यात सोडावे.
- मोठ्या सस्तन प्राण्याला नौका आणि दोरखंडाच्या साहाय्याने समुद्रामध्ये ओढून नेता येऊ शकते.
सागरी कासवांना वाचवताना
- बचावकार्य हे वन विभागाच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करावे.
- कासव जिवंत असल्याचे त्याचे डोळे आणि डोक (नाकपुड्या वगळून) ओल्या कपडाने झाकावे
- कासवाला उचलून नेताना कापड किंवा स्ट्रेचर ओले करुन त्याचा वापर करावा
- कासवाला हाताळताना त्याच्या परांची (फ्लिपर) काळजी घ्यावी.
- जखमी कासवाला उचलून त्याच्यासोबत छायाचित्र काढू नये
- मृत कासव आढळल्यास त्यापासून सुरक्षित अंतर राखावे
मृत समुद्री जीवांबाबत...
मृत परिस्थितीमध्ये किनार्यावर आलेल्या सागरी सस्तन प्राण्याच्या शरीरात विघटनामुळे घातक वायू निर्माण होऊन जमा झालेले असतात. अशावेळी त्यांचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यापासून दूर उभे राहावे. कोणताही मृत सागरी जीव दिसल्यास त्याच्यापासून योग्य अंतर बाळगून वन विभाग किंवा सागरी पोलिसांना माहिती द्यावी.
शास्त्रोक्त पद्धतीने बचावकार्य आवश्यक
सागरी सस्तन प्राणी आणि समुद्री कासवे ही भारतीय वन्यजीव अधिनियम कायद्याच्या अंतर्गत संरक्षित आहेत. त्यामुळे त्यांना हाताळण्यास मनाई आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हे प्राणी समुद्रकिनार्यावर पाहून आलेले दिसतात. अनेकदा ते जखमी अवस्थेत असतात. अशा जखमी प्राण्यांवर उपचार व्हावे आणि त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात यावे, यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. याकरिता कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, अनेक स्वयंसेवी संस्था, पशुवैद्यक आणि रहिवासी यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. ज्यामधून आपल्याला अशा जखमी प्राण्यांची माहिती मिळते. आतापर्यंत बर्याच जखमी कासवांवर उपचार करून त्यांना पुन्हा समुद्रात सोडले गेले आहे. परंतु, बर्याच वेळा अज्ञानाअभावी या जखमी समुद्री प्राण्यांना किनार्यावर योग्य प्रकारे हाताळले जात नाही आणि त्यामुळेच त्यांना आणखी दुखापत होण्याची शक्यता असते. आपल्याला जर डॉल्फिन, कासव किंवा समुद्री सस्तन प्राणी किनार्यावर वाहून आलेले दिसल्यास प्रथम 1926 या वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. बर्याचवेळा समुद्री जीवांना समुद्रात सोडताना, त्यांना हाताळताना कुतूहलापोटी त्यांचे फोटो काढले जातात. अशावेळी हे प्राणी दबावामध्ये जाऊ शकतात. असे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकले जातात. अनेक पत्रकारादेखील हे फोटो आणि व्हिडिओ आपापल्या माध्यमांवर प्रसारित करतात. यामुळे अनेक लोकांना असे जखमी समुद्री प्राणी हाताळण्यास प्रोत्साहन येऊ शकते, त्यामुळे हे टाळावे.
- हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ, कांदळवन प्रतिष्ठान