पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंवर बंदी आणून भारत जणूकाही काही पाकिस्तानवर मोठा अन्यायच करत आहे, असा भासवण्याचा प्रयत्न काही जण करताना दिसतात. “आमच्या कलागुणांना मिळणारा वाव भारताने घातलेल्या निर्बंधांमुळेच मिळाला नाही. मला मिळालेले अनेक सिनेमे आणि ‘वेबसीरिज’ मी भारतात काम करण्याच्या भीतीमुळे नाकारले,” असा दावा पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने नुकताच केला.
माहिरा शाहरूख खानच्या ‘रईस’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली. सोशल मीडियावर शाहरूख सोबतच्या तिच्या मुलाखतीचा एक भाग चांगलाच गाजला होता. अशीच एक मुलाखत माहिराने पुन्हा एकदा दिली आहे. “मला ‘रईस’ चित्रपटानंतर अनेक कामे भारतातून येऊ लागली होती. पण, भीतीच्या वातावरणामुळेच मी ती नाकारली,” असा दावा ही अभिनेत्री करते. अर्थात, तिला पाकिस्तानात राहायची, तिथे काम करण्याची भीती वाटत नाही... असा या गोष्टीचा अर्थ प्रेक्षकांनी घ्यायचा का?
आपल्या मुलाखतीत ती इथवरच थांबत नाही, भारत-पाक संबंध सुधारावेत, पाकिस्तानी कलाकारांना इथे काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही तिची आहे. “आम्ही लवकरच भारतातील निर्माते आणि दिग्दर्शकांसह काम करू,” असेही ती म्हणते. काही वर्षांपूर्वी माहिरा खान हिची मुलाखत पाहिली होती. त्यातूनच तिचा स्वतःच्या देशाबद्दल असणारा अभिमान तर दिसला. पण, पुसटसा का होईना भारतातील उजव्या विचारसरणीचा द्वेषही दिसून आला. आपल्या मुलाखतीतून भारत-पाक संबंधांवर आता माहिरानं बोट ठेवलंच आहे, तर काही प्रश्नांचीही उत्तरे तिने शोधायला हवीत म्हणजे तिच्या शंकांचे समाधान आपसूकच होईल.
भारत-पाक संबंध बिघडण्याचे कारण काय होते? ‘रईस’ चित्रपटांनंतर प्रमोशनसाठी भारतात ती का येऊ शकली नाही? या प्रश्नांची उत्तरे माहिराला माहिती नाहीत का? २०१६ मध्येे झालेला उरी हल्ला, २०१९चा जीवघेणा पुलवामा हल्ला माहिरा सोयीस्कर विसरली का? या दोन्ही देशांचे संबंध खराब कुणी केले? ज्या देशात माहिरा राहते, त्या देशाच्या शांतीप्रियतेबद्दल, बंधुत्वाबद्दल तिचे म्हणणे काय? उरी आणि बालाकोट हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या आमच्या सैनिकांबद्दल तुमचे म्हणणे काय?
दहशतवाद्यांच्या पिलावळ पोसणार्या तुमच्या नापाक देशाबद्दल तुमचे म्हणणे काय? भारतात तुमच्यासारख्या कलाकार आणि क्रिकेटपटूंचा प्रवेशबंद झाला याचे दुःख आहे, मग त्याचे कारण सोयीस्करपणे विसरण्याचे नाटक कशासाठी? कामही भारतातच करायचे आणि शिव्याही भारतालाच द्यायच्या, ही तुमची जुनी खोड जाणार कधी?
ज्या दिवशी भारतमातेचा सुपुत्र दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडतो, त्याच दिवशी त्याची माऊली आपला दुसरा वाघ सैन्यभरतीत पाठवण्याची तयारी करते. पतीला वीरमरण आल्यावर त्याच्या देशसेवेची इच्छा पूर्ण करण्यासाठी पत्नी स्वतः पुढाकार घेते, अशी निधडी छाती आणि मनं तयार व्हायला जन्म इथल्याच मातीत घ्यावा लागतो. हे उसनं मिळत नाही. पण, माहिरासारख्या कलाकारांना या जन्मात हे सगळं समजणं अवघड आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या मुलाखतींमधून प्रपोगंडा चालवणं पाकिस्तानी कलाकार मंडळींनी बंद केलेलंच बरं.
दोन्ही देशांनी मैत्री करावी, दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता नांदावी, हे उपदेश भारताला करण्यापेक्षा पाकिस्तानी कलाकारांनी आपल्या सरकारचे दहशतवाद संपवण्यासाठी कान टोचल्याचे कधीही ऐकिवात नाही. कारण, तितकी हिंमत त्यांच्यात नाहीच. शोएब अख्तरसारख्या क्रिकेटपटूला आजही ‘गजवा-ए-हिंद’ सारखी स्वप्न पडत असतात. “शोएब, तू चुकलास. दोन्ही देशांमध्ये शांतता नांदायला हवी,” असे प्रत्युत्तर देणारे एकही तोंड आज पाकिस्तानात दिसत नाही. कारण, कट्टरतेची पट्टी यांच्या डोळ्याभोवती इतकी घट्ट आवळली आहे की, काय चूक काय बरोबर, हे दिसणेच बंद झाले.
भारतात येण्याची भीती वाटतेय, इथे काम करायची इच्छाही आहे. पण, वास्तव्य करण्याची भीती वाटतेय? पाकिस्तानातून येणार्या दहशतवाद्यांच्या पिलावळी ठेचण्यासाठी तैनात असणार्या आपल्या पोटच्या गोळ्याला निरोप देताना त्या वीरांच्या कुटुंबाला काय वाटायला हवं? स्वतःला सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजणारे हे कलाकार दहशतवाद्यांची नांगी ठेचण्यासाठी पाकिस्तान सरकारने काय केलं, इतका जाब विचारण्याची भीती आपल्या देशात राहून तर नक्कीच वाटत नसणार, तितके सुरक्षित तर त्यांच्या देशात ते नक्कीच असतील! पाकिस्तानच्या कारभाराबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही... त्याआडून भारताला लक्ष्य करायचे आणि त्यांचीच री ओढायला भारतात स्वरा भास्करसारखी मंडळी आहेतच की!